महाराष्ट्र भूषण 'राम सुतार

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.co

२० मार्च २०२५ रोजी जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना ' महाराष्ट्र भूषण ' पुरस्कार जाहीर करत असल्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.ही अतिशय आनंददायी घटना आहे. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी राम सुतार यांनी वयाची शंभर वर्षे पूर्ण केलेली आहेत. आणि ते या वयात ही कार्यरत आहेत. जगाच्या पाचही खंडामध्ये शब्दशः शेकडोशील ते उभी करणारे शिल्पकार राम सुतार हे खरेखुरे महाराष्ट्र भूषण ,राष्ट्रभूषण आहेत. " ज्या भूमीत माझी जडणघडण झाली त्या महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार 'महाराष्ट्र भूषण' मला जाहीर झाला याचा प्रचंड आनंद व अभिमान आहे. मी वयाची शंभर वर्षे नुकतीच पूर्ण केली आहेत.आणि या क्षणी हा महत्त्वाचा बहुमान मला मिळाल्याने माझा आनंद द्विगुणित झाला आहे. मी माझ्या कामातून नेहमीच दर्जेदार कलाकृती साकारण्याचा प्रयत्न केला आहे." अशी प्रतिक्रिया त्यांनी हा पुरस्कार जाहीर झाल्यावर त्वरित दिली होती.

यापूर्वी त्यांना पद्मश्री (१९९९)दि बॉम्बे आर्ट सोसायटीचा रूपधर जीवनगौरव पुरस्कार (२०१०), टागोर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार (२०१६) पद्मभूषण (२०१६)असे अनेक सन्माननीय पुरस्कार मिळालेले आहेत.


राम सुतार यांचा जन्म  १९ फेब्रुवारी १९२५ रोजी धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला. त्यांचे वडील लोहारकाम आणि सुतारकाम करीत असत. हे बाळकडू घेत राम सुतार यांनी  शेतीची अवजारे, बैलगाडी , लाकडावरील कोरीव काम, मातीची खेळणी बनविणे ,शेणाने सारवलेल्या भिंतीवर चित्रे रंगविणे वगैरे गोष्टी बालपणातच आत्मसात केल्या. गावात शिक्षणाची सोय उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी मँट्रिकपर्यंत शिक्षण आपल्या नातेवाईकांकडे राहून अतिशय कष्टाने पूर्ण केले.१९५२ साली सर जे. जे. आर्टस कॉलेजमध्ये शिल्पकलेची पदवी मिळवली. यावेळी त्यांना मानाचे मेयो सुवर्णपदक मिळाले. १९५४ साली त्यांनी भारतीय पुरातत्त्व खात्यात नोकरीची सुरुवात औरंगाबाद येथे केली. अजिंठा-वेरूळ लेण्यांमधील खराब झालेल्या शिल्पांची डागडुजी करण्याचे काम त्यांनी केले. मात्र १९५८मध्ये त्यांनी दिल्लीला स्थलांतर केले.त्यांच्या शिल्प घडविण्याच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी व्यक्तिशिल्पे,म्युरल्स, एखाद्या संकल्पनेला धरून शिल्प असे अनेक शिल्पकला प्रकार हाताळले. शिल्पकला हा मानवी सर्जनशीलतेचा एक महत्त्वपूर्ण आविष्कार आहे. त्यातून व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यापासून इतिहास ,परंपरा ,सामाजिक मूल्ये प्रतिबिंबित होत असतात. अजंठा वेरूळची लेणी , मोहेंजोदरो व हडप्पा संस्कृतीतील शिल्पे, इजिप्त आणि मेसोपोटियन संस्कृतीतील शिल्पे , प्राचीन भारतीय मंदिरातील शिल्पे जगभरातील शिल्पकलेची अशी अनेक उदाहरणे आपण पाहतो. मायकल एनजेलो , सिनॉन , रॉंद, ब्रँकुशी, विनायकराव करमरकर , हेनरी मूर ,रामकिंकर बैज अशा महान शिल्पकारांचा वारसा राम सुतार मोठ्या ताकतीने गेली आठ दशके चालवीत आहेत.


उत्तर प्रदेशात नोएडा येथे त्यांचे 'राम सुतार आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड' आणि' राम सुतार फाईन आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड'या शिल्प तयार करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्या आहेत. जगभरातील शिल्पकार तेथे भेट देण्यासाठी येत असतात.शिल्पकार म्हणून राम सुतार यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९६० साली चंबळ नदीच्या सिमेंट काँक्रीटच्या प्रतिकात्मक शिल्पाकृतीने झाली. हे ४५ फूट उंचीचे शिल्प चंबळ नदीवरील गांधीसागर धरणाच्यावर आहे. जगभरातील विविध देशात महात्मा गांधींचे त्यांनी साडेचारशेहून अधिक आकर्षक अर्ध पुतळे तयार करून दिलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक महनीय व्यक्तींची शिल्पे त्यांनी तयार केली.त्यांनी तयार केलेल्या शिल्पाकृती संसदभवन,राष्ट्रपती भवन, विविध राज्ये,आणि जगभर आहेत.गुणवत्तेशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. विचारमग्न अवस्थेत असलेले महात्मा गांधी यांचे संसदभवन येथील कलात्मक व्यक्तीशिल्प आणि वल्लभभाई पटेल ह्यांचे सरदार सरोवर येथील उत्तुंग शिल्प त्याची ऑफ युनिटी ही त्यांची सर्वात लोकप्रिय शिल्पे आहेत. ५२२ फूट उंचीचा हा पुतळा जगातील सर्वात मोठा पुतळा आहे . आजही ते अनेक नियोजित कामांमध्ये त्यांच्या मुलांसह व्यस्त आहेत. शंभरीतही सक्रिय असणाऱ्या जगप्रसिद्ध व्यक्तिमत्वाला महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवले गेले हे 'देर आये लेकीन दुरुस्त आये 'असेच म्हणावे लागेल.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post