प्रेस मीडिया लाईव्ह:
पुणे : घरातच प्रिंटर व इतर सामग्रीने बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा शिवाजीनगर पोलिसांनी पर्दापाश केला आहे. टोळीकडून तब्बल २८ लाख ६६ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटा आणि २ लाख ४ हजार रुपयांच्या खऱ्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.या नोटा छापण्याचे अत्याधुनिक साहित्यही जप्त केले आहे. याप्रकरणी दोन महिलांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ते एक लाखाच्या बदल्यात दोन लाखाच्या बनावट नोटा विकत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार कोटक महिंद्रा बँकेच्या सीडीएम मशिनमध्ये २०० रुपयांच्या ५५ बनावट नोटा जमा झाल्याचे दि. १७ एप्रिलला उघडकीस आले. बॅंकेने दिलेल्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी आरोपी मनिषा स्वप्निल ठाणेकर (रा. येरवडा), भारती गवंड (रा. चिंचवड), सचिन रामचंद्र यमगर (रा. गहुंजे) यांना १८ एप्रिलला ताब्यात घेतले.
चौकशीत बनावट नोटांचा मुख्य पुरवठादार नरेश भिमप्पा शेट्टी (रा. लोहगाव) असल्याचे उघड झाले. पथकाने नरेशच्या घरी धाड टाकून २०० रुपयांच्या २० बंडल बनावट नोटा, ५०० रुपयांच्या २ हजार २३२ बनावट नोटा (मूल्य २२ लाख ३२ हजार रुपये), प्रिंटर, शाई, कोरे कागद व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय नरेशच्या कारमध्ये बनावट २०० रुपयांच्या ६४८ नोटा, ५०० रुपयांच्या ३ नोटा मिळाल्या आहेत.
दरम्यान, शेट्टीचा भागीदार आरोपी प्रभू गुगलजेड्डी यालाही पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडूनही बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पोलीस अपर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक के.बी. दाभेराव, पोलीस अंमलदार नलिनी क्षिरसागर, आदेश चलवादी, तेजस चोपडे, गणेश जावर, रुचिका जमदाडे, स्वालंहा शेख (एटीसी) यांनी केली आहे.
असा झाला…पर्दाफाश
यातील दोन्ही महिला आरोपी मनी ट्रान्स्फर तसेच बँकेचे व्यवहार करुन देणाऱ्या एजंट आहेत. यातील एका महिलेने तीच्या मुलाला पैसे दिले होते. त्याने ते पैसे मित्राला दिले. मित्राने ते पैसे एटीएममध्ये भरले. पोलिसांनी एटीएममध्ये पैसे भरलेल्या खातेदाराची माहिती काढली. तेव्हा त्याने हे पैसे मित्राने दिले असल्याचे सांगितले. त्याच्या मित्राला ताब्यात घेतल्यावर त्याने ते आईने दिल्याचे सांगितले. पोलिसांना दोन्ही महिलांना ताब्यात घेतल्यावर त्यांना मुख्य आरोपींचा माग लागला. दोन्ही आरोपी इस्टेट एजंट व इतर मध्यस्थीची कामे करतात. ते मागील महिनाभरापासून हा कारभार करीत असल्याचे सांगत आहेत. मात्र, त्यांनी प्रत्यक्षात बाजारात किती पैसे चलनात आणले आहेत, याचा शोध घेतला जात आहे.