वाहतूककोंडी फोडण्यासाठी कात्रज चौक ते खडी मशिन पर्यंतचा रस्ता तब्बल ८४ मीटर रूंद करण्याचे काम हाती घेण्यात आले

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : महानगरपालिकेकडून कात्रज- कोंढवा रस्त्यावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी कात्रज चौक ते खडी मशिन पर्यंतचा रस्ता तब्बल ८४ मीटर रूंद करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, खडीमशिन चौकापासून पुढे फुरसुंगीपर्यंत हा रस्ता अवघा २४ ते ३० मीटर असल्याने या रस्त्यांवर बाॅटलनेक स्थिती निर्माण होऊन वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.त्यामुळे पुढील रस्त्याला पर्यायी असलेला आणि थेट दहावा मैल (वडकी) पर्यंत सरळ असलेला आरपी (प्रादेशिक आराखडा) मधील ६० मीटर रूंदीचा रस्ता विकसित करण्याचा पर्याय पुढे येत आहे. त्यामुळे कात्रज-कोंढवा रस्त्यावरून सासवडकडे जाणाऱ्या वाहनांना सरळ रस्ता उपलब्ध झाल्यास सध्याच्या रस्त्यावरीत वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

आरपीमध्ये प्रस्तावित असलेला हा रस्ता उंड्री चौकाच्या जवळून प्रस्तावित आहे. हा रस्ता सुमारे ८.८ किलोमीटरचा असून तो थेट वडकी येथे निघतो, तसेच पुढे तो पीएमआरडीएच्या ६५ मीटर रिंगरोडला जाऊन मिळतो. त्यामुळे, कात्रज- कोंढवा रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांना पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या हांडेवाडी, मंतरवाडी, पिसोळी, फुरसुंगीची काही हद्द या भागातून हा रस्ता जातो. त्यामुळे, या गावांमध्ये असलेला हा रस्ता महापालिकेकडून आपल्या मिसिंग लिंक प्रकल्पात घेण्यात आला आहे. मात्र, या गावांचा विकास आराखडा पीएमआरडीए करीत असल्याने या रस्त्याबाबत काय निर्णय घेतला जातोय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, आता पीएमआरडीएचा विकास आराखडा रद्द झाल्याने नवीन आराखड्यात प्राधान्याने हा रस्ता घेण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

सध्या फुरसुंगी ते कात्रज चौक हा रस्ता महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे नगर रस्ता आणि सोलापूर रस्त्यावरून आलेली सर्व अवजड वाहने याच रस्त्याने पुढे मुंबई आणि साताऱ्याकडे जातात. मात्र, हा अस्तित्वातील रस्ता फुरसुंगी ते खडी मशिन चौकापर्यंत अनेक ठिकाणी अरूंद आहे. परिणामी या रस्त्यावर जड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते तसेच अपघातांची संख्याही लक्षणीय आहे. अशा स्थितीत या रस्त्याला पर्यायी असलेला नवीन रस्ता विकसित झाल्यास ही वाहतूककोंडी फोडण्यात प्रशासनाला यश येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post