प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : 'द बिलियन्स हॉटेल' याठिकाणी अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने कारवाई केली. याप्रकरणी हॉटेल चालकासह चौघांविरुद्ध मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.आरीफ शब्बीर शेख ( २४, रा. साईबाबानगर, कोंढवा खुर्द) याच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हे शाखा युनिट पाचचे पथक हद्दीत गस्तीवर होते. त्यादरम्यान मार्केट यार्ड भागात अवैध हुक्का सुरू असल्याची माहिती युनिट पाचचे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांना मिळाली. त्यानुसार पथकाने ‘दि बिलीयन्स हॉटेल' येथे छापा टाकला. त्यावेळी हॉटेलमध्ये हुक्का सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी येथून पॉट, हुक्का फ्लेवर आणि इतर असा एकूण ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पुढील तपासासाठी सर्व आरोपींना मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. युनिट पाचचे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहायक निरीक्षक मदन कांबळे, अंमलदार पृथ्वीराज पांडुळे, प्रमोद टिळेकर, कानिफनाथ कारखेले, उमाकांत स्वामी, शेखर काटे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.