ट्रॅव्हल्स,लक्झरी बसेस वरील पिक-अप बंदी न उठवल्यास १० एप्रिल रोजी धरणे आंदोलन

 ​



प्रेस नोट 

'पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशन ' चा इशारा

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : पुणे शहर आणि परिसरात ट्रॅव्हल्स (लक्झरी)बसेस ला पिक-अप आणि पार्किंगची व्यवस्था करून देण्याचा सरकारचा आदेश (GR) असूनही ट्रॅव्हल्स बसेसला कोठेही अधिकृत पिकअप पॉईंट्स दिलेले नाहीत.या बसेसवर पुणे शहरात वाहतूक पोलिसांनी अन्यायकारी कारवाईचा बडगा चालू ठेवल्याने त्याविरोधात पोलीस उपयुक्त कार्यालय वाहतूक शाखा येरवडा, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे महानगरपालिका या सर्व ठिकाणी १० एप्रिल २०२५ पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशन ने सोमवारी,७ एप्रिल रोजी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशन चे अध्यक्ष बाळासाहेब खेडेकर आणि पदाधिकाऱ्यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हा इशारा दिला. पत्रकार परिषदेत बाळासाहेब खेडेकर,शाम शेट्टी, बसित सिद्दीकी,  रवींद्र मोरे, आनंद लोहे, मारुती नगिने आदी उपस्थित होते.

​असोसिएशनने या संदर्भात पुणे मनपा आयुक्ताना ३ एप्रिल २०२५ रोजी निवेदन देवून बस थांबे,पार्किंग व्यवस्था आणि  पुणे शहरातील वाहतूक पोलिसांची कारवाई याबाबत मागण्या केल्या आहेत. पुणे हे स्मार्ट सिटी म्हणून उदयास आल्याने राज्यातून सर्व शहरातून येणाऱ्या ट्रॅव्हल बसेस ही सार्वजनिक मानली जाणारी सेवा साठी पार्किंग उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पालिकेची आहे. विकास नियंत्रण नियमावली तरतूद करून ही व्यवस्था पालिकेने करणे अपेक्षित होते. 

मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८ च्या कलम ११७ प्रमाणे पिक-अप आणि पार्किंग हे वाहतूक उपायुक्त विभागाने ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना देणे बंधनकारक आहे. तरीही शहरात कोठेही अधिकृत पिकअप पॉईंट्स दिलेले नाहीत. संगमवाडी कडून येरवडा गुंजन चौकातुन जाण्यास बंदी आहे असा वरिष्ठांनी अन्यायकारी कारवाईचा बडगा चालूच ठेवला आहे.

तसेच पिंपरी, चिंचवड, काळेवाडी, सांगवी, कोथरूड, वारजे, येरवडा, खराडी बायपास, वाघोली येथील सर्व ट्रॅव्हल्स व्यवसायिकांना ऑफिस आणि पिकअप बंद करणे बाबत नोटीस पाठविल्या आहेत. या सर्व अन्यायकारी कारवाईच्या विरोधात असोसिएशन आणि सर्व ट्रॅव्हल्स व्यावसायिक,संघटना दिनांक १० एप्रिल २०२५ पासून बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.

मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८ च्या कलम ११७ प्रमाणे पोलीस उपायुक्त (वाहतूक) यांनी थांबे निश्चित करायचे अधिकार आहेत.कलम ११० नुसार या थांब्यांची सूचना प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांनी जारी करायची आहे.१९९९ मध्ये खासगी ट्रॅव्हेल बसेस शहरात येण्यास बंदी करण्यात आली . त्या विरोधात असोसिएशनने उच्च न्यायालयात अर्ज केला.पालिकेने तडजोडीचे प्रतिज्ञा पत्र देऊन पुणे शहरात मध्यवर्ती स्थानक आणि शहराच्या चारही दिशांना पिकअप पॉईंट देण्याचे मान्य केले होते.मात्र,असे थांबे आणि जागा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. राज्य सरकारचा वाहतूक विभाग आणि नगर विकास विभाग यांनी नंतर दोन वेळा सर्व पालिकांना आदेश काढूनही अशा जागा उपलब्ध झालेल्या नाहीत.

असोसिएशनने वेळोवेळी माहिती अधिकारातून मिळवलेल्या माहितीनुसार खासगी ट्रॅव्हल बसेसना मालधक्का चौक,आंबेडकर चौक ,टिळक रस्ता आणि शिवाजी रस्ता वगळता कोठेही बंदी नाही . शासनाच्या एस टी बसेस आणि ट्रॅव्हल बसेस यांना एकच नियम लागू आहे.तरीही खासगी ट्रॅव्हल बसेसवर वाहतूक पोलीस कारवाई करत आहेत. हे चुकीचे आहे आणि ते तातडीनें थांबवावे,अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

.....................

पत्रकार परिषदेत डावीकडून:शाम शेट्टी, बसित सिद्दीकी, बाळासाहेब खेडेकर, रवींद्र मोरे, आनंद लोहे, मारुती नगिने



.

Post a Comment

Previous Post Next Post