प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : एकाही गरीब रुग्णासाठी बेड राखीव ठेवले नाही किंवा, नियमानुसार त्यांच्यावर कमी दरामध्ये किंवा मोफत उपचार केले नसल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे पुणे येथील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीच्या मृत्यूनंतर जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांनी किती रुग्णांना सेवा दिली, याविषयी काही प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर आता धर्मादाय आयुक्त कार्यालयातूनच याबाबतची आकडेवारी समोर आली आहे.
गेल्या वर्षामध्ये पुणे शहरातील 58 पैकी बारा रुग्णालयांनी एकाही गरीब रुग्णासाठी बेड राखीव ठेवले नाही किंवा, नियमानुसार त्यांच्यावर कमी दरामध्ये किंवा मोफत उपचार केले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते डिसेंबर 2024 एका वर्षात पुणे जिल्ह्यातील 86 हजार 826 रुग्णांवर उपचार करण्यात आलेले आहेत. यामध्ये सर्वात जास्त उपचार सिंहगड डेंटल महाविद्यालय अॅड हॉस्पिटलमध्ये करण्यात आले आहेत, तर दीनदयाल मेमोरियल हॉस्पिटल, एन. ए. वाडिया हॉस्पिटलसह इतर बारा रुग्णालयांनी एकाही रुग्णावर मोफत उपचार केले नसल्याची माहिती समोर आली आहे.
केवळ 86 हजार 826 रुग्णांवर केले उपचार
वर्षभरात रुग्णालयात रुग्णांकडून जमा होणाऱ्या एकूण बिलांपैकी दोन टक्के रक्कम धर्मादाय योजनेतून उपचारासाठी राखून ठेवावी लागते. सर्रास रुग्णालये रोखीने बिले घेत असल्याचं वास्तव समोर आलं आहे. सर्वच बिले कागदोपत्री दाखवली जात नाहीत. साहजिकच धर्मादायमधून उपचारही कमी होतात. पुणे शहरासह जिल्ह्यात हजारो कोटींचा उलाढाल होणाऱ्या रुग्णालयात वर्षभरात केवळ 86 हजार 826 रुग्णांना उपचार करण्यात आले आहेत.
गरीब रुग्णासाठी बेड राखीव न ठेवणारी 12 रुग्णालये
महात्मा गांधी नेत्र रुग्णालय
जोशी हॉस्पिटल
रत्ना मेमोरियल हॉस्पिटल
हरजीवन हॉस्पिटल
दीनदयाळ मेमोरियल हॉस्पिटल
एन एम वाडिया हॉस्पिटल मीरा हॉस्पिटल परमार हॉस्पिटल
गिरीराज हॉस्पिटल
डॉ. जल मेहता रुरल क्रिटिकल केअर सेंटर
मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल
काशीबाई नवले जनरल हॉस्पिटल
धर्मादायचा नियम काय...?
धर्मादाय आयुक्तांच्या निर्देशांनुसार संबंधित रुग्णालयावर 'धर्मादाय' असा ठळक उल्लेख करणे अपेक्षित असते. गरीब व निर्धन रुग्णांसाठी 10 टक्के खाटा राखीव असल्याचा फलक रूग्णालयात लावणे आवश्यक आहे. या योजनेची माहिती देणारा स्वतंत्र प्रतिनिधी आणि त्याचा संपर्क क्रमांक प्रदर्शित करणे आवश्यक आहे.