प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : पहलगाम येथील क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, ज्ञान प्रबोधिनीमध्ये गुरुवार,दि.२४ एप्रिल रोजी सायंकाळी निषेध सभा झाली. सभेमध्ये ४०० हून अधिक नागरिक ज्ञान प्रबोधिनीतील उपासना सभागृहात एकत्र जमले.सर्वांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली,काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला आणि भारताच्या नकाशावर आपले विचार लिहून राष्ट्रीय एकात्मतेशी आपले नाते दृढ केले.ज्ञान प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सचिन गाडगीळ,सहकार्यवाह आशुतोष बारमुख तसेच स्वप्नील इंदापूरकर यांची भाषणे झाली.
सभेची सुरुवात 'भारत के जवानो' या जोशपूर्ण गीताने झाली. त्यानंतर प्रबोधिनीचे कार्यकर्ते स्वप्नील इंदापूरकर यांनी या हल्ल्यामागील विचारसरणीवर कठोर शब्दांत टीका केली. “हल्ला करणारे संपले तरी विचार संपत नाही, हिंसक आणि असंस्कृत विचारांचा पूर्ण नाश आवश्यक आहे” असे त्यांनी स्पष्ट केले.गीतेतील श्लोक म्हणत सर्वांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर 'हिंदू ऐक्याची ध्वजा' हे गीत सादर करण्यात आले.
प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सचिन गाडगीळ यांनी काश्मीरमध्ये गेल्या ३० वर्षांपासून सुरू असलेल्या प्रबोधिनीच्या कार्याचा आढावा घेतला. '१९९४ च्या काश्मीरपासून ते आज निषेध करणाऱ्या स्थानिक मुस्लिम मित्रांपर्यंतचा प्रवास देशाच्या एकात्मतेचे उदाहरण आहे',' असे त्यांनी नमूद केले. पाकिस्तानप्रेरित या हल्ल्याचे उद्दिष्ट भारतात धार्मिक तेढ निर्माण करणे आणि काश्मीरमध्ये शांतता भंग करणे असल्याचे त्यांनी सांगितले. याला उत्तर म्हणून बहिष्कार नव्हे, तर संबंध वृद्धिंगत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित करत 'रिस्पॉन्सिबल रिस्पॉन्स' द्यायला हवा,असे नमूद केले.
सभेचा समारोप करताना ज्ञान प्रबोधिनीचे सहकार्यवाह व सीमावर्ती संपर्क सचिव आशुतोष बारमुख म्हणाले, “अतिरेकी दोन राष्ट्रांची भाषा बोलतात, पण भारत एक अखंड राष्ट्र आहे. मुस्लिम अतिरेक्यांना ठोस उत्तर देतानाच देशभक्त मुस्लिमांना बळ देणे, हेच राष्ट्रीय ऐक्याचे खरे रूप आहे.” "कृण्वंतो विश्वम् आर्यम्" या विचारातून कार्यरत राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय ऐक्याच्या दृष्टीने देशविघातक कृत्यांना सामूहिक विरोध करणे, शत्रूबोध असणे, 'आम्हास काय त्याचे' या विचारातून बाहेर येणे, शिवछत्रपतींचा वारसा चालवण्याचा प्रयत्न करणे ही सामूहिक प्रतिज्ञा सर्वांनी केली.सभा राष्ट्रगीताने समाप्त झाली.