कोर्टाच्या आदेशानुसार एकुण आठ गुन्हे दाखल मंचर मध्ये एकच खळबळ.
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
पुणे :- अनेक लोक आपल्या गरजेनुसार घर शेत जमीन यासाठी कर्ज काढून ते परतफेड करत असतात पण मंचर येथील एका पतसंस्थेच्या माध्यमातून कर्जाच्या नावाने कर्जदारावर ज्यादा रक्कम भरून त्यातले लाखो चे रक्कम हडप करण्याचा प्रकार समोर आले आहे यामुळे अनेक कर्जदाराचे घाबरगुंडी उडाली आहे मंचर येथील संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पंतसंस्थेत शेत गहाण खतावर लाखो रुपयांची कर्ज मंजूर केली. त्यापैकी काही रक्कम कर्जदाराला देऊन त्याच्या खात्यावरुन कर्जाची रक्कम परस्पर काढून घेण्यात आली. त्यानंतर आता कर्ज थकल्याचे दाखवून महाराष्ट्र सहकारी संस्थेकडून वसुली दाखला मिळवून वसुलीचा प्रयत्न केला. त्याचबरोबर या कर्जदारांसाठी बनावट जामीनदार दाखविल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे मंचर मध्ये एकच खळबळ उडाली आहे याबाबत जुन्नर न्यायालयाने संचालक मंडळांवर गुन्हा दाखल करुन तपास करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या फसवेगिरी प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचे कार्यक्षेत्र मंचर असल्याने मंचर पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे.
याबाबत नितीन सैद , रामदास थोरात, निलेश वायाळ आणि अविनाश कोकणे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थाचे तत्कालीन अध्यक्ष यतीनकुमार गोविंद हुले (रा. भैरवनाथ गल्ली, मंचर, ता. आंबेगाव), उपाध्यक्ष जगदीश किसनराव घिसे, संचालक अशोक मल्हारी करंडे, संतोष शांताराम भालेराव (रा. कळंब, ता. आंबेगाव), नवनाथ ज्ञानेश्वर बाणखेले (रा. मंचर, ता. आंबेगाव), सतीश अरुण बाणखेले, अशोक दिंगबर गांजाळे, कैलास चंद्रकांत बांगर, दिनकर किसन सैद (रा. मंचर, ता. आंबेगाव), मधुकर निवृत्ती गायकवाड (रा. गावडेवाडी, ता. आंबेगाव), बबन मारुती सोनावणे (रा. पेठ, ता. आंबेगाव), विलास जालिंदर लबडे (रा. जारकरवाडी, ता. आंबेगाव), अशोक लक्ष्मण घुले (र. काठापूर, ता. आंबेगाव), वत्सला एकनाथ जाधव, अनिल दत्तात्रय लबडे (रा. ढोबीमळा, मंचर, ता. आंबेगाव), मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता रवींद्र पोखरकर (रा. पिंपळगाव फाटा, मंचर, ता. आंबेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार २०२० पासून ३१ मे २०२४ दरम्यान घडला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन सुखदेव सैद (वय ४१, रा. गिरवली, सध्या रा. वाशी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना शेती विकास कामे करण्यासाठी २५ लाख रुपयांचे कर्ज हवे होते. त्यांनी संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पंतसंस्थेत जाऊन १० मार्च २०२१ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता पोखरकर यांची भेट घेतली. त्यांनी संस्थेस कर्जासाठी अर्ज करा. संस्था मंजुरी देईन . गहाण खत करावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी घोडेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन शेतजमिनीचे गहाण खत केले. यावेळी पतसंस्थेच्या कर्मचारी शितल ढगे उपस्थित होत्या . त्यानंतर त्यांच्या बँक खात्यात १० लाख रुपये जमा झाले. त्यांनी पतसंस्थेत जाऊन चौकशी केली. मी २५ लाखांचे कर्ज मागितले होते.
१० लाख रुपयेच कसे जमा झाले. तेव्हा पोखरकर यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांनी पतसंस्थेकडून स्टेटमेंट मागितले. तेव्हा त्यांना समजले की पतसंस्थेच्या कर्ज खात्यावर २५ लाख रुपये मंजूर करुन ते पतसंस्थेच्या बचत खात्यात जमा केली. त्यातील १० लाख रुपये त्यांच्या कोटक महिंद्रा बँक खात्यात पाठविले. त्यांच्या बचत खात्यावरुन १२ लाख ८० हजार रुपये ट्रान्सफर झालेले दिसले. परंतु ते कोणाच्या खात्यावर जमा झाले हे स्टेटमेंटमध्ये दिसून आले नाही. त्यानंतर पतसंस्थेने सहायक निबंधक सहकारी संस्थेकडून त्यांच्या जमिनीचे लिलाव करण्याची मंजुरी मिळविली. त्यांच्याकडून एकूण २९ लाख ९८ हजार ४९८ रुपयांची वसुलीचे खोटे दाखले मिळविले, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्याचप्रमाणे रामदास थोरात (रा. चांडोली) यांनी दुध व्यवसायासाठी १० लाख रुपयांचे कर्ज मागितले असता त्यांच्या नावावर २५ लाख रुपये मंजुर केले. त्यापैकी १७ लाख रुपये त्यांना दिले व त्यानंतर त्यांच्या खात्यावरुन ते ट्रान्सफर करण्यात आले. आता त्यांच्याकडून २३ लाख ७४ हजार १०९ रुपयांची वसुली करण्यात येणार आहे.
निलेश बाळशिराम वायाळ (रा. नांदुर) यांनी नवीन घराच्या बांधकामासाठी १० लाखांचे कर्ज मागितले होते. त्यांनी गहाणखत लिहून दिले. त्यात ३५ लाखांची रक्कम पतसंस्थेच्या पदाधिकार्यांनी लिहली. त्यांनी मला १० लाखांची गरज आहे़, असे सांगितल्यावर पतसंस्थेचे चेअरमन हुले यांनी, तुम्हाला जेवढे कर्ज पाहिजे, तेवढी रक्कम घ्या, बाकीचे रक्कम कर्ज खात्यात राहील, असे सांगितले. त्यानंतर त्यांच्या खात्यात ७ लाख रुपये जमा झाले. त्यांच्या नावावर ३५ लाख रुपये कर्ज मंजूर झाले. त्यांच्या कर्ज प्रकरणात निलेश सैद (रा. गिरवली) यांना परस्पर जामीनदार दाखविले. आता त्यांच्याकडून ३७ लाख ७६ हजार ७२ रुपयांची वसुली आदेश काढले आहेतअविनाश कोकणे त्यांच्याकडून कर्जासाठी कोऱ्या फॉर्मवर सह्या घेतल्या. त्यांना कोणतेही पैसे मिळाले नाहीत. तरी त्यांच्या नावावर १५ लाखांचे कर्ज मंजूर करण्यात आले. आता त्यांच्याकडून १७ लाख ३५ हजार ९०६ रुपयांची वसुली आदेश काढले आहेत.
याचप्रमाणे संजिवनी भालेराव यांना रामदास थोरात यांच्यासाठी बनावट जामीनदार दाखविले आहे. निलेश वायाळ यांना अविनाश कोकणे यांच्याशी बनावट जामीनदार दाखविले आहे. दिनेश वायळ यांना नितीन सैद यांच्यासाठी बनावट जामीनदार दाखविले आहे. निलेश सैद यांना निलेश वायाळ यांच्यासाठी बनावट जामीनदार दाखविले आहे. या सर्वांनी आमच्या नावाने बनावट सह्या करुन जामिनदार दाखवून फसवणुक केल्याच्या फिर्यादी दिल्या आहेत.
संत ज्ञानेश्वर नागरी सहकार पतसंस्थेच्या संचालकांनी शेती गहाण खताद्वारे ७५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यापैकी काहीच रक्कम प्रत्यक्ष कर्जदाराला दिली. त्यानंतर कर्ज थकल्याचे दाखवून त्यांच्याकडून १ कोटी ८ लाख ८४ हजार ५८५ रुपयांचे वसुलीचे दाखले मिळवून फसवणुक केली आहे.
याबाबत नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी सांगितले की, जुन्नर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार हे ८ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्यांशी चर्चा करुन गुन्ह्याचे कार्यक्षेत्र मंचर असल्याने मंचर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.