तब्बल १५ वर्षानी क्लीन चिट, पुण्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष.
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
पुणे दि. :- "सब से बडा खिलाडी सुरेशभाई कलमाडी" असे नावाने ओळखले जाणारे आणि काॅंग्रेस पक्षाला भरारी देणारे क्रिडा जगात सर्वात लोकप्रिय असलेले काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश कलमाडी यांना कॉमनवेल्थ गेम्स भ्रष्टाचार प्रकरणात ईडीकडून क्लीनचीट देण्यात आली आहे. २०१० साली कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा झाल्याचे सुरेश कलमाडी यांच्यावरती राजकीय आरोप झाले होते. तब्बल १५ वर्षांनी ईडी कडून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. न्यायालयाच्या निर्णयानंतर पुण्यात कलमाडी यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोष करताना दिसत आहेत.
दिल्ली न्यायालयाने काल (सोमवारी)२०१० सालच्या कॉमनवेल्थ घोटाळा (राष्ट्रकुल स्पर्धाच्या) आयोजन समितीचे माजी प्रमुख सुरेश कलमाडी, तत्कालीन सरचिटणीस ललित भानोत व इतरांविरुद्ध मनी लॉड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे.
ईडीकडून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर
२०१० मध्ये दिल्लीमध्ये कॉमनवेल्थ गेम्स झाले होते. यासाठी विविध प्रकारची कामे आणि कंत्राटे दिली गेली होती. या कॉमनवेल्थ वेळी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप तत्कालीन विरोधी पक्षाने केला होता. यावरून सीबीआय आणि इडी या संस्थांनी स्वतंत्र चौकश्या सुरू केल्या होत्या.या प्रकरणात कॉमनवेल्थ गेम्स ऑर्गनायझिंग कमिटीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, सरचिटणीस ललित भनोट, आणि इतर अधिकाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले होते. त्यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
ईडीने या प्रकरणात मनी लॉन्डरिंग संदर्भात चौकशी केली. चौकशीत, ईडीला असे आढळले की आरोप पुरेशा प्रमाणात सिद्ध होत नाहीत. शिवाय त्यांच्या विरोधात कुठलाही ठोस पुरावा आढळलेला नाही. पैशांची अनधिकृत देवाणघेवाण किंवा आर्थिक गैरव्यवहार थेट या व्यक्तींशी जोडता आला नाही हे ही या चौकशीत समोर आले. त्यामुळे ईडीने न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. शिवाय कलमाडी, भनोट व इतरांवर पुढे खटला चालवण्यास कारण नाही, असं ही स्पष्ट केलं आहे.
यावर दिल्ली कोर्टाने निर्णय दिला आहे. दिल्लीतील विशेष पीएमएलए कोर्टाने ईडीच्या क्लोजर रिपोर्टला मान्यता दिली आहे. सुरेश कलमाडी, ललित भनोट आणि इतरांना या प्रकरणातून क्लीन चिट देण्यात आली आहे.
या व्यक्तींविरुद्ध पुढील तपास किंवा खटला चालवण्याचे कारण दिसत नाही. या निर्णयामुळे सुरेश कलमाडी, ललित भनोट आणि इतरांविरुद्ध मनी लॉन्डरिंग संदर्भातले सर्व आरोप अधिकृतपणे संपले आहेत. असं न्यायालयाने ईडीच्या क्लोजर रिपोर्ट नंतर म्हटलं आहे.