प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : पहेलगाम येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना हिंदूंना नव्हे तर भारतीयांना मारायचे होते , तसेच या घटनेच्या आधारे हिंदू मुस्लिम धृवीकरण करणारे यांचा व दहशतवाद्यांचा धर्म एकच असल्याची टीका नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केली.
पुणे कॅम्प येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शेकडोंच्या उपस्थितीमध्ये पहेलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात कॅन्डल मार्च व निदर्शनाचे आयोजन नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये निषेध सभा देखील घेण्यात आली व या सभेत या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत हल्लेखोरांवर कठोर शिक्षा करावी तसेच दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानवर देखील कठोर निर्बंध लावावे यासाठी सरकारच्या भूमिकेसोबत सर्व भारतीय आहेत असा विश्वास सर्वांच्या वतीने डॉ. सिध्दार्थ धेंडे व रशिद शेख यांनी यांचेद्वारे व्यक्त करण्यात आला. तसेच या अनुषंगाने केंद्र सरकारने सुरक्षा संदर्भामध्ये चूक झाल्याचे मान्य केले असल्याने यातील दोषींवर देखिल कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली.
अंजुम इनामदार यांनी सांगितले की " पाकिस्तानचा दहशतवाद कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय मुसलमान खपवून घेणार नाही. देशात आम्ही एकत्रित राहतो वेळप्रसंगी मुसलमान हिंदूंना तर हिंदू मुसलमानांना मदत करतात अशा पद्धतीच्या दहशतवादी कारवाई करून पाकिस्तानचा हेतू साध्य होणार नाही. "
याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रशीद शेख , माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे , माजी नगरसेवक राहुल तुपेरे , माजी नगरसेवक मुक्तार शेख , रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर , कारी इद्रीस , जाहीद शेख , मुनव्वर कुरैशी , जुबेर मेमण , सुफियान कुरैशी, अहमद सय्यद , सलिम मौला पटेल अंजुम इनामदार , लुकस केदारी , खिसाल जाफरी, सुवर्णा डंबाळे , स्नेहा माने , इब्राहीम यवतमाळवाला, सिध्दांत सुर्वे , राम डंबाळे , सत्यवान गायकवाड , शाकीर शेख , अश्पाक शेख , राहुल नागटिळक , स्वाती गायकवाड, अर्चना केदारी आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन नॅशनल फॉर मायनॉरिटीच्या स्नेहाताई माने , शहाबुद्दीन शेख , आसिफ शेख , प्रतिक डंबाळे यांनी केले होते.