दोषारोपपत्रात प्रथमच गुगल सर्च हिस्ट्री पंचनामा आणि तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणी पंचनामा यांचा समावेश.
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
पुणे :- संपूर्ण राज्यभर गाजलेल्या शिवशाही बस मध्ये तरुणी वर बलात्कार करणार्या नराधम दत्तात्रय रामदास गाडे याच्यावर गुन्हे शाखेने ८९३ पानी दोषारोपपत्र आज शिवाजीनगर न्यायालयात दाखल केले. या दोषारोपपत्रात तब्बल ८२ साक्षीदार असून १२ पंचनामे आहे. त्याचबरोबर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १८३ प्रमाणे ५ जणांचे न्यायालयात जबाब नोंदविण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे दोषारोपपत्रात प्रथमच गुगल सर्च हिस्ट्री पंचनामा आणि तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणी पंचनामा यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय ओळख परेड पंचनामा, सीसीटीव्ही पंचनामा, मेरोरंडम पंचनामा या महत्वाच्या पंचनाम्यांचा समावेश आहे.
फलटणला जाण्यासाठी पहाटे स्वारगेट बसस्थानकावर आलेल्या तरुणीला दत्तात्रय गाडे याने फसवून शिवशाही बसमध्ये जाण्यास भाग पाडले व तिथे तिच्यावर दोनदा बलात्कार केला. या घटनेचा गुन्हा २५ जानेवारी रोजी दाखल झाल्याची माहिती पुढे येताच पुणे शहरासह राज्यभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. स्वारगेट पोलिसांनी दत्ता गाडे याचे नाव निष्पन्न केले. परंतु, गाडे काही पोलीसांच्या हाती लागत नव्हता. शेवटी दोन दिवस शिरुर तालुक्यातील गुनाट गावात शेतीत लपलेल्या गाडेला पकडण्यात यश आले. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे या गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला.
या गुन्ह्यामध्ये वैद्यकीय तज्ञ, सायबर तज्ञ, साऊंड इंजिनिअर, रासायनिक विश्लेषक तज्ञ, फोटोग्राफर यांच्या मदतीने गाडे याच्याविरुद्ध भौतिक, जैविक,वैद्यकीय, तांत्रिक, परिस्थितीजन्य शास्त्रोक्त व इतर असे पुरावे पोलिसांनी जमा केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी गुरुवारी शिवाजीनगर न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. ए. मकानदार यांच्या न्यायालयात दाखल केले.
दत्तात्रय गाडे याच्यावर शिक्रापूर पोलीस ठाणे आणि शिरुर पोलीस ठाणे यामध्ये प्रत्येकी दोन, अहिल्यानगरमधील कोतवाली पोलीस ठाणे, सुपा पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे जबरी चोरी, विनयभंगाचे एकूण ७ गुन्हे यापूर्वी दाखल करण्यात आले होते.
या गुन्ह्याचा तपास प्रामुख्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेशा संखे, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड (गुन्हे शाखा), पुनम पाटील (स्वारगेट पो़), सहायक पोलीस फौजदार ढमाळ, हवालदार नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे, महिला हवालदार जांभुळकर, फडतरे, सूर्यवंशी, चव्हाण, आवाड, कांबळे, पवार,भोकरे यांनी केला. सुरुवातीला या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पुनम पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्याकडे होता. राज्यभर चर्चेचा विषय झालेल्या या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार,सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, प्रविण पाटील, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, राहुल आवारे यांनी मार्गदर्शन केले.