प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे शहरात ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहर पोलिसांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहे, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे.ड्रोनवरील ही बंदी रविवार 6 एप्रिल 2025 पासून लागू करण्यात आली असून ती 5 मे 2025 पर्यंत लागू असणार आहे. या काळात नागरिकांना ड्रोन उडवण्यास बंदी असेल.
यासंदर्भात पुणे शहर पोलिसांनी एक निवेदन जारी करून माहिती दिली आहे. "पुणे शहरात दि. 06/04/2025 ते 05/05/2025 या कालावधीत ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरा मोटर्स, हॅंड ग्लायडर्स, हॉट एअर बलून यांच्या वापरास बंदी आहे. याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांचा निर्णय
दहशतवादी किंवा राष्ट्रविरोधी घटक हल्यासाठी ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायको-लाईट, एअरक्राप्ट, पॅराग्लायडरचा वापर करुन व्हीव्हीआयपींना लक्ष्य करु शकतात. तसेच मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक जीवन धोक्यात आणू शकतात, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करु शकतात आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था बिघडवू शकतात. त्यामुळे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक सक्रीय उपाययोजना म्हणून पोलिसांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांचे आदेश
पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो - लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्ड्स, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलून इत्यादीच्या उड्डाणांवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहे. हे आदेश पुढील 30 दिवसांसाठी म्हणजे आजपासून 6 एप्रिल ते 5 मेपर्यंत लागू असतील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.