जोतिबा डोंगर येथे आणून टाकलेल्या अनोळखीचा झालेला खून अनैतिक संबंधातुन. पोलिसांनी कर्नाटकातून दोघांना ताब्यात घेतले.

  स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कौतुकास्पद कारवाई.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - जोतिबा डोंगर येथील यमाई मंदीर ते गिरोली परिसरात अनोळखी व्यक्तीचा हात तोंड बांधलेल्या स्थितीत मृतदेह आढ़ळला होता.त्याची ओळख पटविण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला यश आले असून आप्पासो शंकर बोरगावे (वय 45 .रा. मोळे ,ता.कागवाड,जि . बेळगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून याचा खून केल्या प्रकरणी गौडप्पा आनंद शिंदे (वय 33. रा. कात्राळ, ता.  कागवाड,जि.बेळगाव) व राजू भिमाप्पा हुलागटी (वय 41. रा. देसाईवाडी ,ता.अथणी ,जि.बेळगाव) या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली.

शनिवार (दि.19 एप्रिल रोजी) अनोळखी व्यक्तीचा कुणीतरी त्याचा गळा दाबून खून केल्याची घटना जोतिबा डोंगर येथे यमाई मंदीर परिसरात घडली होती.याबाबत कोडोली पोलिस ठाण्यात नोंद झाली होती.घटना स्थळी मयत व्यक्तीची ओळख पटविण्यात कोणताही पुरावा नसताना त्याची ओळख पटविणे पोलिसांच्या समोर कठीण काम होते.या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना अनोळखी मयताचा शोध घेऊन आरोपीना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या.

वरिष्ठांनी दिलेल्या सुचने प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना बेपत्ता व्यक्तीचा शोध, सीसीटिव्ही फुटेज द्वारे तपास आणि तांत्रिक माहिती घेऊन तपास करण्यासाठी असे  तीन तपास पथके तयार करून बेपत्ता  व्यक्तीचा शोध घेण्यासाठी नेमलेल्या तपास पथकाने कोल्हापूर ,सोलापूर,सांगली,   सातारा,पुणे,आणि कर्नाटक येथे जाऊन कुणी बेपत्ता व्यक्ती आहे का याचा शोध घेत माहिती घेत होते.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पोलिस अंमलदार हिंदुराव केसरे,सुरेश पाटील,रोहित मर्दाने,राजू कांबळे,रुपेश माने यांच्या पथकाने कोल्हापुर जिल्ह्यातील 120 ते 130 सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता सदर गुन्ह्यातील मृतदेह हा एका ओमनी गाडीतुन जोतिबा डोंगर येथे आणल्याचे निदर्शनास आले.सदर गाडीचा सीसीटिव्ही फुटेज द्वारा शोध घेत असताना जयसिंगपूर येथे ओमनी गाडीचा क्रमांक मिळून आला.सदरची ओमनी कार अथणी येथील राजू हुलागटी याच्या मालकीची असल्याची माहिती मिळाली असता स्थानिक गुन्हे अन्वेषणचे तपास पथक तात्काळ अथणी या ठिकाणी जाऊन ओमनी कारचा मालक राजू हुलागटी याला(ओमनी गाडी नं.KA-22- M-6356 ) या कारसह  ताब्यात घेतले.त्याच्याकडे तपास केला असता मयताच्या भावाचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले होते.त्यामुळे खून झालेल्या व्यक्तीचे त्याच्या भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध निर्माण झाले होते.नजीकच्या काळात मयताची भावजय आणि यातील मुख्य आरोपी गौडप्पा शिंदे यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते .या कारणातुन मयत हा भावाच्या पत्नीस शिवीगाळ करुन मारहाण    करत होता.त्यामुळे मयताची भावजय गौडप्पा शिंदे याला फोन आप्पा बोरगावे याला संपवावे असे सांगितल्यावरुन या गुन्हयांतील मुख्य आरोपी गौडप्पा शिंदे यांने राजू हुलागटी यांच्याशी संगनमत करुन आप्पासो बोरगावे याला( दि .18 एप्रिल ) रोजी रात्री कर्नाटक येथील उगार येथे एका हॉटेलात  दारु पाजली.त्यानंतर ओमनी गाडीत बसवून (दि.19 एप्रिल) रोजी पहाटे दोनच्या सुमारास जोतिबा डोंगर येथील यमाई मंदीरच्या पायथ्याशी त्याचे हात पाय बांधून    आणून त्या ठिकाणी त्याचा गळा दाबून खून केल्याची माहिती दिली.त्यानंतर या गुन्हयांतील मुख्य आरोपी गौडप्पा शिंदे याला त्याच्या रहात्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.त्याने सुध्दा खूनाची कबुली दिली.

या दोन्ही आरोपींना ओमनी कारसह पुढ़ील तपासासाठी कोडोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील,अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.धीरजकुमार बच्चू,उपविभागीय पोलिस अधिकारी शाहुवाडीचे आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव,संतोष गळवे पोलिस अंमलदार हिंदुराव केसरे,सुरेश पाटील,रुपेश माने,रोहित मर्दाने,राजू कांबळे,राम कोळी,वसंत पिंगळे,सतिश जंगम,हंबीर अतिग्रे,बालाजी पाटील ,कृष्णात पिंगळे,अरविंद पाटील,अमित सर्जे आणि प्रशांत कांबळे यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post