प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - इतिहास संशोधक डॉ.इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देऊन छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर सध्या कळंबा कारागृहात आहे. त्याच्या जामीन अर्जावर मंगळवारी दोन्ही बाजूच्या वकीलांनी जोरदार युक्तीवाद केला. त्यामुळे चौथे सह दिवाणी न्यायाधिश एस.एस.तटसो यांनी कोरटकरचा जामीन फेटाळला. परिणामी कोरटकरचा कळंबा कारागृहातच काही मुक्काम वाढणार आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव कळंबा कारागृह प्रशासनाने प्रशांत कोरटकरला मंगळवारी दुपारी १ वाजता व्हिसीव्दारे न्यायालयात हजर केले. यावेळी कोरटकरचे वकील ॲड. सौरभ घाग व फिर्यादी इंद्रजित सावंत यांचे वकील ॲड. असिम सरोदे यांनी व्हीसीव्दारे तर सरकारी वकील सुर्यकांत पवार यांनी न्यायालयात उपस्थित राहून युक्तीवाद केला. जुना राजवाडा पोलीसांनी कोरटकरला जामीन मिळू नये,यामुळे तपासावर परिणाम कशा प्रकारे होऊ शकतो याचे लेखी मुद्दे न्यायालयात सादर केले.
प्रारंभी कोरटकरचे वकील ॲड. सौरभ घाग यांनी युक्तीवाद केला, ते म्हणाले, कोरटकर यांना २५ फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांच्या मित्रांनी फोन करून सांगितले की,सोशल मिडीयावर तुम्ही कोणाला तरी धमकावत आहात, तसेच युगपुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करीत असल्याबाबत व्हायरल झाले आहे. हे ऐकल्यानंतर कोरटकर यांनी नागपूर पोलीसांकडे जाऊन माझा मोबाईल कोणीतही हॅक करून अशा प्रकारचे संभाषण केल्याची महिती दिली. कोरटकरांनी तपासात सहकार्य करत आपला मोबाईल, सीमकार्ड जमा केले. त्यांचे व्हाईस सॅम्पल घेतले आहेत. पोलिसांचा तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे ते जामीनास पात्र आहेत. नैसर्गिक न्यायाने त्यांना जामीन मिळावा.
सरकारी वकील ॲड. सुर्यकांत पवार यांनी युक्तीवाद केला, प्रशांत कोरटकरने युगपुरुषांचा अवमान करून सामाजिक शांतता भंग करणारे कृत्य केले आहे. दोन समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तो कारागृहातून सुटला तर त्याच्या वक्तव्याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय साक्षीदारांवरही दबाव टाकू शकतो. त्यांला सहकार्य केलेल्या लोकांची त्याने नावे दिली आहेत,पोलीसांनी त्यांना चौकशीला बोलावले आहे,मात्र ते अद्याप आलेले नाहीत. कोरटकर जामीनावर सुटला तर तपास कामात अडथळे येणार आहेत. गुन्हा दाखल झाल्यावर तो पळून गेला होता. जामीनावर सुटल्यानंतरही तो सापडेल असे वाटत नाही. त्यामुळेच जामीन नामंजूर केला जावा.
फिर्यादी इंद्रजित सावंत यांचे वकील ॲड.असीम सरोदे यांनी म्हणणे मांडताना प्रशांत कोरटकरचे जामीनासाठी दाखल केलेल्या अर्जावर ज्या सह्या केल्या आहेत. त्यातील प्रत्येक सहीमध्ये तफावत आहे. तो न्यायव्यवस्थेला फसवू शकतो. त्यामुळे जामीन मिळाल्यास तपासात सहकार्य करणार नाही. इंद्रजित सावंत इतिहास अभ्यासक आहेत. त्यांच्यावर कुठेही गुन्हा दाखल नाही, मात्र त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याची खोटी माहिती न्यायालयात पुरवतो. अशा खोटारड्या आरोपीचा जामीन नाकारला जावा.
दोन्ही बाजूच्या वकीलांनी तास ते दिड तास व्यक्तीवाद केला. यासाठी वेगवेगळ्या खटल्यांचे दाखले सादर केले. दुपार पर्यत जामीन अर्जाचा निकाल न्यायाधिशांनी राखून ठेवला. शेवटी सायंकाळी पाच वाजता न्यायाधिश एस.एस.तटसो यांनी प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला . या सुनावणीला फिर्यादी इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे यांच्यासह कार्यकर्ते हजर होते.
"जामीन अर्ज फ़ेटाळल्यामुळे कोरटकरच्या अडचणीत वाढ.!
सुरक्षेच्या कारणास्तव प्रशांत कोरटकरला कळंबा कारागृहात अतिसुरक्षीत अंडा बरॅकमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याला इतर कैद्यांमध्ये सोडले जात नाही. त्याचा जामीन फेटाळल्यामुळे कारागृहातील मुक्काम वाढला आहे. कोरटकरच्या अडचणीत वाढ होत असल्याचे दिसून येते. त्याच्यावर दाखल असलेली कलमे जामीनपात्र असली तरी सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करणारा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याने जामीन फेटाळला आहे.