प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयात हृदयविकाराने मृत्यू झालेल्या एका महिलेच्या मृतदेहाची सीपीआरमधील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने हेळसांड केल्याचा आरोप मयत महिलेच्या नातेवाइकांनी केला. या वेळी संतप्त झालेल्या महिलांनी अपघात विभागातील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला चांगलेच धारेवर धरल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि लक्ष्मीपुरी पोलिसांनी सीपीआर येथे घटना स्थळी धाव घेऊन संतप्त झालेल्या महिलांची समजूत काढल्याने तणाव निवळला. हा प्रकार रविवारी (दि. १३) रोजी दुपारी घडला.
अधिक माहिती अशी की , शाहूपुरी येथे आठव्या गल्लीत रहात असलेल्या अश्विनी संजय आदवडे (वय ३९) या रविवारी दुपारी कामानिमित्त दुचाकीवरुन शुक्रवार पेठेत गेल्या होत्या.त्यांना दुचाकी चालवित असताना् चक्कर येऊ लागली. त्यांनी जैन गल्ली येथील एका रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवताच त्या खाली कोसळल्या. याची माहिती मिळताच त्या परिसरातील त्यांच्या काही मैत्रिणी मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन तात्काळ अश्विनी यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, हृदयविकाराच्या त्यांना जोरात झटका आल्याने त्यातच त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.मृत महिलेचे नातेवाईक येईपर्यंत मृतदेह झाकून ठेवावा, अशी विनंती महिलांनी तेथील अपघात विभागातील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला केली. मात्र, नर्सिंग स्टाफने महिलांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून तुम्ही स्वत:च बेडशिट घेऊन मृतदेह झाकून ठेवा, असे सांगितले.
महिलेच्या मृतदेहाची हेळसांड करून मोबाइलमधील रील्स पाहण्यात दंग असलेल्या नर्सिंग स्टाफला जाब विचारत संतप्त महिलांनी धारेवर धरले. तेथे उपस्थित असलेल्या महिलांनी प्रश्नांचा भडिमार करीत डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफची बोलतीच बंद केली. याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना मिळताच लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक डी. डी. देठे आपल्या सहकाऱ्यांसह अपघात विभागात दाखल झाले. दरम्यान सीपीआरमधील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश कांबळे यांनी संतप्त झालेल्या महिलांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली. या घडलेल्या घटनेने अपघात विभागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.