प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - रागाने बघत असल्याच्या कारणातुन सराईत गुन्हेगाराने पानपट्टी दुकानदारावर कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातील सायबर चौकात रविवारी रात्री साडेनऊ वाजता हा प्रकार घडला. यात श्रीनंद महादेव वडर (वय २४, रा. सायबर चौक) हा जखमी झाला असून पोलिसांनी सराईत गुन्हेगार अजय अनिल पाथरुट (वय २८) यास अटक केली आहे.
अजय पाथरुट हा रविवारी रात्री पाथरुट वसाहतीमधील चौकात उभा होता. यावेळी फिर्यादी श्रीनंद वडर हा आपल्या पानपट्टी दुकानात बसला होता. श्रीनंद आपल्या एका सहकाऱ्यासोबत बोलत होता, यावेळी अजय तेथे आला. त्याने श्रीनंद यांच्याकडे बघत 'तू माझ्याकडे रागाने का बघतोस असा जाब विचारला. यावेळी अजयने रस्त्यात उभी केलेली दुचाकी लाथ मारून खाली पाडली, तसेच तेथे उभ्या असलेल्या रिक्षाचा आरसा हाताने फोडला.
फिर्यादी श्रीनंद व रिक्षाचालक असे दोघेजण अजय पाथरुट याच्या घरात गेले, त्यांनी अजयची आई-वडील यांना याबाबत सांगत होते, यावेळी अजय तेथे गेला. त्याने दोघांना शिवीगाळ करत कोयता हातात घेऊन श्रीनंद याच्या कानाजवळ वार केला. तो जखमी होऊन खाली पडला. यावेळी त्याला तेथील नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले.
श्रीनंद याने उपचार घेतल्यानंतर सोमवारी दुपारी राजारामपुरी पोलीस ठाण्यात जाऊन हल्लेखोर अजय पाथरुट याच्या विरोधात फिर्याद दिल्याने पोलिसांनी याच्यावर मारहाण, शिवीगाळ व दहशत माजवण्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करीत आहेत.
---