प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - गेल्या काही दिवसापासून कंळबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केल्या प्रकरणी आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोल्हापूर पोलीसांनी नागपूरच्या प्रशांत कोरटकर याला अटक केली होती. न्यायालयाने त्याला बुधवारी जामीन मंजूर केल्याने शुक्रवारी त्याला कळंबा कारागृहातून सोडण्यात आले. मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये त्याला कोल्हापूर विमानतळावर सोडण्यात आले.कोरटकर हा मुंबई मार्गे विमानाने नागपूरला रवाना झाला. यावेळी कारागृहाच्या परिसरात पोलिस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी नागपूर येथील प्रशांत कोरटकर याने आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.त्याच प्रमाणे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी ही दिली होती. या प्रकरणी त्याच्यावर कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. जुना राजवाडा पोलिसांनी त्याला तेलंगणा येथून २४ मार्च रोजी ताब्यात घेतले होते. त्यानंतर न्यायालयात त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने १७ दिवसानंतर त्याला सशर्त जामीन दिला. मात्र जामिनासाठीचा ५० हजारांचा जातमुचलका आणि कागदपत्रे वेळेत हजर केली नसल्याने, कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम आणखी दोन दिवसांनी वाढला होता. दरम्यान प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी त्यांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करून पोलिस बंदोबस्त पुरवण्याची मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात त्याला दुपारी सव्वादोन वाजता कळंबा कारागृहातील अंडा सेल मधून बाहेर काढले. कारागृहाबाहेर पोलिसांचे जलद कृती दलही तैनात करण्यात आले होते. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक संतोष गळवे, राजारामपुरीचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचारी कारागृह परीसरात बंदोबस्तावर होते.