सुरेश भट हे सर्वार्थाने अफाट व्यक्तिमत्व होते

 सुरेश भट जन्मदिन आणि गझलसाद वर्धापनदिन कार्यक्रमात ज्येष्ठ गझलकार भीमराव धुळूबुळू यांचे प्रतिपादन 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.१३, सुरेश भट हे सर्वार्थाने अफाट व्यक्तिमत्व होते. मराठी भाषा सर्वसामान्य माणसांनीच समृद्ध केली आहे असे म्हणणाऱ्या सुरेश भट यांनी मराठी भाषेत कवितेची अनमोल भर घातली. कवितेतील गझल हा काव्यप्रकार त्यांनी मराठीत अतिशय शुद्ध पद्धतीने रुजवला आणि फुलवला. स्वतः अतिशय उत्तम गझल लेखन करून शास्त्र शुद्ध पद्धतीने गझल लिहिणाऱ्या काही पिढ्या त्यांनी घडवल्या. आज मराठीत गझल काव्यप्रकार ज्या दिमाखाने सर्वत्र संचार करीत आहे आणि त्याला जी रसिक मान्यता मिळत आहे  त्याचे मोठे श्रेय सुरेश भट यांचे आहे. असे मत ज्येष्ठ गझलकार कवी आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष प्रा. भीमराव धुळूबुळू यांनी व्यक्त केले. मराठी गझल विद्यापीठाची संस्थापक फुलपती सुरेश भट यांचा ९३ वा जन्मदिन आणि गझलसाद संस्थेचा आठवा वर्धापन दिन या कार्यक्रमात 'सुरेश भट आणि मराठी गझल 'या विषयावर ते बोलत होते. यावेळी त्यांनी सुरेश भटांच्या अनेक गझलांचा संदर्भ देत अनेक आठवणीही विशद केल्या .समाजवादी प्रबोधिनीचे प्रबोधन वाचनालय आणि गझलसाद (कोल्हापूर )यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. नरहर कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुणे भीमराव धुळूबुळू यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले. भीमराव धुळूबुळू यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी झालेल्या मुशायऱ्यात डॉ. दिलीप कुलकर्णी , हेमंत डांगे , नरहर कुलकर्णी ,डॉ. दयानंद काळे, सारिका पाटील , राहुल राजापूरे आणि  प्रसाद कुलकर्णी आदी गझलकार सहभागी झाले होते. या मुशायऱ्याचे अतिशय उत्तम सूत्रसंचालन सारिका पाटील यांनी केले.सर्व गझलकारांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत जयकुमार कोले व पांडुरंग पिसे यांनी केले.


मुशायऱ्याची सुरुवात ज्येष्ठ गझलकार डॉ.दिलीप कुलकर्णी यांनी धुरळ्यापरी उडालो स्वप्ने फुटून मी ,बसलो उगा तरीही दिसतो उठून मी ,नाहीच मी प्रतापी ऐसे कसे म्हणू ? ,दस-यास आणतो की सोने लुटून मी अशा शब्दात मी चे महत्व वेगळ्या पद्धतीने सांगत केली. तर नरहर कुलकर्णी यांनी हवा मोकळी जर तुला पाहिजे,मनाचा झरोका खुला पाहिजेे,हवेशी खरा खेळायला तुझ्या अंगणाला झुला पाहिजे अशी मोकळेपणाची गरज अधोरेखित केली.हेमंत डांगे यांनी करार झाला तुझ्या गुलाबी मुलाखतीचा,इथे कशाला सवाल माझ्या अधोगतीचा ?,स्मृतींचे वाढते ओझे जरी सांभाळले होते ,जपायासारखे‌ नाते कुणाशी जोडले होते? असे म्हणत नात्यांचे जपणेपण आणि तुटणेपण स्पष्ट केले. डॉ.दयानंद काळे यांनी सामाजिक राजकीय परिस्थितीवर विकास वेडा लपून आहे ,फरार प्रगती म्हणून आहे ,अफूस निद्रा पिढ्यापिढ्यांची ,समाज सारा पिऊन आहे या गझलेतून कोरडे ओढले.


राहुल राजापूरे यांनी शहरात श्वास माझे, हे कोंडलेत आता,खेड्याकडील रस्ते, मी शोधलेत आता,ना माडगे नि डांगर, ठावे कुणास येथे,बर्गर पनीर पिझ्झा, फोफावलेत आता, असे म्हणत भावणारे गावपण आणि हरवलेले शहरपण यातील भेद स्पष्ट केला. सारिका पाटील यांनी माझे तुमचे यांचे त्यांचे सगळे असेच होते,प्रत्येकाचे रडणे नवीन दुखणे जुनेच होते,दाखवू नये भळभळणारी जखम कुणाला हल्ली,बाकी काही होतच नाही केवळ हसेच होते असे म्हणत सामाजिक मानसिकता कोणत्या दिशेने जात आहे ते स्पष्ट केले.प्रसाद कुलकर्णी यांनी ,वारापेक्षा वारीने समतेचा जागर होतो मी प्रबोधनाची दिंडी त्यासाठी काढत होतो,केवळ लिहिण्यासाठी मी नाहीच कधी लिहिलेले,जग बदलावे यासाठी मी पाने खरडत होतो अशा शब्दात समता प्रस्थापनेसाठीच्या लेखनाची भूमिका मांडली.मुशायऱ्याचा समारोप करताना अध्यक्ष भीमराव धुळूबुळू  कशाला धर्म जातीने चळाया लागला आता ,अशाने देश हा माझा जळाया लागला आता ,गीता कुराण सारे जोषात आज येथे ,हे संविधान माझे धोक्यात आज येथे असे म्हणत संविधानाच्या तत्त्वज्ञानाचे महत्त्व करत आणि त्याला असलेल्या धोक्याना ओळखले पाहिजे अशी भूमिका मांडली. एकूणच हा मुशायरा विविध प्रकारच्या उत्तम गझलानी समृद्ध झाला. त्याला रसिकांचीही वाहवा मिळाली.या कार्यक्रमास सुभाष नागेशकर,संजय होगाडे, दिलीप शेंडे, अहमद मुजावर, प्रा.अशोक दास, इ.आर.कुलकर्णी, अरुण दळवी, नौशाद शेडबाळे, रिटा रॉड्रिक्स,मनोहर मुदगल,दिलीप शिंगे,राजू नदाफ, अजित मीणेकर, अरुण दळवी , सचिन पाटोळे यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post