प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी :शालेय गुणवत्ता वृद्धी आणि स्वच्छता या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेली "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" योजना २०२४-२५ अंतर्गत टप्पा क्र. २ मधील विजेत्या शाळांचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी श्रीमत नारायणराव घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
हा सोहळा जिल्हा परिषद कोल्हापूर, पंचायत समिती हातकणंगले व इचलकरंजी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मा. धैर्यशील माने, आमदार डॉ. राहुल आवाडे आणि आमदार डॉ.अशोकराव माने यांची उपस्थिती लाभली होती.
या वेळी आमदार डॉ. राहुल आवाडे म्हणाले, "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेमुळे महाराष्ट्रातील शाळांमध्ये शैक्षणिक व भौतिक विकास घडून आला आहे. अशा उपक्रमांतून भविष्यातील पिढ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध राहील." ते पुढे म्हणाले, "शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना संशोधक सुभाष खोत आणि प्रशासकीय अधिकारी विकास खारगे यांच्यासारखे घडवण्यासाठी प्रयत्नशील राहावे."
खासदार धैर्यशील माने यांनी उपस्थित शिक्षकांना उद्देशून म्हटले, "देशाच्या विकासाचा खरा पाया म्हणजे सरकारी शाळा. शिक्षकांनी आपली भूमिका प्रामाणिकपणे बजावल्यास आपला देश अधिक सशक्त होईल," असे सांगून त्यांनी सर्वांचे मन जिंकले.
या संपूर्ण सोहळ्याचे अचूक व काटेकोर नियोजन प्रशासन अधिकारी इरफान पटेल यांनी केले होते. त्यांच्या नियोजनशैलीचे सर्व मान्यवरांनी मुक्तकंठाने कौतुक केले.
या कार्यक्रमात पुढील शाळांनी यश संपादन केले:
शासकीय गट - तालुकास्तरावर:
विद्या मंदिर संभाजीनगर, सावई – प्रथम क्रमांक
संजीवन विद्या मंदिर, चंदूर – द्वितीय क्रमांक
कन्या विद्या मंदिर, रेंदाळ – तृतीय क्रमांक
शासकीय गट - जिल्हास्तरावर:
कन्या विद्या मंदिर, तारदाळ (केंद्र: आळते) – जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक
अशासकीय गट – विभागीय निवड:
स्वा. सै. मारुती गणपती पाटील आदर्श विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, मिणचे
अशासकीय गट - तालुकास्तरावर:
इचलकरंजी हायस्कूल, इचलकरंजी – प्रथम क्रमांक
ए.पी. मगदूम हायस्कूल, माणगांव – द्वितीय क्रमांक
न्यू इंग्लिश स्कूल, रेंदाळ – तृतीय क्रमांक
कार्यक्रमासाठी उपायुक्त अशोक कुंभार, डॉ. शबाना मोकाशी (गटविकास अधिकारी, हातकणंगले), नम्रता गुरसाळे (तालुका शिक्षण विस्तार अधिकारी), रवींद्र चौगले (गटशिक्षणाधिकारी), अजय कुमार बिरनगे (शिक्षण विस्तार अधिकारी) शाहनूर कमलशाह. सर्व केंद्रप्रमुख, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.