प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co
दुसऱ्याला कर्म भ्रष्ट ठरवले की लोक आपल्याला कर्मवीर म्हणू लागतील असा काही मंडळांचा समज असतो.अर्थात तो गैर असतो. त्याच पद्धतीने काही धर्मांध मंडळी आपला धर्म श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी परधर्माला नाव ठेवताना दिसतात.परधर्म द्वेष हे त्यांच्या धर्मप्रेमाचे(?)ब्रीद असते.आज धर्मनिरपेक्ष भारताला धर्मराष्ट्र करण्याचा विडा उचलून काम करणाऱ्या मंडळींचा धर्म कोणताही असला तरी प्रत्येकाच्या धमन्यातून वाहणाऱ्या रक्ताचा रंग एकच असतो यावरही विश्वास राहिलेला नसावा असे वाटते. कारण काही धर्मातील धर्मांधशक्ती द्वेषाच्या आगीमध्ये तेल ओतण्याचे काम जाणीवपूर्वक करत आहेत.या धर्मांध शक्तीनी आपापला आर्थिक पाया मजबूत करून घेऊन त्यावर आधारित राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात दुकानदारी करण्याचे काम सुरू केलेले आहे.धर्मवादी राष्ट्रवाद अधिक घातक ,आक्रमक आणि क्रूर रुप धारण करतो आहे. मुसलमान म्हणजे दहशतवादी ,परकीय ,धोकेबाज ,शत्रू , अविश्वसनीय,देशद्रोही असे समीकरण रुजवण्याचा उद्योग सुरू केला आहे. ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी भारतीय जनतेत कायमची फूट ठेवण्यासाठी मध्ययुगीन भारताचा खोटा इतिहास भारताच्या शिक्षणात आणला. त्याने या धर्मांधाना प्रचाराला मदत केली आहे.
ब्रिटिश इतिहासकार जेम्स मिलने भारताचा इतिहास प्राचीन भारताचा इतिहास ,मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास अशा तीन खंडात लिहिला. पण त्याने प्राचीन भारताच्या इतिहासाला हिंदूयुग, मध्ययुगीन भारताच्या इतिहासाला मुस्लिम युग आणि आधुनिक भारताच्या इतिहासाला ब्रिटिश युग अशी नावे दिली. ब्रिटिश युगाला त्याने ख्रिश्चन युग म्हटले नाही हेही लक्षात घेतले पाहिजे. हाच इतिहास पाठ्यपुस्तकातून शिकवण्यात आला त्याचा फार मोठा विपरीत परिणाम भारतीय समाज माणसावर झाला. मुस्लिम आक्रमक होते त्यांनी हिंदूंचे वैभवशाली साम्राज्य नष्ट केली, हिंदूंचे धर्मांतरण केले, हिंदू स्त्रियांवर जाणीवपूर्वक आणि अत्याचार केले मंदिरे तोडली, अतिशय जुलमी पद्धतीने सत्ता राबवली असा एक भ्रम या मध्ययुगीन इतिहासातून पसरवण्याचा पद्धतशीर उद्योग ब्रिटिशांनी केला.
हा उद्योग भारतीय मुसलमानांवर अन्याय करणारा आहे तसाच तो भारतीय एकात्मतेची, धर्मनिरपेक्षतेची, लोकशाहीची शकले करणारा आहे. त्यामुळे भारतीय समाज विकासातील मुस्लिमांचे योगदान आणि भारतीय ऐक्याची परंपरा समजून घेण्याची गरज आहे. तसेच इंग्रज हिंदूंना म्हणत की आम्ही गेल्यावर मुसलमान तुमच्यावर पूर्वीप्रमाणे राज्य करतील.तर मुसलमानांना म्हणत की हिंदू संख्येने जास्त आहेत आम्ही गेल्यावर ते तुमचा सूड उगवतील.
आर्य आणि मुस्लिम दोघेही भारतात बाहेरून आले.पण ते दोघेही इथल्या मातीत संस्कृतीत रुजले आहेत,वाढले आहेत. हे दैनंदिन सामाजिक व्यवहारातून आणि आपल्या सांस्कृतिक ऐतिहासिक खुणांवरून स्पष्ट होते.मात्र ब्रिटीश राज्यकर्त्याच्या राजनितीच्या सोयीसाठी ब्रिटिश इतिहासकारानी हिंदू मुस्लिम भेद व वैर यांची मतलबी मांडणी केली. तिची छाप हिंदू मुस्लिमांच्यातील पहिल्या व दुसऱ्या पिढीतील विचारवंतांवर पडली.आणि ही भेजनीती हेच जणू सत्य आहे अशी भूमिका सर्वत्र रूढ झाली. साम्राज्यशाही विरोधी स्वातंत्र्य लढ्यात आणि शोषणविरोधी श्रमजीवी जनतेच्या समतेच्या लढ्यात तिच्यावर काहीशी मात झाली. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संसदीय पद्धतीतील अधिकाधिक फायदे व सत्तास्थाने मिळवण्याच्या छुप्या व उघड धर्मांध व परधर्मद्वेष्ट्या राजकारणाने उचल खाल्ली .आणि पुन्हा धर्मद्वेषावर आधारलेल्या राजकारणाला गती मिळाली. धर्म द्वेषावर आधारित राजकारण करणाऱ्या शक्ती स्वातंत्र्याच्या अर्धशतकानंतर केंद्रामध्ये सत्तेतही आल्या. हे सारे खरे असले तरी भारतीय समाज जीवनात विशेषता ग्रामीण भागातील सर्वसामान्य हिंदू मुसलमानात भेदनितीपेक्षा ऐक्यनीती प्रभावी आहे हे समाजाकडे डोळस पाहिल्यानंतर स्पष्टपणे दिसून येते. गावोगावी होणारे उरूस आणि यात्रा यातूनही या एकतेचे दर्शन गेली शेकडो वर्ष घडत आले आहे.
इस्लाम या शब्दाचा अर्थ अरबी भाषेतील अर्थ ईश्वरचरणी शरण जाणे असा आहे. तर मुस्लिम या शब्दाचा अर्थ ज्याने इस्लामचा स्वीकार किंवा अंगीकार केला आहे असा आहे.इस्लाम हा एक प्राचीन परंपरा असलेला धर्म आहे. मुसलमानांचे भारतात आगमन झाले त्याला आता चौदाशे वर्षे झाली आहेत. आठव्या शतकातील अरबांच्या स्वाऱ्यांपासून सामान्यतः मुसलमान लोक भारतात येऊ लागल्याचे दिसते. या चौदाशे वर्षापैकी पाचशे ते सहाशे वर्षे भारताच्या मोठ्या प्रदेशावर मुसलमानांची राजवट होती.मात्र तरीही या काळात हिंदू मुस्लिम यांच्यात धर्मावर आधारलेले कलह , दंगली झाल्याचे दिसले नाही. कारण राज्यकर्ते राज्यसत्ता आणि धर्मसत्ता यांची एकमेकात सरमिसळ करत नव्हते. आणि लोकही राज्यकर्त्यांचा धर्म पाहून वागत नव्हते. त्यामुळे तणाव विहिरीत एकजिनसी असाच हा कालखंड होता. जे दंगे, तंटे होते ते राजकीय अगर आर्थिक कारणाकरता होते. धार्मिक बाबतीत हिंदू आणि मुसलमान यांच्यातील सहकाराच्या आणि सहभागाच्या परंपरा अजूनही गावोगाव सुरूच आहेत.
बाराव्या शतकानंतर फार मोठ्या प्रमाणात सुफी संत भारतात येऊ लागले. त्यांची भक्ती ध्यानधारणा समाधी यायोगे परमेश्वरप्राप्ती करण्याची आणि माणसा माणसात कसलाही भेदभाव न मानणारी पद्धती पाहून वर्ण व्यवस्थेने पिचलेला भारतातील बहुजन समाज मोठ्या प्रमाणात सुफींच्याकडे ओढला गेला. दिल्लीचे निजामुद्दीन अवलिया, अजमेरचे मोईद्दीन चिस्ती, गुलबर्गाचे बंदे नवाज, शिरहिंदचा अहमद शीरहिंदी बिहारचे शरफुद्दीन मुनेरी, अलाहाबादचे मुहिबुल्ला महाराष्ट्रातील शेख महंमद असे असंख्य सुफी संत होऊन गेले.
हिंदूंचे धर्माचरण व मुस्लिमांचे धर्माचरण यात फारसे अंतर उरले नाही. त्यामुळे भारतातील बहुजन समाजातील अठरा आलुतेदार व बारा बलुते दार,कारागीर, सर्वसामान्य लोक धर्मांतर करून मुस्लिम बनले हेही लक्षात घेतले पाहिजे. भारतातील भक्ती चळवळ आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय यांचे कार्य वाढण्यास सुफी संतांच्या कार्याची मोठी मदत झाली आहे. तसेच शहामुनी, शहा नवरंग ,जंगली फकीर, सय्यद हुसेन, वाजिद पठाण ,शहा हुसेन फकीर, शहा अली, महंमदशा फकीर ,हुसेन खान असे कितीतरी मुस्लिम संत होऊन गेले त्यांनी समतेची शिकवण दिली. सर्वधर्मांचा आदर करायला शिकवले.
इतिहास व राष्ट्राचे आत्मचरित्र असते असे न्यायमूर्ती रानडे यांनी म्हटले होते. त्या अर्थाने पाहता इंग्रज येण्यापूर्वी हिंदू मुस्लिम ऐक्यच भारताच्या आत्मचरित्रात दिसते. इंग्रजांच्या भेदनीतीने त्याला तडे पाडले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी एक ठिकाणी लिहिले आहे की ' १८५७ ची क्रांती राष्ट्रीय ऐक्याचे मोठे उदाहरण आहे. बहादुरशहा च्या मुस्लिम ध्वजाखाली समाजातील सर्व धर्माच्या व्यक्ती एकत्र आल्या. तेव्हापासून भारतीय मुसलमानानी भारतीय स्वातंत्र्यासाठी सतत काम केलेले आहे. मुसलमानेतर लोक या देशाची जशी मुले आहेत मुसलमान ही अगदी तशीच मुले आहेत. त्यांचे हितसंबंध सारखे आहेत.जसा आयर्लंडमध्ये अस्टरचा प्रश्न , पॅलेस्टाईन मध्ये ज्यूंचा प्रश्न ब्रिटिशांनी निर्माण केला तसाच भारतीय मुसलमानांचा प्रश्न त्यांनी कृत्रिमरित्या निर्माण केलेला आहे. ब्रिटिश सत्ता गेली की हा प्रश्न बाजूला पडेल.'
पण ब्रिटिश जाऊनही हा प्रश्न बाजूला पडला नाही. कारण स्वातंत्र्या बरोबरच अपरिहार्यपणे भारताची फाळणीही झाली.भारत पाकिस्तान असे दोन तुकडे झाले. धर्मांध शक्तीना खतपाणी घालून पद्धतशीरपणे ब्रिटिशांनी फाळणी घडवून आणली. मनामनातील ऐक्यामध्ये किल्मिश निर्माण झाले. स्वातंत्र्यानंतर ही धर्मांध शक्ती अशाच वाढत राहिल्या. धर्मवादी व धर्मद्वेष्टे राजकारण तग धरू लागले .त्यातून नवा इतिहास रचण्याचे कपटकारस्थान सुरू झाले. ध चा मा करणे सुरू झाले. इतिहासापासून राज्यघटनेपर्यंत आणि गावांच्या नावापासून ते ऐतिहासिक प्रार्थना स्थळांपर्यंत सर्व गोष्टी बदलण्याचे षडयंत्र सुरू झाले. मूलभूत प्रश्न गाडून टाकून सत्तेचा पोळी मिळवण्यासाठी नको ते प्रश्न उकरून काढले जाऊ लागले, जात आहेत. जनतेला रोजगार मिळवून देऊन त्यांचे घर उभारण्यापेक्षा कबर उध्वस्त करण्याचे राजकारण अग्रक्रमावर येऊ लागले.
भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत.माझ्या देशावर माझे प्रेम आहे. इथल्या विविधतेचा आणि परंपरांचा मला अभिमान आहे. असं असे सांगणारी तसेच राज्यघटनेचा सरनामा अभ्यासाच्या पुस्तकाच्या अग्रभागी छापून आत मध्ये मात्र वेगळेच धडे देण्याचा सपाटा सध्या सुरू आहे.अन्य धर्मीयांनी या देशात राहू नये, राहायचे असेल तर दुय्यम नागरिकत्व घेऊन किंवा आमच्या कृपाप्रसादावर जगावे असे मत बहुधर्मीयांपैकी काही नाठाळांचे असते. पण ते असे स्पष्टपणे न म्हणता हा आशय वेगवेगळ्या पद्धतीने लोकमानसावर बिंबवण्याचा प्रयत्न करत असतात. भारताची आज जी दुरावस्था झालेली आहे त्या दुरावस्थेला आणि दारिद्र्यापासून बेरोजगारी पर्यंतच्या सर्व प्रश्नांना मुसलमान राज्यकर्ते ,मुसलमान लोक आणि स्वातंत्र्यानंतर काही दशके सत्तेवर असलेली काँग्रेस जबाबदार आहे असे हे तिरपागडे धादांत असत्य संशोधन असते. शाही इमाम बुखारी आणि त्यांचा वारसा चालवणारे काही नतद्रष्ट मंडळी हे जनतेला खरेच वाटावे असे वक्तव्य करीत असतात .वाचाळ, बेताल ,हिंसक वक्तव्य करणारे नेते मग त्रिशूल वाटण्याचा मुद्दा देशांपुढील आग्रक्रमाचा प्रश्न म्हणू शकतात.खरंतर दोन्ही धर्मांधांना या देशाचा इतिहास, वर्तमान आणि भविष्याशी काहीही देणे घेणे राहिलेले नाही. ही मंडळी मूठभर नव्हे तर चिमूटभरही नाहीत. पण हे चिमूटभर विषच देशाच्या इतिहासाच्या ,एकात्मतेच्या नसा कमजोर करून देशाला अर्धांगवायूचा झटका आणू शकते.ताठ मानेचा देश त्यामुळे लुळा पडू शकतो हा खरा धोका आहे.
मुसलमानांकडे नेहमी संशयाने पाहणारी त्यांच्याविरुद्ध गरळ ओकणारी मंडळी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत असतात. गेल्या काही वर्षात काही संघटनांच्या सभांमध्ये व्यासपीठावर किंवा रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्याचे मोठे चित्र लावले जाते. अफजलखान हा कपटकारस्थानाने शिवाजीराजांना दगा देऊन पाहत होता. तेव्हा त्याचा नि : पात महाराजांनी करणे ही राजकीय वर्चस्वाची लढाई होती. अफजलखान मुसलमान होता म्हणून महाराजांनी त्याला मारले नव्हते. किंवा त्यांच्या बायका मुलांना जाळले नव्हते हे लक्षात घेतले पाहिजे. तसे पहिले तर लबाडी ,फितुरी करणाऱ्या स्वधर्मातील अनेकानाही महाराजांनी कठोर शिक्षा केलेल्या आहेत.त्यांची चित्रे लावली जात नाहीत. पण हे चित्र लावले जाते यालाही कारण स्वधर्म प्रेमापेक्षा परधर्म द्वेष हेच आहे. अलीकडे छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील संघर्ष असाच धार्मिक दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे. खरे तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावर कोणत्या विचारधाराने कोणते भाष्य केले आहे हे पुन्हा एकदा तपासून उदाहरणासह व पुराव्यांसह पुढे आणण्याची गरज आहे.
उठसूट छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे नाव घेऊन अधर्म करणाऱ्या मंडळींना ना धर्म समजला ना हे दोन्ही थोर महामानव. कारण त्यांची थोरवी प्रचंड मोठी आहे. शिवछत्रपतींची राष्ट्र संकल्पना धर्मनिरपेक्ष होती. राज्य निर्मितीच्या व राज्य चालवण्याच्या अनेक अंगांची त्यांना फार सखोल जाण होती. सार्वजनिक ठिकाणी सर्वधर्मीय लोक गुणांनुसार समान पातळीवरच असतील हा मूलमंत्र महाराजांनी राज्यकारभारात अमलात आणलेला होता.संभाजीराजांनीही तसेच केले होते. याचे दाखले आपणास इतिहासाच्या पानापानावर दिसतात.
सर्व धर्मीयांना समतेने वागवणाऱ्या शिवरायांनी राजा व रयत या नात्यात कधीच जाती धर्म भेदाची बंधने येऊ दिली नाहीत.त्यांनी मंदिरांप्रमाणेच मशिदीनाही इनामे दिली.अन्यायाविरुद्ध लढताना सापडलेली कुराणाची प्रत मूळ मालकाकडे सन्मानाने पोचवली. हिंदू मुस्लिम अशा दोन्ही संत महंतांचा आदर, सत्कार केला. महाराजांच्या नौदलात मुख्य नाविक दौलत खान व सिद्दी मेस्त्री, आग्र्याला महाराजांचा जीव वाचवणारा माजारी मेहतर अशी अनेक मंडळी मुसलमानाच होती. शिवाजी महाराजांना जाती धर्माच्या भिंतीपलीकडे एक व्यापक राष्ट्रीय राजकीय दृष्टिकोन होता. म्हणूनच त्यांनी इतर धर्मीय स्थानिक लोकांनाही तितकीच सुरक्षितता व ऐक्य लाभेल अशी व्यवस्था केली. जो आचारधर्म असेल तो पाळण्यास प्रत्येकाला मुभा दिली. पण राजनिष्ठा आणि देशनिष्ठा याबाबत आंतर पडू न देण्याची खबरदारी महाराजांनी घेतली. हे समजून न घेणाऱ्यांची देशनिष्ठा तपासण्याची आज गरज आहे. स्वातंत्र्य आंदोलनात कोण नव्हते व कोण होते हे समजून घेतले तरी खरे देशप्रेमी कोण हे स्पष्ट होते.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणाऱ्या हिंदवी राज्यातील राष्ट्र ही संकल्पना जाती धर्मनिरपेक्षतेच्या पायावरच उभी होती.किंबहुना ही भावना रुजल्याने सर्व प्रजेला ते आपले राज्य वाटले. ते राज्य टिकवण्याची जबाबदारीने प्रजेने आपल्या शिरावर घेतली. विशिष्ट जाती-धर्माचे नेतृत्व म्हणून महाराजांकडे पाहण्यापेक्षा जनतेच्या स्वातंत्र्यकांक्षेचा प्रतिनिधी म्हणून महाराजांचेकडे पाहणे ऐतिहासिकदृष्ट्या सत्य व उचित आहे. शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षता, लोकशाही आदी मुल्यांची जोपासना करून एका नव्या मानवधर्मी मानवतावादी व्यवस्थेचा आग्रह करणारे अजोड व्यक्तिमत्व होते. शिवरायांचा छावा असलेल्या संभाजीराजांचे व्यक्तिमत्वही तसेच होते. पण शिवरायांचा व संभाजीराजांचा हा व्यापक विचार बाजूला ठेवून त्यांना संकुचित करून आपला स्वार्थ व धर्मांधाचा जोपासण्याचे काम ही मंडळी करत आली आहेत आणि करत आहेत.
भारतीय संस्कृती आशयघन ,वैशिष्ट्यपूर्ण ,एकात्म करण्यात मुस्लिम धर्माचे व राज्यकर्त्याचे योगदान नाकारता येणार नाही. हिंदू मुस्लिम संस्कृतीने खाद्यपदार्थापासून ते कलाकुसरी पर्यंत अनेक गोष्टींचे आदान प्रदान केलेले आहे. याचे अनेक दाखले इतिहासात सापडतात. हिंदू सण समारंभात आणि लग्नात सर्वात जास्त प्रमाणात केले जाणारे जिलबी हे पक्वान्न मुसलमानांमुळेच येथे आले एवढी एकच गोष्ट लक्षात घेतली तरीही घट्ट वीण आपल्या लक्षात येऊ शकते.
मनुस्मृतीचे समर्थन हजारो वर्ष स्त्रीला पशुसमान जीवन देणाऱ्या हिंदू समाजातील स्त्रीचा सहानुभूती पूर्वक विचार सर्वात प्रथम महंमद तुघलक आणि नंतर अकबराने केलेला होता. लॉर्ड बेटिंगने सतीचा कायदा केला म्हणून त्याचे नाव भारताचे इतिहासात नोंदवले गेले आहे. पण त्याच्याही पाचशे वर्षे आधी मोहम्मद तुघलकांनी हिंदू स्त्रियांना सती जाण्यापूर्वी सरकारची परवानगी घेण्याची अट घातली होती.
अगदी स्वारी करून आलेल्या अल्लाउद्दीन खिलजीनेही वेश्यानी विवाह करावा यासाठी हुकूम काढलेला होता. अकबराने तर स्त्रियांच्या हक्कांचा गांभीर्याने विचार केलेला आढळतो. त्याच्या सुधारणांमध्ये पुढील कलमे होती.(१) हिंदू स्त्रीला सती जाण्यास प्रतिबंध.(२) हिंदू स्त्रीच्या पुनर्विवाहाला मान्यता.(३) बालविवाहाला बंदी व विवाहपूर्वी मुलीचे वय १४ व मुलाचे वय १६ पूर्ण असावे. वयासंबंधी कोतवालाचा शिफारसवजा दाखला मिळाला पाहिजे.(४) विषम विवाहास बंदी पती व पत्नी यांच्या वयात बारा वर्षापेक्षा अधिक आंतर असू नये.(५) वेश्या व्यवसायावर प्रतिबंध. त्याबाबत परवानापद्धती ,वेश्यांची वगळी वस्ती वगैरे संबंधित खास नियम अकबराने केले होते .अकबराच्या या उदार दृष्टिकोनाला येथील सनातनी आणि धर्मांधानी कडाडून विरोध केला होता.परिणामी स्त्रियांबाबत भारतात प्रथमच झालेला एवढा पुरोगामी विचार अकबराबरोबरच दफन झाला. नंतरच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती का जाळली ? याचा विचार आम्ही करणार आहोत की नाही ? विषमतावादी मनुस्मृती जाळणारा आणि समतावादी भारतीय संविधान देणारा तो एक महान प्रज्ञावंत युगपुरुष होता हे आपण लक्षात घेतली पाहिजे.
अकबराने भारतातील अनेक लहान-मोठी मुस्लिम राज्ये नष्ट केली व एकछत्री साम्राज्याची स्थापना केली. त्यासाठी त्यांने आपल्या नातेवाईकांशीही लढाया केल्या. त्यांची बंडे मोडून काढली.राजपुताना आपले मित्र बनवले. मुल्ला मौलवींच्या कट्टर शिकवणुकीला पायबंद घातला.थोर इतिहासकार कालवश सेतू माधवराव पगडी लिहितात,' भारतीय साहित्याचे मोठ्या संख्येने त्यांने अनुवाद करवले. महाभारत, रामायण, योगवशिष्ठ, पंचतंत्र , रजतरागिणी इत्यादी ग्रंथांचे फारसी अनुवाद त्याच्यात प्रेरणेमुळे झाले. त्याच परंपरेतील फैजी याने नलदमयंतीवर फारसी भाषेत काव्य रचले.मुल्ला मसीहाने इसवीसन १६२७ मध्ये फारसी भाषेत तेरा हजार ओळींचे रामायण काव्य लिहिले. अकबराचा पणतू शहजादा दारा शुकोह याने तर या क्षेत्रात अकबरावरही ताण केली. त्याने भगवद्गीतेचे फारसी भाषांतर केले. उपनिषदांची फारसी भाषांतर करवली. या फारसी भाषांतरावरून ख्रिस्तानी लॅटिन भाषांतर केली. या लॅटिन अनुवादांवरूनच युरोपला विशेषत: जर्मनीला उपनिषदांचा परिचय झाला.दारा शुकोहोने योग वशिष्ठचे फारसी भाषेत भाषांतर करवले व त्याला स्वतः प्रस्तावना लिहिली. या प्रस्तावनेत तो म्हणतो की,' मला अलीकडेच एक स्वप्न पडले. स्वप्नात एका प्रचंड मोठ्या मैदानात मला दोन व्यक्ती उभ्या असलेल्या दिसल्या. मी त्यांच्या जवळ गेलो. त्यापैकी एक व्यक्ती होती वशिष्ठमुनी.मला पाहून ते दुसऱ्या व्यक्तीला म्हणाले, प्रभू रामचंद्र हा पहा सत्याचा पुजारी दारा शुकोह.हे ऐकून प्रभू रामचंद्र यांनी स्मितहास्य केले आणि मला प्रसाद दिला. मला जाग आली. माझी खात्री झाली की मी योगवशिष्ठाचा अनुवाद करावा अशी प्रभू रामचंद्रांची आज्ञा आहे. ती अज्ञा मी पार पडली. 'तसेच त्याने मम्ज्मूअल बहरन ( समुद्रसंगम )हा ग्रंथ लिहून इस्लाम आणि हिंदू धर्म यांच्यातील तत्वे कशी एक आहेत हे दाखवले. १६५८ मध्ये या ग्रंथाचा संस्कृत अनुवादही त्याच्याच प्रेरणेने झाला.पुढे औरंगजेबाने त्याला काफर ठरवून त्याची हत्या करवली. उसे नंबर खान हा भगवद्गीतेचा भाष्यकार म्हणून ओळखला जातो. त्याने रचलेली टीका अंबर हुसेनी म्हणून प्रसिद्ध आहे. मुसलमानानी प्राण पणाला लावून , प्राणाची आहुती देऊन भारतीय संस्कृतीच्या विकासात योगदान दिल्याची अशी अनेक उदाहरणे आहेत. तसेच ताजमहाल पासून कुतुब मिनार पर्यंतची शेकडो वास्तुशिल्पे ही भारतीय वास्तू शिल्पे म्हणून जगात प्रसिद्ध आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.
हा सारा इतिहास पुसून टाकण्याचे काम इंग्रजांनी केले. हिंदू मुस्लिम एक राहिले तर आपला राज्यकारभार नीटपणे चालणार नाही म्हणून त्यांनी दुहीची ची बीजे पेरायला सुरुवात केली. दोन्ही बाजूच्या धर्मांध परधर्मद्वेषी शक्तींना त्यांनी कुरवाळायला , गोंजारायला सुरुवात केली. त्यांना शक्ती दिली. इंग्रजांच्या या भेदनीतीला भारतीय समाजातील काही घटक बळी पडले. धार्मिक मंडळांची ढवळा ढवळ वाढू लागली. खिलाफत चळवळीत धर्मिक मंडळींच्या प्राबल्यायाविषयी पंडित नेहरू आत्मकथेत म्हणतात ,' हिंदू आणि मुसलमान समाजात वाढीस लागलेल्या या धार्मिक भावनांकडे पाहून मला थोडी काळजी वाटत असे. मला ही गोष्ट बिलकुल पसंत नव्हती.जाहीर सभातून हे मौलवी, मौलाना आणि स्वामी जे विचार प्रदर्शित करीत ते फार प्रतिगामी स्वरूपाचे असत. समाजशास्त्र ,अर्थशास्त्र व इतिहास याबद्दलचे त्यांचे ज्ञान चुकीचे वाटत असे. प्रत्येक गोष्टीला धर्माची फोडणी दिल्यामुळे स्पष्टपणे विचार करणे अशक्य होऊन बसले. गांधीजींचे काही काही शब्दही कर्णकटू वाटत. उदाहरणार्थ ' रामराज्य' हा त्यांचा नेहमी येणारा शब्द घ्या. पण त्यांना थोपवण्याची शक्ती माझ्यात नव्हती. शब्द रूढ आणि जनतेला ज्ञात आहे म्हणून तो गांधीजी वापरत असतील असे स्वतःचे समाधान मी करून घेत होतो. कारण लोकांची अंतकरणे काबीज करण्याची कला त्यांना पूर्णपणे अवगत होती.'
अर्थात हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी महात्मा गांधींनी फार मोठे योगदान दिलेले आहे.एकी हेच बळ हे नुसते पुस्तकी सुभाषित नाही तो जीवनाचा एक सिद्धांत आहे त्याचा प्रत्यक्ष पुरवा हिंदू मुस्लिम ऐक्या एवढा कोठेच प्रत्ययाला येत नाही.बेकी झाली की आपली अधोगती ठरलेली आहे.जेव्हा एखादा हिंदू अथवा मुसलमान पापकृत्य करतो तेव्हा तो एक भारतीय माणूस दुसऱ्या भारतीय माणसाशी पाप करतो. त्यावेळी आपल्यापैकी प्रत्येकाने व्यक्तिशः त्या दोषाचे वाटेकरी झाले पाहिजे.आणि तो दोष दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ऐक्याचा याहून दुसरा अर्थ नाही. अन्यथा आपला देशाभिमान क:पदार्थ ठरेल. जातीनिष्ठेपेक्षा देशनिष्ठा श्रेष्ठ आहे.या दृष्टीने आपण प्रथम भारतीय असतो मग हिंदू, मुसलमान, पारशी, ख्रिस्ती आहोत असे गांधीजी म्हणत.
गांधीजी एके ठिकाणी म्हणतात,' कुराणात अशी शेकडो वचने दिसून येतील की जी हिंदूंना मान्य होण्यासारखी आहेत.आणि भगवद्गीगीतेत अशी वचने आहेत की ज्याच्या विरोधात मुसलमानांना काहीच बोलता येणार नाही. कुराणात मला न समजण्यासारखा किंवा मला न आवडण्यासारखा काही भाग असला म्हणून त्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांचा मी तिरस्कार करावा की काय ?टाळी दोन हाताने वाजते. मला जर तंटा करायचाच नसला तर मुसलमान काय करेल ? आणि मुसलमानाला करायचा नसला तर मी काय करू शकणार आहे ?हवेत हातवारे करणाऱ्याचा हातच निखळतो. प्रत्येक जण आपल्या धर्माचे स्वरूप समजून घेऊन त्याला चिकटून राहील आणि शास्त्री मुल्लाना लुडबुड करू देणार नाही तर तंट्याचे नाव उरणार नाही.'
प्रदीर्घ असा चाललेला भारतीय स्वातंत्र्यलढा आपण लढलो. त्या लढ्याचे अंतिम पर्वातील नेतृत्व महात्मा गांधींनी केले.आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या आंदोलनात काँग्रेस, समाजवादी आणि कम्युनिस्ट हे तीन महत्त्वाचे विचारप्रवाह होते. व त्या सर्वच विचार प्रवाहात भारतातील सर्व धर्मीय लोकांचे योगदान मोठे आहे.त्याच वेळी मुस्लिमांविषयी सतत गरळ ओकणाऱ्या व तसा प्रचार करणाऱ्या विचार धारेचे योगदान मात्र शून्य आहे. तेही आपण समजून घेण्याची गरज आहे. गेली काहीं वर्षे मुसलमान विरोधी, ख्रिश्चन विरोधी जोराचा विषारी प्रचार पद्धतशीरपणे केला जात आहे. त्यासाठी सत्ता राबवली जात आहे .या आक्रमक विद्वेशी प्रचाराला तरुण वर्ग बळी पडतोय.कारण सत्ताकारणी मनमानी राजकारणाने जी आर्थिक ,सामाजिक, सांस्कृतिक धोरणे राबवली आहेत त्यातून दारिद्र्य ,उपासमार , बेरोजगारी, महागाई , चंगळवाद यासारखे असंख्य प्रश्न उभे केलेले आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा मार्ग दिसू नये अशी परिस्थिती जाणवपूर्वक तयार केली जात आहे. रिकामे मन सैतानाचे घर या म्हणीप्रमाणे परिस्थितीने गांजलेल्या व सर्व प्रकारची कुचंबणा सोसणाऱ्या युवा पिढीवर आक्रमक धर्मांध विचारधारांचा प्रभाव अधिक लवकर पडू शकतो. तो पडला आहेच. तो अजून वाढू नये यासाठी खरा इतिहास समजून घेणे, समजून देणे याची नितांत गरज आहे.खास करून भारतीय मुसलमानांचा इतिहास तर प्रचारात व प्रचारात आणण्याची गरज आहे. कारण भारतीय समाज जीवनातील चौदाशे वर्षाचा सहप्रवास नजरेआड करून मुसलमानांना सरसकट उपरे आणि देशद्रोही ठरवण्याचे कारस्थान रचले जात आहे. तो द्वेष पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू न देणे ही आपली ऐतिहासिक आणि नैतिक जबाबदारी आहे.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)