पद्मभूषण उस्ताद बडे गुलाम अली खान

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.co


पतीयाळा घराण्याचे थोर गायक पद्मभूषण उस्ताद बडे गुलाम अली खान यांचा २ एप्रिल हा जन्मदिन.२ एप्रिल १९०२ रोजी सध्याच्या पाकिस्तानातील कसूर येथे जन्मलेले उस्ताद २५ एप्रिल १९६८ रोजी हैदराबाद येथे कालवश झाले. त्यांचे वडील अलीबक्ष खान आणि काका काले खान हे दोघे पतियाळा घराण्याचे  ख्यातनाम गायक होते.या दोघांकडून त्यांनी गायकीचे धडे घेतले. बडे गुलाम अली खान यांचा आवाज अतिशय गोड होता आणि त्यांची ग्रहण शक्तीही अफाट होती. गायकीतील कल्पकता आणि नाविन्याची आवड यामुळे त्यांचे गाणे रसिकांना कमालीचे आवडत असे. वैविध्यपूर्ण असलेले त्यांचे गाणे भावनाप्रधान होते. ख्याल,ठुमरी, भजन हे सर्व गायन प्रकार ते अतिशय ताकदीने  गात असत. गायकीचा  त्यांचा स्वतःचा एक ढंग होता. 

सर्वसामान्य लोकाना गायकी आवडली पाहिजे, गाणे समजले पाहिजे यावर त्यांचा भर होता. म्हणून  तशा पद्धतीची गायकी त्यांनी रुजवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यात ते कमालीचे यशस्वी झाले.अदाना,भूपाळी,हमीर,जयजयवंती आणि जौनपुरी आधी रागान मध्ये त्यांनी साध्या सोप्या पद्धतीने उत्तम गायकी केली.

का करू सजनी आए ना बालम, याद पिया की आए, प्रेम जोगन बनके, नैना मोरे तरस रहे, कंकर मार जाए,प्रेम अगन जियारा अशी अनेक  अजरामर गाणी त्यांनी गायली. ' सबरंग ' या टोपण नावाने त्यांनी रचलेल्या ख्याल आणि ठुमऱ्या लोकप्रिय झाल्या.

मुगले आझम  या चित्रपटात त्यांनी गाणे म्हणावे यासाठी के.असिफ अतिशय आग्रही होते. बडे गुलाम अली खान चित्रपटात गाणे गायला तयार नव्हते.ते त्यांना आवडत नसे. पण के.असिफ फारच आग्रह करू लागले. आसिफना नकार देण्यापेक्षा अवाजवी रक्कम मागितली तर ते नाद सोडून देतील म्हणून बडे गुलाम अली खाननी गाण्यासाठी पंचवीस हजार रुपये मागितले. त्याकाळी नामवंत गायक गायिका ५००/१००० रुपयात गात असत. पण असिफनी ते लगेच मान्य केले .   'प्रेम जोगन बन के' आणि  'शुभ दिन आयो राज दुलारा' ही गाणी त्यांच्याकडून गाऊन घेतली.

भारताच्या फाळणीनंतर  बडे गुलाम अली खान पाकिस्तानातील त्यांचे मूळ गाव कसूर येथे गेले . भारताची फाळणी झाली याचे त्यांना मोठे दुःख होते.त्यांनी एकदा म्हटले होते,'जर प्रत्येक घरातल्या एका मुलाला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकवले असते तर भारताची कधीही फाळणी झाली नसती.'अखेर १९५७ मध्ये ते कायमचे वास्तव्य करण्यासाठी भारतात आले. मुंबईचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या मदतीने त्यांनी भारतीय नागरिकत्व मिळवले.मुंबईतील मलबार हिल येथील एका बंगल्यात ते रहात असत.त्यांचे मुंबई , कलकत्ता आणि शेवटी हैदराबाद येथे वास्तव्य होते. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त भारत सरकारने २००३ त्यांचे छायाचित्र असलेले  टपाल तिकीट काढले होते. तसेच संगीत असकादमी पुरस्कारापासून पद्मभूषण पर्यंतचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.

हैदराबाद येथील बशीर बाग पॅलेस मध्ये त्यांचे निधन झाले.

बशीरबाग येथील मुख्य रस्त्याला त्यांच्या सन्मानार्थ उस्ताद बडे गुलाम अली खान मार्ग असे नाव देण्यात आले आहे .भारतीय चित्रपट दिग्दर्शक हरिसाधन दासगुप्ता यांनी १९६८ मध्ये बडे गुलाम अली खान साहिब नावाचा एक माहितीपट बनवला आहे.

तर २०१७ साली बडे गुलाम अली खान यादगार सभेची स्थापना त्यांच्या शिष्या मालती गिलानी यांनी केली. त्याद्वारे त्यांचे संगीत आणि स्मृती जतन केली जात आहे. त्यांच्या मुलांनी, नातवंडांनी आणि पुढील पिढीने त्यांची गायकी पुढे नेण्याचे काम केले ते आजही सुरु आहे.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post