प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co
गुरुवार ता.१० एप्रिल २०२५ रोजी वर्धमान महावीर जयंती आहे. अर्थात चैत्रशुद्ध त्रयोदशीला महावीरांची जयंती साजरी केली जाते तो हा दिवस आहे.वर्धमान महावीर हे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर होते. ख्रिस्त पूर्व इसवी सन ५९९ मध्ये त्यांचा जन्म झाला. तत्कालीन मगध प्रदेशातील अर्थात सध्याच्या दक्षिण बिहार मधील वैशाली नगरीचे उपनगर असलेल्या कुंड ग्रामात त्यांचा जन्म झाला. महावीरांच्या पूर्वी जैन धर्माचे तेवीस तीर्थंकर होऊन गेले. त्या अर्थाने जैन धर्माचे संस्थापक ते नसले तरी जैन धर्माला प्रभावी बनवण्याचे फार मोठे काम त्यांनी केले.त्यामुळे जगातील प्रमुख धर्म संस्थापकांच्या मांदियाळीत महावीरांचे नाव आदराने घेतले जाते.
महावीरांचे वडील सिद्धार्थ हे उपनगराचे प्रमुख होते. त्यांच्या आई त्रिशला वैशालीच्या लिच्छविवंशीय राजाची कन्या होत्या. त्या विदेहदिना व प्रियकारणी या नावानेही ओळखल्या जात.महावीरांची प्रकृती बालपणापासूनच चिंतनशील व वैराग्यशील होती.महावीर यांनी आई-वडिल हायात असेपर्यंत गृहत्याग करणार नाही असे मातापित्यांना वचन दिले होते.मातृ-पितृ छत्र हरपल्यानंतर ते काही काळ नंदीवर्धन या मोठ्या भावासह घरी राहिले. पण अखेरीस वयाच्या तिसाव्या वर्षी ते गृहत्याग करून बाहेर पडले.त्यांच्या विवाहित-अविवाहित असल्याबद्दल दिगंबर व श्वेतांबर पंथामध्ये भिन्न मते आहेत. कारण दिगंबर पंथातील अनुयायांच्या मते ते आयुष्यभर अविवाहित होते. तर श्वेतांबर पंथातील अनुयायांच्या मते ते विवाहित होते. यशोदा असे त्यांच्या पत्नीचे नाव होते आणि त्यांच्या कन्येचे नाव अनुजा होते.
बालपणी आई वडिलांनी त्यांचे पाळण्यातील नाव वर्धमान असे ठेवले होते.पण पुढे महावीर या नावाने ते सुप्रसिद्ध झाले. त्यांना वीर, जिन,अर्हत, सन्मती, वैशालिक, ज्ञातृपुत्र, नातपुत्त , केवलिन आदी नावानेही संबोधले जाते.एका कथेत असे म्हटले आहे की,आपण ज्याचा आधार घेतला आहे त्या वटवृक्षाला वेढून टाकणाऱ्या सर्पाला ठार मारण्याऐवजी त्यांनी त्याच्या ठिकाणचे विषारी हिंसकत्व नष्ट केले. त्यामुळे त्यांना महावीर असे म्हटले जाते. त्यांनी विकारांना जिंकल्यामुळे त्यांना जिंकणारा या अर्थाने जीन म्हणूनही ओळखले जाऊ लागले.यावरून जैन ही संज्ञा रूढ झाल्याचे म्हटले जाते.
त्या काळात राजपुत्रांना जे शिक्षण दिले जायचे त्या पद्धतीचे सर्व शिक्षण त्यांना मिळालेले होते. पण गृहत्यागानंतर त्यांनी एक तप तपश्चर्या केली. पहिल्या एक वर्षानंतर त्यांनी वस्त्रत्याग केला. आपल्याला दंश करणाऱ्या कीटकांनाही त्यांनी मारले नाही. त्यांच्या वर्तनव्यवहाराने लोकांनी त्यांचा छळ केला पण तो त्यांनी सोसला.अखेर त्यांना वयाच्या ४२ व्या वर्षी केवलज्ञान प्राप्त झाले.त्यांनी त्यानंतरची तीस वर्षे म्हणजे अखेरपर्यंत धर्मोपदेश केला. तत्पूर्वी अडीचशे वर्षे जैन धर्माचे तेविसावे तीर्थंकर म्हणून पार्श्वनाथ यांचा प्रभाव होता. महावीरांचे आई-वडीलही पार्श्वनाथांचे अनुयायी होते. महावीरानी जैन धर्माचे आणि श्रमण संस्थेचे पुनर्जीवन केले. त्यामुळे त्यांच्याविषयी पूज्यभाव निर्माण झाला. पार्श्वनाथानी सत्य, अस्तेय, अहिंसा ,अपरिग्रह ही चार तत्वे सांगितली.तो चातुर्याम धर्म होता.तर महावीरांनी त्यात ब्रह्मचर्याची भर घातली आणि पंचयाम धर्म केला.महावीरांचे वैशिष्ट्य हे की त्यांनी जुनी परंपरा खंडित करण्याऐवजी नव्या तत्त्वांशी मेळ घातला.
अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करीत ते जनजागरण करीत राहिले. लोककल्याणाचा मार्ग दाखवीत राहिले. वैदिक यज्ञयागामधील हिंसा कालबाह्य झाली याचे एक महत्त्वाचे कारण महावीर व गौतम बुद्ध यांनीहिंसेला केलेला विरोध हे आहे. त्यांनी अनेकांतवादाचा पुरस्कार केला . त्यामुळे समाजात वैचारिक दुराग्रहाऐवजी सामंजस पणाचे वातावरण निर्माण होत गेले. जातिव्यवस्थेला विरोध केला आणि सर्व जाती जमातीच्या लोकांना शिष्यत्व दिले.स्त्रियांना संन्यासाचा अधिकार असल्याचे सांगितले. सर्वसामान्यांना आपले विचार समजले पाहिजेत म्हणून त्यांनी संस्कृत ऐवजी अर्धमागधी ही प्राकृत भाषा वापरली.तत्वज्ञानातील क्लिष्ट संकल्पना स्पष्ट करण्यासाठी महावीर दैनंदिन जीवन व्यवहारातील उदाहरणे देत असत. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी म्हटले आहे ,'महावीरांचे चरित्र म्हणजे साधु चरित्राचा प्रथम आदर्श आहे. तितिक्षा ,क्षमा ,अहिंसा ,समता, त्याग इत्यादी गुणांची परमावधी महावीरांच्या ठिकाणी झाली होती. भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील मोजक्या महापुरुषांमध्ये महावीरांचे अंतर्भाव होतो.'
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)