हयुगो चावेझ : आशावाद पेरणारा नेता

  

प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.co

५ मार्च हा आशावाद पेरणारा नेता हयुगो चावेझ याचा स्मृतिदिन. भांडवलशाही अर्थव्यवस्थेने वारंवार जागतिक मंदीचा फास विकसनशील राष्ट्रांभोवती अडकवून गुदमरायला, घुसमटायला लावण्याचा काळ गेली तीन दशके सुरू आहे.या काळात जगभरच्या शोषितांना वंचितांना आधार वाटावा असा समाजवादी क्रांतीचा बुलंद आवाज हयुगो राफेल चावेझ हे ५ मार्च २०१३ रोजी वयाच्या ५८ व्या वर्षी कॅन्सरने कालवश झाले होते.  व्हेनेझुएलाच्या या पुढार्‍याने आपल्या अवघ्या चौदा वर्षाच्या राजकीय कारकिर्दित अमेरिकेच्या भांडवली व्यवस्थेला शह दिला होता.लॅटिन अमेरिकेच्या इतिहासाला वेगळी कलाटणी दिली होती .भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे जगभरचे समर्थक हिना फॅक्टर (देअर इज नो अल्टरनेटिव्ह ) चे तुणतुणे तत्पूर्वी काही दशके वाजवत होते. त्यांना समर्थ पर्याय देणारी पर्यायी विकास निती चावेझ यांनी कृतिशील धोरणातून सिद्ध केली. अमेरिकेच्या जवळ राहून तिला वैचारिक आणि आर्थिक आव्हाने देण्याचे काम या महानायकाने केले होते. त्यांच्या नेतृत्वामुळे लॅटिन अमेरिकेतील अनेक देशात साम्राज्यवाद्यांचा पराभव करत पुरोगामी शक्ती विजयी होत गेल्या. विकसनशील देशांचे संघटन करून सामाजिक न्याय प्रस्थापनेचा वैश्विक प्रयत्न चावेझ यांनी केला.क्लायमेट चेंज पासून जागतिक व्यापारापर्यंत आणि ब्रिक्सपासून नाणेनिधीपर्यंतच्या अनेक बाबतीत त्यांनी नवे विचार मांडले.परिवर्तनासाठी कृतीशील सहकार्य केले. परिणामी ते त्या दशकात साम्राज्यवाद विरोधी शक्तींचे जागतिक स्तरावरचे नेते बनले होते.


ह्यूगो चावेझ यांनी व्हेनेझुएलात सत्तेवर आल्यानंतर जुनी घटना बदलून नवी जनवादी घटना बनवली. घटनात्मक लोकशाही प्रस्थापित केली. तेल आणि वायुद्वारे मिळणारा पैसा सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी खर्च केला. या व्यवसायातील खाजगी मक्तेदारी मोडीत काढून त्याचे राष्ट्रीयकरण केले. यातील पैसा जनतेचे आरोग्य आणि शिक्षण यावर खर्च केला. परिणामी १९९६ साली तेथील ७१ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली  होते तो आकडा २०१३ साली  २१ टक्क्यांवर आला होता. व्हेनेझुएलात ९० टक्के अन्नधान्य आयात केले जात होते त्याचे प्रमाण ३० टक्क्यांवर आले होते. अन्न, वस्त्र ,निवारा ,शिक्षण आणि आरोग्य या माणसाला आवश्यक असणाऱ्या बाबींना अग्रक्रम देऊन त्यांनी जो बदल केला तो स्तिमित करणारा होता .जगाने त्याचे अनुकरण करण्यासारखा होता. देशाच्या सामाजिक ,आर्थिक परिस्थितीत मूलभूत बदल घडवून आणून प्रगतीपथावर नेण्यासाठी चावेझ यांनी 'मिशन्स' नावाचा कार्यक्रम आखला.नेमक्या प्रश्नावर काम करणारी अशी एकोणीस मिशन त्यांनी उभारली. या साऱ्या मुळे देशातून निरक्षरता हद्दपार झाली.गोरगरिबांना अन्नापासून औषधांपर्यंत सारे काही सहजसाध्य होऊ लागले.कारखानदारीपासून भूमीसुधारणा पर्यंतची समन्यायी धोरणे त्यांनी आखली. या साऱ्यामुळे अमेरिका व  तिच्या बगलबच्चा राष्ट्रांच्या जळफळाट झाला .त्यांनी चावेझ यांना अडचणीत आणण्यासाठी अनेक कपाटकारस्थाने केली पण ते त्यांना पुरन उरले.


एकविसाव्या शतकातील समाजवाद कसा असावा याची कृतिशील मांडणी चावेझ यांनी केली होती.ते आणखी वीस -तीस वर्षे जगायला हवे होते.कारण त्यांच्या मृत्यूने परिवर्तनाशी बांधिलकी मानून कार्य करणाऱ्या जगभरातील सर्व समाज घटकांची मोठी हानी झाली. ५८  हे तसे जाण्याचे वय नव्हते.पण ते गेले हे खरे .त्यांच्या निधनाने साम्राज्यवादी शक्तीशी धिटाइने संघर्ष करणारा सेनापती गेला.चावेझ यांच्या निधनानंतर जगभरच्या माध्यमानी तशी बऱ्यापैकी दखल घेतली होती. पण त्यातही भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्यांनी मृत्यूनंतरही त्याला न्याय दिला नाही.अनेकानी आपल्या लेखाचे मथळे माजलेला समाजवादी , सत्तातूर हुकूमशहा , उधळलेला वळू वगैरे दिले होते. पण त्यांनाही आपल्या लेखाच्या अंतरंगात त्याच्या सर्वसामान्य जनतेच्या असलेल्या बांधिलकीबाबत लिहावेच लागले. विरोधकांनाही एक-दोन वाक्यात का होईन आपली दखल घ्यावीशी वाटली या प्रामाणिकपणालाही चावेझची अस्सल आणि अव्वल तळमळ व वैचारिक बांधिलकी कारणीभूत होती.


सीमोन बोलीव्हार या दृष्ट्या क्रांतिकारकाने  एकोणिसाव्या शतकात लॅटिन अमेरिकेतील स्पॅनिश साम्राज्याला सुरूंग लावला. आपल्या अंतोनी आहासे द सूक या साथीदाराच्या मदतीने त्याने व्हेनेझुएला, कोलंबीया , पेटन, इकवाडोर , बोलीव्हीया आदी देशांची साम्राज्यशाही पासून सुटका केली आणि स्वातंत्र्य मिळवून दिले .परिणामी सीमोन बोलीव्हार हा लॅटिन अमेरिकेतील जनतेच्या गळ्यातील ताईत बनला. स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा प्रणेता म्हणून तो ओळखला गेला. फिडेल कॅस्ट्रो, चे गव्हेरा आदींनी त्याचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. चावेझनीही तोच वसा आणि वारसा स्वीकारला होता.तर तो स्वतःला ' 'बोलीव्हरीयन 'म्हणत असे.


हा बोलीव्हिरियन एका शिक्षक दंपत्याच्या पोटी एका लहानशा शहरात २८ जुलै १९५४ रोजी जन्मला.वयाच्या १७ व्या वर्षी तो लष्करात दाखल झाला. लष्करातील भ्रष्टाचार आणि मानवी हक्कांविषयीच्या अनास्थेमुळे त्याचा भ्रमनिरास झाला. शिवाय लॅटिन अमेरिकेतील घडामोडी तो बारकाईने पाहत होता.१९७३ साली चिलीमध्ये लोकशाही मार्गाने सत्तेला आलेल्या कम्युनिस्ट नेत्याची म्हणजे सालवादोर अयंदेचा खून करून अमेरिकेच्या सहाय्याने अगस्तू पिनोसे हा हुकुमशहा सत्तेवर आला होता. व्हेनेझुएला व इतरत्रही तीच परिस्थिती होती. हे सगळे घडत असताना यात बदल झालाच पाहिजे या अस्वस्थेतून ह्युगोने  क्रांतिकारी संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ही संघटना बळकट करून १९९२ त्यांनी सरकार विरोधी बंड केले. लष्कराची काही ठाणी त्याच्या ताब्यात आली. पण राष्ट्राध्यक्ष कालॉस पेरेझला तो पकडू शकला नाही हे सारे बरे वाईट अनुभव घेत तो निवडणुकीमार्गे सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नाला लागला .१९९९ साली ५६ टक्के लोकमताचा पाठिंबा घेत तो निवडून आला. प्रचारा दरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण करायला त्याने तातडीने प्रारंभ केला.


व्हेने झुएलाचे नाव बदलून बोलिव्हरियन रिपब्लिक ऑफ व्हेनेझुएला असे करून त्याने सीमोन बोलीव्हरला मानवंदना दिली.. नवीन घटना तयार केली. त्यावर सार्वमत घेऊन वर्षभरात पुन्हा २००० साली  निवडणूक जिंकली. व्हेनेझुएलातील तेल व वायु साठ्यांवर अमेरिकेचे लक्ष होतेच.साहजिकच चावेझ त्यांना अडचणीचा ठरू लागला. म्हणून त्याच्याविरुद्धची कटकारस्थाने लगेच सुरू झाली. पण तो बधला नाही. श्रीमंतांवर प्रचंड कर आणि गरिबांना घसघशीत अनुदान हे धोरण त्याने सुरू केले. त्याला साहित्य, नाट्य, कला या साऱ्याची प्रचंड आवड होती.म्हणून तर उत्तम साहित्य ,कथा, कादंबऱ्या तो सरकारी खर्चानं छापून लोकांना मोफत वाटत असे.


" राजकारण ही फक्त तथाकथित वरिष्ठ वर्गाची मक्तेदारी नाही. तर तळागाळातील सर्व लोकांना आपले जीवन कसे आहे आणि कसे असावे हे ठरवण्याचा अधिकार आहे .माझे राजकारण तो अधिकार लोकांना देते "असे तो म्हणत असे.त्यांनी आपल्या देशातील जनतेला सुखी बनवलेच पण लॅटिन अमेरिकेतील इतर अनेक देशांना तो स्वस्त दराने तेल द्यायचा. व सर्व प्रकारची मदत करायचा .जेणेकरून अमेरिकेच्या दबावातून हे देश मुक्त व्हावेत .अर्जेंटिनासारख्या देशावर अमेरिकेचे असलेले कर्ज त्याने स्वतः फेडले होते. त्याच्या या साऱ्या धोरणालाच तो एकविसाव्या शतकातील समाजवाद मानत असे .सर्व गोष्टी लोककेंद्रीत असल्या पाहिजेत. राजकीय पक्ष हे लोकांपुढे दुय्यम असले पाहिजेत असे त्याचे मत होते. चावेझ यांनी स्त्रियांचे संरक्षण ,अन्न ,निवारा ,शिक्षण, आरोग्य या हक्कांचा मूलभूत हक्क म्हणून, लोकप्रतिनिधींना परत बोलवण्याचा हक्क, स्वच्छ प्रशासन आणि सर्वसमावेशक लोकशाही या सार्‍या बाबींना घटनात्मक संरक्षण दिले.म्हणून तर सर्वसामान्यांना हा नेता आपला वाटायचा. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन...!


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार, वक्ता , स्तंभलेखक म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post