प्रेस मीडिया लाईव्ह :
रामानंदनगर ता.२ मुल्याधिष्टित राजकारण हा इतिहास होता तर आजचे राजकारण मूल्यरहित होत चाललेले आहे. येनकेनप्रकारे सत्ताप्राप्तीसाठी सर्व प्रकारची नैतिकता गुंडाळून ठेवली जाणे आजचे वास्तव आहे. कारण राजकारण हे केवळ सत्ताकारण बनलेले आहे. त्यामध्ये मूल्यांना स्थान उरलेलं नाही. मुल्याधिष्टित राजकारणामध्ये नैतिक विचार, धाक, प्रामाणिकता याला मोठे महत्त्व असते .पण आज मूल्यरहित राजकारणात अनैतिकता, सूडबुद्धी आणि दांभिक खोटेपणा वाढत चाललेली आहे. प्रत्यक्षाहून प्रतिमा मोठी करण्याच्या प्रयत्नात मूल्याधिष्ठित राजकारण बाजूला पडले आहे. अशावेळी राजकारणाला सकारात्मक पद्धतीची योग्य दिशा द्यायची असेल तर व्यवस्थेची फेर मांडणी करावी लागेल. ही फेरमांडणी जनतेच्या जिव्हाळ्याच्या व जीवनमरणाच्या प्रश्नांना अग्रक्रम देऊन त्याची लोकपातळीवर सतत चर्चा करावी लागेल. त्यासाठी प्रबोधन चळवळ गतिशील करावी लागेल असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते व्ही.वाय.पाटील प्रबोधन अकॅडमी, समाजवादी प्रबोधिनी आणि परिवर्तनवादी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तेराव्या आचार्य शांतारामबापू गरुड स्मृती व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना ' " "मूल्याधिष्ठित राजकारण व आजचे वास्तव " या विषयावर बोलत होते. स्वागत आदम पठाण यांनी केले. प्रास्ताविक व्ही.वाय.आबा पाटील यांनी केले. प्रारंभी प्राचार्य तानाजीराव चव्हाण यांच्या हस्ते आचार्य गरुडांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले,मूल्यरहित राजकारणाने समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर विपरीत परिणाम होत असतात. समाजकारणा पासून अर्थकारणापर्यंतची सर्व क्षेत्रे त्यामुळे बाधित होत असतात. तेथे एक प्रकारची आराजकता दिसून येऊ लागते. मूल्याधिष्ठित राजकारण म्हणजे संवैधानिक मूल्ये अंगीकारण्याचे, जपण्याचे, वाढवण्याचे राजकारण असते. त्यापासून दूर जाणे ही मूल्यहीनता असते.राजकारण आणि गुन्हेगारी, राजकारण आणि हिंसा, राजकारण आणि द्वेष यांचे साटेलोटे वाढत जाणे सुदृढ लोकशाहीसाठी घातक असते. समाजामध्ये भेदनीतीपेक्षा ऐक्यानीती प्रभावी असावी लागते. लोकांच्या हाताला काम देणारी धोरणे आखण्यापेक्षा रेवडी संस्कृतीची तात्पुरती मलमपट्टी करण्याची राजकीय विकृती वाढत जाणे ही मूल्यविहीनताच असते. राजकारणातील जबाबदार व्यक्तींची अत्यंत बेजबाबदार विधाने वाढत चालली आहेत. खुजी व संस्कृतिक विचारधारा अंगीकारण्याचे स्तोम वाढत जाणे ही राजकीय मूल्याधिष्ठितता घसरत असल्याचे द्योतक आहे. धर्मनिरपेक्षते ऐवजी धर्मराष्ट्र, लोकशाही ऐवजी एकचालुकानूवर्तित्व, समाजवादा ऐवजी माफिया भांडवलशाही, लोकांच्या सार्वभौम सत्तेपेक्षा आदेशत्वाची सक्ती, संघराज्य एकात्मतेपेक्षा दुजाभावी दृष्टिकोन वाढत जाणे हे चांगले लक्षण नाही. म्हणूनच मूल्याधिष्ठित राजकारण रुजवायचे असेल तर सर्वसामान्य मतदारांनी तशा राजकारणाचा आग्रह धरून पुढे येण्याची गरज आहे. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या एक तासाच्या मांडणीमध्ये या विषयाची विविध अंगाने सखोल चर्चा केली. तसेच मुल्याधिष्टित राजकारणाची मूल्यरहित राजकारणाची अनेक उदाहरणेही स्पष्ट केली.
यावेळी विविध क्षेत्रातील यशासाठी हिम्मतराव मलमे,माधवी शिंदे, नारायण पाटील, टी.जी.अनुगडे आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी पी.के. माने ,एम.एल. पुजारी, एन. जे. पाटील, सुनील गुरव, महंमद सैदापुरे ,दीपक घाडगे, रामचंद्र लाड, गोपाळ पिसाळ, कृष्णा गायकवाड ,बबन माने ,संदीप नाझरे, मारुती शिरतोडे, मुकुंद खारगे, संभाजी सदामते, शंकर इंगळे, यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. रविंद्र येवले यांनी आभार मानले.तर मुख्याध्यापक जयवंत मोहिते यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता केली.