राजकीय पक्षांनी गांधींकडून खूप काही शिकण्यासारखे - पर्यावरणतज्ज्ञ आणि वैज्ञानिक सोनम वांगचुक यांचे प्रतिपादन

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : देशातील सगळे राजकीय पक्ष आणि नेते महात्मा गांधी यांचा गौरव करतात. मात्र, त्यांचे विचार कोणी आचरणात आणत नाही. स्वच्छ भारत अभियानात गांधीजींचा फोटो वापरला जातो. हे चांगले आहे. मात्र, त्यांच्या विचारांना अनुसरून काम केले जात नाही. सर्व राजकीय पक्षांनी सोयीने गांधींचे विचार घेतले आहेत. राजकीय पक्षांनी गांधींकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, अशी अपेक्षा लेह-लडाख येथील पर्यावरणतज्ज्ञ आणि वैज्ञानिक सोनम वांगचुक यांनी रविवारी व्यक्त केली. 

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे कोथरूड येथील गांधी भवन येथे आयोजित तीन दिवसीय गांधी विचार साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. पॉप्युलर प्रकाशनाचे संस्थापक, लेखक आणि गांधीवादी विचारवंत रामदास भटकळ यांचा संमेलनाध्यक्ष सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, स्वागताध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, संस्थेचे विश्वस्त डॉ. शिवाजीराव कदम, सचिव अन्वर राजन, एम. एस. जाधव, सुनील पाटील, रवींद्र धनक, रमेश आढाव उपस्थित होते. समारोप सत्राला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

 वांगचुक म्हणाले, लडाखमध्ये निसर्गाच्या विरोधात खोदकाम सुरू आहे. त्यामुळे तेथील नैसर्गिक संपत्ती धोक्यात आली आहे. याविरोधात आम्ही आंदोलन करताना आम्हाला पुण्यातून समर्थन मिळाले. लेह-लडाखमधील लोक, जंगल, नदी, निसर्ग, प्राणी या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देण्यासाठी मी आलो आहे. आम्ही अडचणीत होतो तेव्हा तुम्ही आमचा आवाज झालात. मी गांधींच्या विचारांचा अभ्यासक किंवा गांधीवादी नव्हतो. पण, या आंदोलनामुळे मी अपघाताने गांधीवादी झालो. शंभर वर्षांपूर्वी महात्मा गांधींनी हेच काम केले. त्यांच्याशी मिळतेजुळते काम करता येणे हाच गांधीवाद आहे. दरम्यान, मुख्य मांडवाबाहेर थांबूनही अनेक नागरिकांनी वांगचुक यांच्या भाषणाचा आनंद घेतला. वांगचुक यांच्या भाषणाला टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत त्यांना अभिवादन करण्यात आले. या भाषणासाठी पुणेकरांची तुडुंब गर्दी झाली होती. 

भटकळ म्हणाले, गांधी साहित्य संमेलनात माझा सत्कार झाला याचा खूप आनंद झाला आहे. तीन दिवस मी सगळी सत्रे ऐकली. यातील विचार ऐकून येथे येण्याचे सार्थक झाले. गांधी विचारांइतकेच गांधी विचारांचा आचार जास्त महत्त्वाचा आहे. गांधी अखेरपर्यंत विद्यार्थी राहिले. त्याप्रमाणे आपणही सतत त्यांचे विचार समजून घेतले पाहिजे. गांधी किंवा कोणत्याही थोर नेत्याचे तत्त्वज्ञान समजून न घेता लोक बोलतात. ते चुकीचे आहे. 

सप्तर्षी यांनी मनोगत व्यक्त करताना या संमेलनाची भूमिका मांडली. संमेलनाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करताना या संमेलनाचे सार सांगितले. द्वादशीवार म्हणाले, सर्व जाती, धर्म, भाषा या भिंती बाजूला पडतील तेव्हा आपण गांधीवादी होऊ. 

अन्वर राजन यांनी प्रास्ताविक केले. स्वाती महाळंक यांनी सूत्रसंचालन केले. लक्ष्मीकांत देशमुख यांनी आभार मानले. ॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰

 पर्यावरणाचे संतुलन बिघडले 

महात्मा गांधींना अभिप्रेत शिक्षण व्यवस्था आम्ही उभी केली आहे. प्रशिक्षण आणि कार्यानुभवातून मिळणारे शिक्षण गांधींना अपेक्षित होते. आज शिक्षण केवळ पैसे कमावण्यासाठी झाले आहे. संपत्ती निर्माण करून आपण पर्यावरणाचे संतुलन बिघडवत चाललो आहोत. पर्यावरणाबद्दल जग आत्ता जागे झाले पण गांधीजी शंभर वर्षांपूर्वी पर्यावरणाचा विचार करत होते. वीज निर्माण करण्यासाठी कोळश्याऐवजी सौरऊर्जा, पाणी, वारा हे उपाय शोधले जात आहेत पण मूळ आपण आपली ऊर्जेची गरज कमी केली पाहिजे. निर्मिती वाढवण्यापेक्षा गरज कमी केली तरच पर्यावरणाचे संतुलन राहील. तसे केले नाही तर सौरऊर्जा, पाणी, वारा हे सुद्धा कमी पडेल, असे सोनम वांगचुक यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post