गांधी विचार साहित्य संमेलन विशेषांकाचे प्रकाशन
लोकशाही,संविधान रक्षण करण्यासाठी योगदान द्यावे :डॉ.बाबा आढाव
------------
... अन्यथा इतिहास आपल्याला क्षमा करणार नाही:डॉ.बाबा आढाव
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित आगामी गांधी विचार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने 'सत्याग्रही विचारधारा' या मासिकाने तयार केलेल्या विशेषांकाचे प्रकाशन रविवार,दि.२ मार्च २०२५ रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव,राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजा कांदळकर यांच्याहस्ते झाले.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आणि 'सत्याग्रही विचारधारा' या मासिकाचे संपादक डॉ.कुमार सप्तर्षी हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
हा कार्यक्रम गांधी भवन,कोथरुड येथे दि.२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता झाला.
गांधी विचार साहित्य संमेलन विशेषांकाचे गांधी भवन येथे दि.७ ते ९ मार्च २०२५ रोजी होणार असून त्यानिमित्ताने तयार करण्यात आलेल्या या विशेषांकात गांधीजींच्या जीवन आणि संदेशाविषयी लेखन समाविष्ट करण्यात आले आहे.यावेळी लक्ष्मीकांत देशमुख, अन्वर राजन, राजा कांदळकर आणि एड.राजेश तोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन अभय देशपांडे यांनी केले तर गांधी स्मारक निधीचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख यांनी प्रास्ताविक केले.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन यांनी आभार मानले.
डॉ.बाबा आढाव म्हणाले,'सध्या लोकशाही प्रचंड प्रमाणात धोक्यात आली असून आता जर सामान्य जनता जागी होऊन संविधान रक्षण केले नाही ,तर इतिहास आपल्याला क्षमा करणार नाही.आजच्या मोदी आणि आर एस एस च्या विचाराने चाललेल्या देशात भारताची लोकशाहीच नव्हे तर देशाचे भवितव्यच धोक्यात आले आहे. प्रत्येकाने लोकशाही वाचवण्यासाठी संविधान रक्षण करण्यासाठी खारीचा वाटा उचलावा एवढेच कळकळीने सांगण्यासाठी मी या वयातही आवर्जून आलो. लोकशाही संपुष्टात आणून हुकूमशाही आणली आहे आणि दडपशाही आणण्यासाठी लोकांना खिरापती वाटणे, ते न जमल्यास लोकांचे आवाज दडपणे, असे प्रकार मोदी सध्या सर्रास करत आहेत, त्यासाठी त्यांनी सर्व सरकारी यंत्रणा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत', असेही बाबा आढाव म्हणाले.
'महात्मा गांधी यांचे विचारच आजच्या देशातील परिस्थितीवर खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरतील,याचसाठी गांधी विचारांचा यज्ञ म्हणून हे तीन दिवसीय साहित्य संमेलन भरविण्यात आले आहे',अशी माहिती कुमार सप्तर्षी यांनी यावेळी दिली.
तरुणांनी या तीन दिवसीय साहित्य संमेलनाकडे खुल्या मनाने यावे,यासाठीची पूर्वतयारी म्हणून हा गांधी विचारांचा मागोवा घेणारा विशेषांक प्रकाशित करण्यात आला असल्याची माहिती यावेळी लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिली.
'डॉ.कुमार सप्तर्षी यांचे विचार आणि कार्य पथदर्शक असून डॉ.सप्तर्षींमुळेच मी सामाजिक,राजकीय चळवळीत आलो,असे राजा कांदळकर यांनी सांगितले.आजच्या देशातील परिस्थितीवर मात करायची असेल तर साने गुरूजींचे विचार आठवावे लागतील .'देशातील जाती धर्मातील बंधुभाव जोवर जिवंत राहील तोवरच लोकशाही टिकेल',असे साने गुरुजी म्हणाले होते. म्हणूनच देशातील बंधुभाव पूर्णतः नष्ट करण्याचे सर्व प्रयत्न मोदी सरकार करीत आहे. ते हाणून पाडण्यासाठी आपल्याला बंधुभाव एकात्मता आणि समता कायम ठेवावी लागेल', असे मत कांदळकर यांनी व्यक्त केले.
.............................................
फोटो :
'सत्याग्रही विचारधारा' या मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन करताना डावीकडून एड.राजेश तोंडे,राजा कांदळकर,डॉ.बाबा आढाव,डॉ.कुमार सप्तर्षी,लक्ष्मीकांत देशमुख,अन्वर राजन
.