प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : बेकायदेशीरपणे घरात घुसून नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला १० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के.डी.शिरभाते यांनी सुनावली.दंड भरल्यास दंडाची रक्कम पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी, तसेच दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
नवनाथ अशोक खराडे (वय १९, रा. भोगेवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित ९ वर्षाच्या मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलिसात फिर्याद दिली आहे. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील नितीन कोंघे यांनी काम पाहिले. त्यांनी ८ साक्षीदार तपासले. सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगळे यांनी या प्रकरणाचा तपास केला.
त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी हवालदार ललिता कानवडे यांनी सहाय केले. ३ डिसेंबर २०१७ रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. घटनेच्या वेळी पीडित तिच्या घरात न्हाणीत भांडी घासत होती. त्यावेळी 'भो' म्हणत खराडे घरात घुसला. त्याने जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.