पुण्यातून : दोन कोटींच्या खंडणीसाठी एका हिरे व्यापाऱ्याचं अपहरण ..

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुण्यातून अपहरणाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही अज्ञातांनी दोन कोटींच्या खंडणीसाठी एका हिरे व्यापाऱ्याचं अपहरण केलं आहे. एका बड्या व्यापाऱ्याचं अशाप्रकारे अपहरण झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपींचा शोध घेतला जातोय.

तिथल राजेंद्र शाह असं अपहरण झालेल्या ३५ वर्षीय हिरे व्यापाऱ्याचं नाव आहे. ते पुणे सातारा रोडवर बिबवेवाडी परिसरातील मुद्रा सोसायटीत वास्तव्याला असतात. सोमवारी सायंकाळी काही अज्ञातांनी शाह यांचं अपहरण केलं आहे. घटनेच्या वेळी तिथल शाह हे आपल्या पत्नीसह मुलीला शाळेतून घरी आणण्यासाठी सॅलिस्बरी पार्क परिसरात गेले होते. मुलीला शाळेतून घेतल्यानंतर त्यांनी मुलीला पत्नीच्या ताब्यात दिलं आणि काही कामानिमित्त पुणे कॅम्प परिसरात गेले.

दरम्यान, सायंकाळी सहाच्या सुमारास फिर्यादीच्या फोनवर एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला. मी तुझ्या पतीला उचललं आहे. दोन कोटी तयार ठेवा. तुझ्या सासऱ्यांना सांग दोन तासांत फोन करतो, अशी धमकी फोनवरील व्यक्तीने दिली आणि फोन कट केला. या घडलेल्या प्रकारानंतर तिथल शाह यांच्या पत्नीने त्यांच्या मोबाईलवर फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण फोन लागला नाही. यानंतर त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. घटनेची माहिती अप्पर आयुक्त मनोज कुमार यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी रवाना झालं आणि तपासाची चक्र फिरवली आहेत.

यावेळी तिथल शाह यांचं शेवटचं लोकेशन नवले ब्रीज परिसरात आढळून आलं आहे. शिवाय पोलिसांनी शाह यांची दुचाकी देखील याच परिसरात आढळून आली आहे. आता त्यांच्यासोबत नक्की काय घडलं? त्यांचं अपहरण नेमकं कुणी केलं? याचा तपास पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे करत आहेत. या घटनेची दुसरी बाजू म्हणजे तिथल शाह हे मागील काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत होते. याशिवाय त्यांनी जास्तीचा परतावा देण्याचं आमिष दाखवत अनेकांकडून पैसे घेतले होते. आता याच कारणातून त्यांचं अपहरण झालं का? या अँगलने देखील पोलीस तपास करत आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post