प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : माहिती अधिकार कायदा, 2005 नुसार करण्यात आलेल्या अर्जावर कोणत्याही प्रकारची माहिती पुणे महानगरपालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातून पुरवली जात नसून संबंधित माहिती देण्याकरता कोणत्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे याच्या माहितीचा देखील स्पष्ट उल्लेख क्षेत्रीय कार्यालयात आढळत नाही. जे कर्मचारी सदर माहिती पुरवण्यासाठी जबाबदार आहे ते कार्यालयात उपलब्ध नसतात तसेच माहिती अधिकार अर्जाने मागवलेली माहिती विहित मुदतीत न देता किंवा चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देऊन वेळ मारून घेण्याचा प्रयत्न केला जातो असा अनुभव नागरिकांना येत आहे. संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांना माहिती अधिकार कायदा, 2005 संदर्भातील शासनाच्या सर्व जी.आर चा विसर पडलेला असून सदर ठिकाणी कोणताही जीआर कर्मचाऱ्यांच्या वतीने पाळला जात नाही. कर्मचाऱ्यांच्या अशा वागणुकीमुळे नागरिकांना हवे असलेली माहिती मिळण्यात अडचणी येत असून महापालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या कामांची पारदर्शकता कुठेतरी लपवली जात असल्याचा आरोप यावेळी आम आदमी पार्टीचे मीडियासह संयोजक निरंजन अडागळे यांनी केला.
याविषयी बोलताना अडागळे म्हणाले, मी माहिती अधिकार कायदा 2005 ला अनुसरून टेंडर संबंधित माहिती मागविण्यासाठी अर्ज केला होता. परंतु सदर माहिती देण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांकडे होती ते अधिकारी माहिती देण्याची टाळाटाळ करत असून कार्यालयात उपस्थित नसतात किंवा माहिती देण्यास विहित मुदतीपेक्षा जास्त विलंब करतात. नागरिकांसाठी ठराव पास झालेल्या किंवा टेंडरच्या फाईल बघण्याची सोमवारची वेळ ठरलेली असताना देखील सोमवारी सदर फाइल्स उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. अशाप्रकारे माहिती अधिकार कायदा 2005 ची सर्रास पायमल्ली भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात सुरू असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अजिबात लक्ष नाही.
माहिती अधिकार कायदा 2005 ची तात्काळ अंमलबजावणी जर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात केली गेली नाही तर आम आदमी पार्टीच्या वतीने या विरोधात मोठे आंदोलन उभारले जाईल व क्षेत्रीय कार्यालया बाहेरच आम्ही उपोषणाला बसू.
निरंजन अडागळे
आम आदमी पार्टी
मीडिया सहसंयोजक, पुणे शहर