प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील :
पाली, ता. सुधागड येथील पिलोसरी आणि भार्ज गावाच्या हद्दीत सुरेंद्र पाटील यांच्या मालकीची खडी क्रशर आणि कॉरी बेकायदेशीररीत्या चालू असून, यामध्ये खुलेआम कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर ब्लास्टिंग, झाडांची कत्तल, पर्यावरणाचा ऱ्हास आणि शासनाच्या तिजोरीची लूट सुरू आहे. यामध्ये स्थानिक अधिकाऱ्यांचा जाणीवपूर्वक हात असल्याचा आरोप होत आहे.
या बेकायदेशीर धंद्याविरोधात अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही. महसूल, वन, आणि पर्यावरण विभागाचे अधिकारी या सर्व प्रकाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध ब्लास्टिंग सुरू असताना पोलिस आणि स्थानिक अधिकाऱ्यांना काहीच दिसत नाही का? की त्यांना गप्प बसण्यासाठी काहीतरी दिले जात आहे?
या भागात होत असलेल्या अनधिकृत ब्लास्टिंगमुळे आसपासच्या घरांना तडे जात आहेत, जमिनीला भेगा पडत आहेत, आणि भूगर्भातील पाण्याचे स्रोत नष्ट होत आहेत. ज्या गावकऱ्यांचे पिढ्यान्पिढ्यांचे घर आहे, त्यांना आता या कंपन्यांमुळे स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे. प्रशासनाकडून कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही, कोणतेही निरीक्षण नाही – फक्त भ्रष्टाचार आणि निष्क्रियता!
सुरेंद्र पाटील यांच्या क्रशर आणि कॉरीतून शासनाला लाखो रुपयांची रॉयल्टी मिळायला हवी, पण ती कुठे जाते? स्पष्ट आहे – ही रक्कम काही मोजक्या अधिकाऱ्यांच्या खिशात जात आहे, आणि त्यामुळेच या बेकायदेशीर धंद्याला अभय मिळत आहे. एका व्यक्तीसाठी संपूर्ण यंत्रणा मूकबधिर झाली आहे!
श्री. काशिनाथ जगन्नाथ ठाकूर (रा. कोलेटीवाडी, ता. पेण, जि. रायगड) यांनी महसूल मंत्री यांच्याकडे या भ्रष्टाचाराची तक्रार केली असून, महसूल मंत्री यांनी जिल्हाधिकारी, रायगड आणि अपर मुख्य सचिव, महसूल व वन विभाग यांना ७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पण प्रश्न असा आहे – यावेळीही हे भ्रष्ट अधिकारी प्रकरण दडपून टाकणार का?
जनतेने आता या बेशरम प्रशासनाला जाब विचारला पाहिजे. जर तातडीने कार्यवाही झाली नाही, तर रायगड जिल्ह्यातील नागरिक रस्त्यावर उतरतील आणि आंदोलन छेडतील. सरकारला जनतेच्या दबावाशिवाय जाग येत नसेल, तर ही जाग आणण्यासाठी लोकांनी आता संघटित व्हावे लागेल!
प्रशासन लोकांसाठी आहे की भ्रष्ट धंदेवाल्यांसाठी? जर कायद्याची पायमल्ली अशीच चालू राहिली, तर हा प्रशासनाचा खरा चेहरा उघड करण्यासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही!