प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- राष्ट्र पुरुषांचा अवमान करुन इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी देणे, आणि धार्मिक, जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य पत्रकार प्रशांत कोरटकर याने केली आहेत. याबाबत कोल्हापुरात प्रशांत कोरटकरवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. कोरटकरने कोल्हापूर पोलिसांच्याकडे जमा केलेला मोबाईल, सीमकार्डमधील डाटा डिलीट केला असल्याचा युक्तीवाद न्यायालयात सरकारी पक्षाने केला. तर कोरटकरच्या वकीलांनी सुरक्षेच्या कारणास्तव कोरटकरला व्हीसीव्दारे हजर राहण्याची परवानगी मागणी केली. यावर उद्या बुधवारी (दि. १२) जिल्हा व सत्र न्यायाधिश डी.व्ही कश्यप यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.
२५ फेब्रुवारी रोजी रात्री प्रशांत कोरटकर याने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी देऊन तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान होईल अशी भाषा वापरली. तसेच जातिय तेढ़ निर्माण होईल असे भाष्य केले. याबाबत २६ रोजी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कोरटकरच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तात्काळ तपास करण्याच्या सूचना कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांना फोन वरुन दिले होते.
प्रशांत कोरटकर याचा ताबा घेण्याासाठी जुना राजवाडा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे संयुक्त पथक नागपूरला गेले होते. मात्र कोरटकरने कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयातून अटकपूर्व अंतरीम जामीन अर्ज केला होता. त्यामुळे ११ मार्चपर्यंत कोरटकरला दिलासा मिळाला होता. नागपूर सायबर पोलीसांनी कोरटकरचा जप्त केलेला मोबाईल व सीमकार्ड कोल्हापूर पोलीसांच्या ताब्यात दिले. हा मोबाईल राजवाडा पोलीसांनी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला होता. दरम्यान मोबाईलमधील डाटा डिलीट करूनच तो जमा केल्याचे फॉरेन्सिकच्या लक्षात आले. लॅबने तसे पोलीस अधिकाऱ्यांनाही कळविले आहे.
मंगळवारी झालेल्या सुनावणीत बचाव पक्षाचे वकील ॲड. सौरव घाग यांनी कोरटकरचा अंतरीम जामीन वाढवण्याचा अर्ज दाखल केला. त्यानुसार न्यायाधिशांनी एक दिवसाने अटकपूर्व जामीन वाढविला आहे. जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी बाजू मांडली की, कोरटकरकडे गुन्हयाबाबत चौकशी करणे गरजेचे आहे, कारण त्याने मोबाईलमधील डाटा इरेजर केला आहे. त्यामुळे त्याने न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडावे.
इंद्रजित सावंत यांच्यावतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील ॲड. असिम सरोदे यांनी व्हिसीव्दारे युक्तीवाद केला. ते म्हणाले, 'कोरटकरच्या विरोधात सरकारकडे भरपूर पुरावे आहेत. त्याच्याकडे अजून तपास करण्यासाठी तो पोलीसांच्या ताब्यात मिळणे गरजेचे आहे' बचाव पक्षाचे वकील ॲड. सौरव घाग म्हणाले, कोरटकर तपास कामात सहकार्य करण्यास तयार आहेत, त्यांनी मोबाईलही जमा केला आहे. जर सरकारी पक्षाला त्यांनी डाटा डिलीट केला असे वाटत असेल तर सीडीआर काढून तपास करावा. यासाठी कोरटकर न्यायालयात येण्याची गरज नाही. सुरक्षेच्या कारणास्तव कोरटकर यांना प्रत्येक्षात न्यायालयात हजर न राहता व्हीसीव्दारे हजर राहण्याची परवानगी मिळावी.असा युक्तीवाद केला.न्यायालयाने
दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन याबाबत बुधवारी सुनावणी केली जाईल असे न्यायाधिश डी.व्ही. कश्यप यांनी सांगितले. यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे हजर होते. इंद्रजित सावंत,हर्षल सुर्वे,दिलीप देसाई यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
----------
पोलिसांचा मोठा बंदोबस्त.
खबरदारी म्हणुन राज्य राखीव दलाच्या जवानांसह जुना राजवाडा, शाहूपुरी पोलीसांचा मोठ्या प्रमाणात न्यायालयाच्या आवारात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. न्यायसंकुलाच्या प्रवेशव्दारावर मोठी पोलिसांची कुमक उभी केली असल्याने सर्वाना चौकशी करूनच आत सोडले जात होते.
---------
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना देशभरातील लोक देव मानतात, त्यांची पूजा करतात. मात्र कोरटकरने या राष्ट्र पुरुषांचा अवमान करून तो देशभरातील मराठी माणसाच्या भावना दुखावल्या आहेत.त्यामुळे कोरटकर याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.अशी मागणी अर्जाद्वारे प्रजास्ताक संघटनेच्या वतीने ॲड. बाबा इंदूलकर यांनी न्यायालयात केला होता.पण न्यायालयाने तो नाकारला.
----------
प्रशांत कोरटकरने मला धमकावले हे माझ्यासाठी महत्वाचे नाही, तर त्याने मी ज्यांना देव मानतो त्या राष्ट्रपुरुषांचा अवमान केला आहे. असा चिल्लर माणूस पोलीसांना का सापडत नाहीत.हे दुर्दैवी आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे शिवप्रेमी आहेत. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून पोलीसांना आदेश द्यावेत. मी काय केले नाही असे तो म्हणतो मग लपून का बसलाय ? असा सवाल इंद्रजित सावंत यांनी यावेळी न्यायालयाच्या आवारात केला.