प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - टेंबलाईनाका चौकाकडून टाकाळा चौकाकडे भरधाव येणाऱ्या मोटारीने उड्डाण पुलाजवळील पार्क केलेल्या नऊ वाहनांना ठोकर दिली. यात मोटारातील चालक ठार झाला. धीरज शिवाजीराव पाटील (वय ५५, रा. राजारामपुरी पाचवी गल्ली, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. हा प्रकार शनिवार (दि.15 फ़ेब्रु.) रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला. वेगाने वाहन चालवून वाहनांना ठोकर देवून सुमारे अडीच लाखांचे नुकसान केल्या प्रकरणी पाटील यांच्यावर गुन्हा नोंद केल्याची माहिती राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली.
पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की , टेंबालाई उड्डाण पुलाशेजारीच घरे आहेत. छोटी घरे असल्यामुळे त्या परिसरातील नागरिकांची वाहने रस्त्याकडेला पार्क केलेली असतात. शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास धीरज पाटील हे त्यांच्या मोटारीतून टेंबलाई चौकातून टाकाळ्याकडे येत होते. मात्र त्यांच्या मोटारीचा वेग प्रचंड होता. यामध्ये त्यांनी उड्डाण पुलाशेजारी पार्क केलेल्या आठ दुचाकी आणि एका रिक्षाला जोरदार ठोकर दिली. एका मागून एक करीत ठोकर देत मोटार पुढे गेली. कचरा कोंडाळ्याच्या ठिकाणी ती रस्त्याकडेला असलेल्या कचऱ्यात जावून थांबली. यावेळी मोठ्या प्रमाणात आवाज झाला. काही क्षणात परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धावा केला. यावेळी धीरज पाटील हे चालकाच्या सीटवरून शेजारील सीटवर फेकले गेले होते.तेथील नागरिकांनी १०८ वर कॉल करून रुग्णवाहिकेला बोलावून जखमीला रुग्णालयात हलविले. याचवेळी राजारामपुरी पोलिस ठाण्यातील गस्तीवर असलेल्या पोलिसांनी अपघातास्थळी धाव घेतली. मोठा अपघात झाल्यामुळे तेथील नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस कॉन्स्टेबल दिगंबर कुंभार यांनी याचा पंचनामा करून फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा नोंद केला आहे.
-----
उड्डाण पुल परिसरातील नागरिक रात्री साडेबारापर्यंत फुटपाथवर बसून होते. उन्हाळा अधिक असल्यामुळे अनेक जण उष्मा कमी करण्यासाठी काही जण बाहेर झोपतात. मात्र शनिवारी रात्री कोणीही बाहेर झोपले नसल्याने त्यामुळे पुढ़ील अनर्थ टळाला. अपघाताच्या ठिकाणी मोपेड, मोटारसायकल यांचा चुराडा झाला आहे. दोन मोटारसायकलींचा आकार चेंडू सारखा झाला आहे. यावरून मोटारीची धडक किती मोठी आणि वेगाने असेल याचा अंदाज आला.