प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देऊन युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणे, दोन समाजात संघर्ष निर्माण होईल असे वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी दोन्ही बाजूच्या वकीलांनी जोरदार युक्तीवाद केला. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनीही जामीन मंजूर करण्यास विरोध केला. सरकार व बचाव पक्षाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधिश डी.व्ही. कश्यप यांनी उद्या मंगळवार पर्यत निर्णय राखून ठेवला आहे.
इंद्रजित सावंत यांनी २५ फेब्रुवारी रोजी कोरटकरच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर काही दिवसांनी कोरटकरला अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर झाला. दरम्यान नागपूर पोलीसांकडे जमा केलेला कोरटकरचा मोबाईल व सीमकार्ड कोल्हापूर पोलीसांना मिळाले. मात्र यातील डाटा डिलीट केल्याचे फॉरेन्सिक लॅब तंज्ज्ञांच्या निदर्शनास आले. कोरटकर तपासात सहकार्य करीत नसल्याने त्याचा जामीन रद्द करून पोलीसांना ताबा मिळावा. अशी मागणी सरकारी वकील यांनी केली आहे.
सुरुवातीस कोरटकरचे वकील ॲड. सौरभ घाग यांनी आपल्या युक्तीवादात कोरटकर व इंद्रजित सावंत यांच्यात मोबाईलवर झालेले संभाषण हे आपापसात मर्यादीत होते. ते सोशल मिडीयावर व्हायरल करण्यासाठी नव्हते. उलट सावंत यांनी ते व्हायरल करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कोरटकर तपासात सहकार्य करायला तयार आहेत. पोलीस जेव्हा त्यांना आवाजाचे नमुने घेण्यासाठी पाचारण करतील तेव्हा ते येतील, त्यांनी मोबाईल,सीमकार्ड जमा केले आहे. असे असताना त्यांचा पोलीसांना ताबा कशासाठी पाहिजे आहे. वास्तविक ज्या गुन्ह्यात तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते. त्यामध्ये अटक करण्याची गरज नाही. यासाठी त्यांनी वेगवेगळे दाखले न्यायालयात सादर केले.
जिल्हा सरकारी वकील यांनी आपल्या युक्तीवादात अटक टाळण्यासाठी कोरटकर हे वेगवेगळी कारणे सांगत आहेत. आपला मोबाईल हॅक झाला होता,त्यामुळे जे संभाषण सावंत यांच्याबरोबर झाले ते मी केलेच नाही असा कांगावा कोरटकर करीत आहेत . पोलीसांनी त्यांच्या मोबाईल तज्ञांकडून तपासला असता १ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारीपर्यंत हा मोबाईल कोरटकरनेच वापरल्याचे दिसून येते. मी जबाबदार पत्रकार असल्याचे सांगून तो अटक टाळत आहे. त्याला अटकपूर्व जामीन मिळाला तर तपास कामात अडथळे निर्माण होणार आहेत. त्यामुळे कोरटकरचा जामिन नामंजूर करून त्याचा ताबा पोलीसांकडे देण्यात यावा.
फिर्यादी इंद्रजित सावंत यांचे वकील ॲड. असिम सरोदे यांनी आपले मांडताना संशयीत प्रशांत कोरटकरच्या मोबाईलवरील संवादावरून असे लक्षात येते की, त्याला कायद्याचा आदर नाही,त्याची प्रवृत्ती समाजासाठी घातक आहे. छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल त्याच्या मनात खूप राग आहे. मोबाईलमधील डाटा डिलीट मारून त्याने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पोलीसांनी त्याच्या विरोधात पुरावा नष्ट करण्याचे कलम वाढवावे.
दोन्ही बाजूंच्या वकीलांचा जवळपास दीड तास युक्तीवाद सुरू होता. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर न्यायालयाने याबाबत मंगळवारी निर्णय देण्यात येईल असे सांगितले. यावेळी फिर्यादी इंद्रजित सावंत, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल सुर्वे, प्रजासत्ताकचे दिलीप देसाई आदी मान्यवर हजर होते.
"जामीन नाकारावा : पोलीस निरीक्षक झाडे."
जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी पोलीसांचे म्हणणे मांडत असताना कोरटकर याच्या आवाजाचे नमुने घ्यावयाचे आहेत. त्याने जेव्हा फोन केला त्यावेळी त्याच्यासोबत कोण होते ? पोलीस पथक नागपूरला गेले तेव्हा कोरटकर सापडला नाही. या गुन्हयाबाबत त्याच्याकडून माहिती घ्यावयाची असल्याने अटकपूर्व जामीन नाकारला जावा असे न्यायाधिशांना सांगितले.