प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर/ प्रतिनिधी : स्त्री पुरुष समानता घरातूनच सुरु व्हायला हवी. प्रसंगी स्वतःकडे दुर्लक्ष करत कुटुंबाला प्राधान्य देणारी, प्रत्येकाची काळजी घेत कुटुंबाच्या हितासाठी सदैव राबणारी स्त्री ही सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. सौ. रुपाली पाटील यांनी केले.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत महिला पत्रकारांच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रवीणा महिला सबलीकरण फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्रा. प्रमोदिनी माने होत्या. कोल्हापुरातील शाहू स्मारक येथे सरस्वती प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.डॉ. पाटील म्हणाल्या, पत्रकारितेत महिलांचा वाढता सहभाग निश्चितच कौतुकास्पद असून आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजहिताचे काम करतानाच स्वतःच्या आरोग्याकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. महिला कोणतीही असो अगदी कौशल्याने आपल्या जबाबदाऱ्या सांभाळते पण स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करते. कधीकधी कुटुंबाच्या हितासाठी आपल्या सर्वस्वाचाही त्याग करते. अनेक महिला सुपरवुमन बनण्याचा प्रयत्न करीत असतात पण त्यांनी काही मर्यादाही पाळायला हव्यात. स्त्री पुरुष समानता हा केवळ चर्चेचा विषय नाही तर या गोष्टी प्रत्यक्षात उतरण्याची गरज आहे. प्रा. प्रमोदिनी माने म्हणाल्या, समाजाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधली असली आणि यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय असला तरीही चिमूरडीपासून वृद्ध महिलांवर होणाऱ्या अतिप्रसंगाच्या, अत्याचाराचा घटना थांबताना दिसत नाहीत. ही परिस्थिती बदलायची असेल तर समाजाचा दृष्टिकोन बदलायला हवा. महिलांनीही या गोष्टी टाळण्यासाठी सजगता बाळगण्याची आवश्यकता आहे. मन, मनगट आणि मेंदू मजबूत केल्यस महिलांवर होणारे अन्याय अत्याचार रोखता येतील. पत्रकारांनीही प्रखर लेखणीतून महिलांना न्याय द्यावा.
राजमाता जिजाऊमुळे शिवबा घडले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिला शिक्षित झाल्या. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजाने वाटचाल करण्याची गरज आहे. स्त्री-भ्रूण हत्येमुळे मुलींची संख्या घटत असून स्त्री-भ्रूण हत्येला पायबंद न घातल्यास भविष्यात मोठ्या दुष्परिणामांना सामोरे जागेल. किंबहुना आतापासूनच त्याची तीव्रता जाणवत आहे. दृष्टी बदलली की आपोआपच दृष्टिकोन बदलतो त्यामुळे स्त्री पुरुष असमानता दूर करण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची खरी गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ सायली मराठे म्हणाल्या, पत्रकारिता करताना अनेक अडचणी येत असल्या तरीही इतर क्षेत्राप्रमाणेच पत्रकारितेतही महिलांनी आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. या क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग निश्चितच आनंददायी आहे. संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांनी स्वागत व प्रास्ताविकात संघटनेच्या कार्याचा आढावा घेतानाच पत्रकारितेचे बदलते स्वरुप याविषयी विवेचन केले. सहा एप्रिल रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या संघटनेच्या तिसऱ्या राज्यस्तरीय महाअधिवेशनास डिजिटल माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री फास्के यांनी यावेळी केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या महिला पत्रकारांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. जेष्ठ पत्रकार सुनंदा मोरे, श्रद्धा जोगळेकर, शुभांगी तावरे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी महिला आघाडीच्या कोल्हापूर शहराध्यक्षपदी अमृता पवार, उपाध्यक्षपदी सुरेखा शेजाळे तर सचिवपदी शुभांगी तावरे यांची निवड जाहीर करून त्यांना निवडपत्रे प्रदान करण्यात आली तसेच खानापूर (ता. भुदरगड) येथील पार्थ प्रवीणसिंह सावंत यांची जिल्हा कार्यकारिणीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील यांनी आभार मानले तर जिल्हा सचिव संजय सुतार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश सावंत, प्रदेश सचिव तेजस राऊत, जिल्हा उपाध्यक्ष दीपक मांगले, कोल्हापूर शहराध्यक्ष अझरुद्दीन मुल्ला, उपाध्यक्ष विजय यशपुत्त, शिरोळ तालुकाध्यक्ष इकबाल इनामदार, हातकणंगले तालुकाध्यक्ष कीर्तीराज जाधव, हातकणंगले तालुका सचिव संभाजी चौगुले.शाहूवाडी तालुकाध्यक्ष सतीश नांगरे, जिल्हा संपर्कप्रमुख राजा मकोटे, सहसचिव इंद्रजीत मराठे, संतोष नाधवडेकर, पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे, इचलकरंजी शहराध्यक्ष सॅम संजापुरे, महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्षा प्रीती कलढोणे आदींसह संघटनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
Tags
कोल्हापूर