प्रेस मीडिया लाईव्ह
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - मोठ्या शहरा पाठोपाठ आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भानामतीचे अनेक प्रकार उघडकीस येत असताना आज पहाटेच्या सुमारास करवीर तालुक्यातील हणमंतवाडी परिसरात भानामतीचा एक प्रकार उघडकीस आला. गावा जवळच्या हणमंतवाडी - शिंगणापूर रस्त्यावर केळी नारळ लिंबू फळे महिलाचे श्रुंगार असे महागडे साहित्य गावाच्या ओढ्यावर एका अज्ञात व्यक्तीने आणून ठेवल्याचे आढ़ळून आले.
अधिक माहिती अशी, गुरुवार (ता.२७ मार्च) रोजी पहाटेच्या सुमारास हणमंतवाडी गावच्या वेशीवर असणाऱ्या ओढ्यावर एका अज्ञात व्यक्तीने महिलांचे सौंदर्य साहित्य ओढ्याच्या सुरक्षा कठड्याच्या बाजूला पांढऱ्या कापड्यात मांडून ठेवल्याचे ग्रामस्थांना आढ़ळून आल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलींना आकर्षित करण्यासाठी भोंदू बाबाच्या सांगण्यावरून हा प्रकार केला असल्याची चर्चा परिसरातील ग्रामस्थांत आहे.
गेल्या काही महिन्याभरात कोल्हापुरातील विविध भागात भानामतीचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. दीड महिन्यापूर्वी १४ फेब्रुवारी रोजी एका तरुणीचा फोटो ठेवून भानामती केल्याचा प्रकार नागदेववाडी शिंगणापूर रस्त्यावर आढळून आला होता. तर पंधरा दिवसापूर्वी भुदरगड तालुक्यात महिला आणि मुलींचे फोटो झाडाच्या बुंध्यात खिळयाच्या साह्याने ठोकल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तसेच करवीर तालुक्यात देखील एका शेतात असाच भानामतीचा प्रकार उघडकीस आला आहे. तोपर्यंत आज करवीर तालुक्यातील हणमंतवाडी - शिंगणापूर रस्त्यावर हणमंतवाडी गावाच्या वेशीनजीक भानामतीचा हा प्रकार आढळून आल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. भोंदू बाबाच्या सांगण्यारून एका अज्ञात इसमाने पांढऱ्या कापडात सुपामध्ये नारळ, लिंबू, केळी, बांगड्या व त्यावर हळदी कुंकू लावलेले साहित्य ठेवण्यात आले आहे तर त्याच्या शेजारीचं दुसऱ्या एका पाटीत महिलांचे महागडे शृंगार साडी, ब्लाऊज पिस, पावडर, काजळ, लिपस्टिक, गजरा, बांगड्या, हळदी कुंकू असे साहित्य ठेवण्यात आल्याचे त्या परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले.
दरम्यान गावातील महिला आणि मुलींना वंश करण्यासाठी भोंदू बाबांच्या सांगण्यावरून हा भानामतीचा प्रकार केला असण्याची शक्यता असल्याची चर्चा हणमंतवाडीसह शिंगणापूर, नागदेववाडी परिसरात सुरू आहे. गेल्या दीड दोन महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यात भानामतीचे अनेक प्रकार उघडकीस आल्याने भोंदू बाबांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.