शेड मध्ये जळण रचून ठेवलेल्या सरणाला चुलीची झळ लागल्याने आगीचा भडका. नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला.

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - करवीर तालुक्यातील शिंगणापूर परिसरातील  दत्तनगर, फुलेवाडी मधील एका घराला लागून असलेल्या शेडात जळण रचून ठेवलेल्या ठिकाणी चुलीची धग सरणाला लागल्याने मंगळवारी (ता. ४) रोजी सायंकाळी ८ च्या सुमारास आग लागली. हा प्रकार कॉलनीत खेळनाऱ्या लहान मुलांना आग दिसल्याने मुलांनी आरडाओरड केली. कॉलनीतील नागरिकांनी एकत्र येत आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला.                         

  शिंगणापूर मार्गावरील दत्तनगर फुलेवाडी मध्ये राहणाऱ्या आनंदी भिवा मिणचेकर (वय, ६५, मूळ.ता.गारगोटी, मिणचे) या ३० वर्षांपासून एकट्या दत्तनगर मध्ये राहतात त्यांचे इतर नातेवाईक गारगोटी तालुक्यात राहतात. त्या मोलमजुरी करून स्वतः चा उदरनिर्वाह करतात. कामावरून संध्याकाळी घरी आल्यावर त्यांनी दारात पाणी तापवण्यासाठी जळण रचून ठेवले होते. चुलीत जळण घालून त्या घरात गेल्या होत्या. त्या वेळी चूल असलेल्या शेडात चुलीला लागूनचं एकावर एक लाकडांच्या मोळ्या रचून ठेवल्या आहेत. वाऱ्याच्या झोक्याने चुलीतील प्लॅस्टिक कागद उडून लागूनच रचून ठेवलेल्या सरणाला लागल्याने बघता बघता  आगीने पेट घेतला.                        

  कॉलनीतील खेळत असलेल्या लहान मुलांनी आग लागल्याचे पाहून आरडाओरड सुरू केली. लहान मुलांचा आवाज ऐकून नागरिक बाहेर आले व नागरिकांनी जमेल त्या पद्धतीने बादली, हंडा यांच्या सहाय्याने पाणी मारुन  आग विझविण्यास सुरवात केली. आग नियंत्रणात आणण्यासाठी जनार्दन यादव यांच्या घरातील मोटर लावून पाईपच्या प्रेशर ने पाण्याचा फवारा करण्यात आल्याने आग आटोक्यात आली. नागरिकांच्या सतर्कतेने वेळीच घटनेचे गांभीर्य ओळखूण जलद कृती करण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. आग विझविण्यासाठी अमित सुतार, सचिन लाड, भूषण चिले, चंद्रकांत पोवार या तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझविल्याने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही, आगीत काही प्रमाणात सरण जळून खाक झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post