प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देऊन छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज याच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळला आहे. त्यामुळे कोरटकरच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधिश डी. व्ही. कश्यप यांच्या न्यायालयात हा अर्ज ठेवण्यात आला होता. सोमवारी दोन्ही बाजूच्या वकीलांनी जोरदार युक्तीवाद केला होता.
२५ फेब्रुवारी, २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास प्रशांत कोरटकर याने इंद्रजित सावंत यांना मोबाईलवर फोन करून धमकी दिली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त, प्रक्षोभक वक्तव्य केली. दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने याची सावंत यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर कोरटकरने जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केल्यानंतर त्याला ११ मार्च पर्यंत अंतरीम जामीन मंजूर केला होता.
याबाबत जिल्हा व सत्र न्यायाधिश डी.व्ही. कश्यप यांच्या न्यायालयात दोन वेळा सुनावणी झाली. सरकारी वकील ॲड. विवेक शुल्क यांनी सरकारची बाजू मांडली, इंद्रजित सावंत यांचे वकील ॲड. असिम सरोदे यांनी कोरटकर याने केलेले वक्तव्य किती गंभीर आहे, त्याला कायद्याची भिती नाही, राष्ट्रपुरुषांबद्दल त्याच्या मनात द्वेश आहे. मोबाईलमधील डाटा डिलिट करून त्याने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पोलिसांनी पुरावा नष्ट करण्याचे कलम वाढवावे. त्याला जामीन नाकारावा असा जोरदार युक्तीवाद केला होता.
जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी न्यायालयात सांगितले की, संशयीत कोरटकर याच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत. त्याने जेव्हा फोन केला त्यावेळी त्याच्यासोबत कोण होते? तसेच पोलीस पथक नागपूरला गेले त्या वेळी कोरटकर सापडला नाही. या गुन्ह्याबाबत त्याच्याकडून माहिती घ्यावयाची असल्याने अटकपूर्व जामीन नाकारला जावा अशी न्यायाधिशांकडे विनंती केली होती.
कोरटकरने आपला मोबाईल व सीम कार्ड ४८ तासात नागपूर पोलिसांकडे जमा केले. त्यानंतर मोबाईल व सीमकार्ड कोल्हापूर पोलिसांना मिळाले; मात्र यातील डाटा डिलिट केल्याचे फॉरेन्सिक लॅब तज्ज्ञांच्या निदर्शनास आले. कोरटकर तपास पथकाची दिशाभूल करीत आहे. त्यामळे त्याचा अंतरीम जामीन रद्द करून पोलिसांना ताबा मिळावा, असा युक्तीवाद सरकारी वकील ॲड. विवेक शुक्ल यांनी केला होता.
बचाव पक्षाचे वकील ॲड. सौरभ घाग यांनी कोरटकर तपासात सहकार्य करायला तयार आहेत. पोलीस जेव्हा त्यांना आवाजाचे नमुने घेण्यासाठी बोलावतील तेव्हा ते येतील, त्यांनी मोबाईल, सीमकार्ड जमा केले आहे. ज्या गुन्ह्यात तीन वर्षांच्या आत शिक्षा होऊ शकते, त्यामध्ये अटक करण्याची गरज नाही. असे मुद्दे मांडले होते.
दोन्ही बाजूने सोमवारी जोरदार युक्तीवाद झाला होता. मंगळवारी न्यायालयाने सरकारी वकील यांनी केलेला जोरदार युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरुन प्रशांत कोरटकरला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे जुना राजवाडा पोलीसांना त्याच्या अटकेचे मार्ग मोकळे झाले आहेत. जामीन फेटाळल्याने इंद्रजित सावंत यांना दिलासा मिळाला आहे.
¸