प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- कोल्हापुरातील त्रिकुटाने हॉटेल व्यावसायिकाला माझ्याकडे हॉटेलचे बिल मागायचे नाही,नाहीतर तुला ठार मारीन.तसेच हॉटेल चालू ठेवायचे असेल तर दरमहा १० हजार रुपयांची खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी सराईत गुंडाने बसस्थानक परिसरातील हॉटेलचालकास दिली. याप्रकरणी फिर्यादी प्रकाश शेखर शेट्टी (वय ५३, रा. रुईकर कॉलनी) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी सराईत गुंड अभय गोपीनाथ मोरे ऊर्फ आडग्या (वय ३८, रा. शिवाजी पार्क, सध्या कनाननगर), शाम काकासोा जाधव (वय ४५, रा. विचारेमाळ) नागेश बाळू वाघमारे (वय ४५, रा. कावळा नाका) या त्रिकुटाला गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ अटक केली.
संशयित शुक्रवार, (दि. २१ मार्च) रोजी दुपारी एक वाजता मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील हॉटेल गिरीश येथे चहा-नाश्ता करण्यासाठी गेले होते. ते बाहेर पडत असताना हॉटेलचालक प्रकाश शेट्टी यांनी बिलाची मागणी केली, तेव्हा संशयितांनी त्यांना धमकी देऊन गेले.
त्यानंतर शेट्टी यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक संतोष डोके यांची भेट घेतली. घडलेला सर्व प्रकार सांगून रीतसर गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी संशयित अभय, शाम व नागेश या तिघांना अटक केली आहे. त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. अभय मोरे याच्यावर शाहूपुरी व आष्टा पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.
फाळकूटदादांची दहशत.....
शहरासह उपनगरांत काही फाळकूटदादांची दहशत वाढत चालली आहे. हॉटेलमध्ये रात्री जेवण केल्यानंतर बिल देण्यास नकार देणे, तोडफोड करण्याची धमकी देणे असे प्रकार काही ठिकाणी सुरू असतात.काही हॉटेलचालक वाद नको म्हणून तक्रार देण्यास टाळाटाळ करत. त्यामुळेच या गुंडांचे धाडस वाढते. तक्रारी आल्या तरच त्यांच्यावर अंकुश बसू शकतो. यासाठी हॉटेलचालक, दुकानदार, व्यापाऱ्यांनी पुढे येणे गरजेचे आहे.