प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.२८ येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयात मराठी विभाग आणि समाजवादी प्रबोधिनीच्या संयुक्त विद्यमाने कवी कुसुमाग्रज जन्मदिवस अर्थात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने महाविद्यालयात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मनेर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कवी संमेलनात सुप्रसिद्ध गझलकार प्रसाद कुलकर्णी, जेष्ठ कवयित्री वैशाली नायकवडी हे निमंत्रित कवी होते.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे गझलकार प्रसाद कुलकर्णी यांनी कुसुमाग्रज यांच्या सोबतच्या आठवणी, त्यांचं साहित्य आणि मराठी भाषेचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगत प्रेम, जीवन, संघर्ष अशा आशयाच्या गझला सादर केल्या. तर कवयित्री वैशाली नायकवडे यांनी जगण्यातील मातृभाषेचे महत्त्व समजावून सांगत लेकीचे सासर आणि माहेराशी असणारे नाते, स्त्रियांचे आयुष्य यासंदर्भाच्या कविता सादर केल्या.
अध्यक्षीय मनोगतात बोलताना प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर म्हणाले, "इतर भाषांबद्दल नेहमी आपल्याला आदर असलाच पाहिजे परंतु मातृभाषेचे संवर्धन हे आपले कर्तव्य आहे. भाषेतला प्रत्येक शब्द हा आपल्या संपत्ती सारखा आपण जपला पाहिजे. दैनंदिन व्यवहारात आपण स्वतःच्या बोलण्यामध्ये मातृभाषेचा आग्रह स्वतः प्रत ठेवायला हवा. कुसुमाग्रज, वि. स. खांडेकर यांच्यासह असंख्य साहित्यिकांचे मराठी भाषेवर, मराठी साहित्यावर अनंत उपकार आहेत. ते साहित्य आपण वाचायला हवे." अशा आशयाचे मनोगत व्यक्त करत बेकारी या वास्तववादी कवितेने त्यांनी अध्यक्षीय मनोगताचा समारोप केला. यावेळी प्रा. डॉ. सुभाष जाधव, प्रा. रोहित शिंगे या गुरुदेव कार्यकर्त्यांसह कु. प्रीती भिसे, कु. रुक्सार मोमीन व कु. अर्पिता सूर्यवंशी या विद्यार्थिनींनी आपल्या कविता सादर केल्या.
दीपप्रज्वलन व संस्था प्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी करून दिला तर आभार प्रा. रोहित शिंगे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती कोळेकर यांनी केले. यावेळी गुरुदेव कार्यकर्ते विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.