प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : पैसे काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांना हेरून आपणही त्यांच्या मागे एटीएम केंद्रात जात हातचलाखीने त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदली करुन फसवणूक करणार्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे.त्याच्याकडे तब्बल १६६ एटीएम कार्ड सापडली असून, पुण्यातील २१ ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यापैकी १६ गुन्हे उघडकीस आणून १३ लाख ९० हजार ७०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
राजू प्रल्हाद कुलकर्णी (वय ५४, रा. अलानहली, म्हैसूर, कर्नाटक, सध्या रा. धनकवडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १६ गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून, त्यात १७ लाख ९२ हजार ७०० रुपयांची रक्कम हडपली होती. त्यापैकी १३ लाख ९२ हजार ९०० रुपये हस्तगत करण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके, पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, सचिन कदम व त्यांच्या पथकाने केली आहे.
शास्त्री रोडवरील महाराष्ट्र बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये एकाने ज्येष्ठ नागरिकाचे ए टी एम कार्ड बदली करुन त्यांच्या खात्यातून २२ हजार रुपये काढून घेऊन फसवणुक केली होती. २ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या गुन्ह्याच्या तपास सुरू होता. सोबतच शहरात अशा प्रकारे सातत्याने गुन्हे घडत होते. ज्येष्ठ नागरिकांना हेरून त्यांची फसवणूक होत होती. दरम्यान, तपास करताना पोलीस अंमलदार मयुर भोसले व आशिष खरात यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय खबरीच्या मदतीने राजू कुलकर्णीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली, तेव्हा त्याच्याकडे वेगवेगळ्या बँकेचे तब्बल १६६ एटीएम कार्ड मिळून आले. अधिक चौकशीत त्याने हातचलाखीने अनेकांची फसवणुक केल्याचे उघड झाले. विश्रामबाग पोलिसांनी एटीएम कार्डवरुन फसवणुक झालेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क साधला. तेव्हा त्यातील अनेकांनी बँक खात्यात किती शिल्लक आहे, हे पाहिले नसल्याने आपली फसवणूक झाली आहे, हे त्यांना समजलेही नव्हते.
राजू कुलकर्णी हा जेथे पेशन्सची रक्कम काढण्यास ज्येष्ठ नागरिक येतात. अशा एटीएम केंद्रासमोर थांबुन राहायचा व ज्या ज्येष्ठ नागरिकांना एटीएम मशीन मधून पैसे काढता येत नाहीत, अशा ज्येष्ठ नागरिकांस पैसे काढण्यास मदत करण्याचे भासवून त्यांच्याकडून एटीएम कार्ड व त्याचा पीन घेत असत. पण, हातचलाखीने दुसरेच एटीएम कार्ड बदलून एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकत असे. ज्येष्ठांना पीन मॅच होत नसल्याचे सांगून बाहेर पाठवत. बँकेत जाऊन चौकशी करा, असे सांगत. नंतर तो दुसऱ्या एटीएम मशीनमध्ये जाऊन पैसे काढून फसवणूक करत असे.
राजू कुलकर्णी हा काहीही बोलत नाही. आपल्याला मराठी समजत नाही, असे सांगतो. त्यामुळे त्याला बोलते करण्यास पोलिसांनी कन्नड भाषिकांची मदत घेतली. त्याने इतरही शहरात गुन्हे केल्याची शक्यता आहे.