रविवार ता.९ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ नेते कॉ.कृष्णा मेणसे यांचा ९७ वा जन्मदिन आहे.तर १३ तारखेला पहिला मासिक स्मृतिदिन आहे या निमित्ताने ....

 


कॉ.कृष्णा मेणसे  : प्रगल्भ कृतीशील नेतृत्व -----------------------------

प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )

prasad.kulkarni65@gmail.com

ज्येष्ठ कामगार नेते, थोर स्वातंत्र्य सैनिक, लेखक , संपादक,पत्रकार, सीमा लढ्याचे नेते, कुशल संघटक, उत्तम वक्ते, ख्यातनाम विचारवंत आणि स्वतंत्र भारताची आजवरची वाटचाल अतिशय डोळसपणे पहात त्यावर नेमके कृतिशील भाष्य करणारे कॉम्रेड कृष्णा मेणसे १३ जानेवारी २०२५ रोजी कालवश झाले. समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस आचार्य शांताराम गरूड यांचा त्यांच्याशी अतिशय जवळचा स्नेह होता. त्यामुळे कॉम्रेड कृष्णा मेणसे  समाजवादी प्रबोधिनीच्या स्थापनेपासून संस्थेशी जोडले गेले होते. त्यांच्या स्मृतीला समाजवादी प्रबोधिनी परिवाराचे विनम्र अभिवादन..!


कष्टकरी , कामगार आणि सोशीतांसाठी संपूर्ण आयुष्य कार्यरत व संघर्षरत राहिलेले कॉ.कृष्णा मेणसे हे केवळ सीमा लढा,कर्नाटक मधीलच नव्हे वर्तमान भारतातील महत्त्वाचे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते होते.   ९ फेब्रुवारी १९२८ रोजी एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले कॉम्रेड कृष्णा मेणसे  विद्यार्थी दशेतच स्वातंत्र्य आंदोलनाच्या वातावरणाने भारून गेलेले होते. दहावीत असताना  ते परीक्षा न देता त्यांचे बालमित्र हिरामण ताशीलदार यांच्यासह वर्ध्याला गांधींच्या आश्रमात गेले. पत्र गांधीजी व विनोबा भावे यांनी त्यांना शिक्षण पूर्ण करून देशकार्यात सहभागी व्हा असा सल्ला दिला. आणि ते बेळगावला परतले. बेळगावच्या लिंगराज कॉलेज व आरपीडी कॉलेजमध्ये त्यांचे पदवीपूर्व शिक्षण झाले.ते कुस्तीपटू होते.महाविद्यालयीन जीवनात त्यांनी आंतरविद्यापीठ स्पर्धेत कुस्ती सुवर्णपदक जिंकले होते. 

ते महाविद्यालयात शिकत असतानाच स्वातंत्र्याचे आंदोलन तीव्र झालेलं होतं. कॉम्रेड कृष्णा मेणसे यानी शिक्षणाचा त्याग करून स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेतली. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारच्या आंदोलनात सहभागी असलेल्या अनेक क्रांतिवीर भूमिगताना त्यांनी आपल्या घरी आश्रय दिला.त्यांना शस्त्रे दिली. या आंदोलनात संदेश वाहकाचे प्रमुख काम त्यांनी केले. त्याचबरोबर बेळगाव व परिसरात सुरू असलेल्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी विद्यार्थी दशेत विविध स्वरूपाचे काम केले.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर कॉम्रेड कृष्णा मेणसे यांनी कार्ल मार्क्स व महात्मा गांधी यांच्या विचारानुसार कार्य सुरू केले. आर्थिक व सामाजिक विषमता नष्ट करून वर्गविरहित समाज निर्माण झाला पाहिजे हा मार्क्सचा विचार त्यांना पटलेला होता. बेळगाव त्यांनी युवक संघाची स्थापना केली. तसेच बेळगावात कॉम्रेड रामदास गोळीकेरी यांनी स्थापन केलेल्या कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. त्यांनी विविध क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगारांच्या संघटनांची बांधणी केली. कामगार व कष्टकऱ्याना न्याय मिळवून देण्याची फार मोठी कामगिरी त्यांनी वर्षांनुवर्षे केली. त्यांनी राष्ट्रीय पातळीवर ॲल्युमिनियम कामगारांचा महासंघ अर्थात फेडरेशन स्थापन केले. श्रमजीवी कष्टकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या हेतूने त्यांनी बेळगाव सिटी मजदूर को ऑप क्रेडिट सोसायटीची स्थापना केली. संपूर्ण आयुष्य पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या कॉम्रेड कृष्णा यांनी शब्दशः शेकडो कार्यकर्ते घडवले. कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांना दिल्या.

तसेच रामोशी समाजाचे प्रश्न समजून घेऊन त्यांनी रामोशी परिषदही भरवली. सुदृढ समाज व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना संघटित करून त्यांचे पुनर्वसन व्हावे अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली. अर्धी अधिक लोकसंख्या असलेल्या महिला वर्गाला त्यांनी कामगार संघटनेत सक्रियपणे व जाणीवपूर्वक सामावून घेतले. त्यांनी बेळगावात महिला अन्याय निवारण समिती स्थापन केली. पुढे ती भारतीय महिला फेडरेशनशी जोडली गेली. बेळगाव शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी नागरिक हितरक्षण समितीची स्थापना केली. त्या समितीच्या आधारे महापालिकेकडून अनेक प्रश्नांची तड लावून घेतली. बेळगावच्या सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष म्हणून काम केलेले कॉ. कृष्णा मेणसे हे बेळगाव मधील एक अतिशय आदरणीय ज्येष्ठ व्यक्तीमत्व होते.

स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचना करण्यात आली होती. पण बेळगाव व परिसरातील मराठी भाषिकांना त्यांचे राज्य नाकारले गेले. त्यामुळे कामगार संघटनेत सक्रिय असलेले कॉम्रेड कृष्णा मेणसे सीमा वासियांच्या लढ्यात सक्रिय बनले. या लढ्याचे ते प्रारंभापासून अग्रणी नेते होते. यात त्यांनी अनेक वेळा तुरुंगवासी भोगला. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात ते सक्रिय सहभागी होते. कॉम्रेड डांगे,आचार्य अत्रे, एस. एम. जोशी ,जयंतराव टिळक ,सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, क्रांतिसिंह नाना पाटील ,उद्धवराव पाटील,दाजीबा देसाई, गोविंद पानसरे आदी नेत्यांसह ते सक्रिय होते.महाराष्ट्र सरकारने त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून गौरवले होते.गोवा मुक्ती आंदोलनाची त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली. त्याबद्दल गोवा सरकारने त्यांचा स्वातंत्र्यसैनिक म्हणून गौरवही केला.

कॉम्रेड कृष्णा मेणसे हे सिद्धहस्त लेखक व पत्रकारही होते. १९५९ साली त्यांनी हेमंत हे साहित्याला वाहिलेले मासिक सुरू केले.तर १५ ऑगस्ट १९६९ या दिवशी साम्यवादी या साप्ताहिकाची स्थापना केली. संपादक या नात्याने त्यांनी या अंकातून अनेक महत्त्वाच्या विषयावर सातत्यपूर्ण लेखन केले. बेळगाव जिल्हा पत्रकार संघाचे काही वर्षे ते अध्यक्षही होते. २००० साली सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या अखिल ७३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची प्रेरणा त्यांचीच होती. असा आहे गोवा, गुरुवर्य शामराव देसाई चरित्र, निपाणी येथील शेतकऱ्यांचा लढा, कॉम्रेड एस.एम.मिरजकर यांचे चरित्र, इराक अमेरिका युद्ध, हो ची मिन्ह,बसवेश्वर ते ज्ञानेश्वर : एक चिंतन,गोठलेली धरती पेटलेली मने, असा घडलो असा लढलो, परिक्रमा, अशा तोडल्या बेड्या, स्वातंत्र्य आंदोलन व भारतीय कम्युनिस्ट, डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक व राजकीय चळवळी, राणी कित्तूर चन्नम्मा, बंधू भगिनींनो अशा अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. बसवेश्वर ते ज्ञानेश्वर हे त्यांचे पुस्तक अतिशय अभ्यासपूर्ण स्वरूपाचे आहे. या पुस्तकाला पुणे विद्यापीठाने प्रतिष्ठेचा असा स्वामी स्वरूपानंद पुरस्कार दिलेला होता. गोठलेली धरती पेटलेली मने हे त्यांचे पुस्तक  सोवियत रशियातील आठ महिन्याच्या वास्तव्यात आलेल्या अनुभवावर आधारित आहे.

कॉम्रेड कृष्णा मेणसे यांच्या निधनाने एक ज्येष्ठ विचारवंत ध्येयवादी नेता आपण गमावलेला आहे. सर्वांगीण समतेच्या प्रस्थापनेसाठी ते आयुष्यभर राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहिले. त्यांचे चिरंजीव प्रा.आनंद व संजय , कन्या लता पावसे व नीता पाटील यांच्यासह सर्व कुटुंबीय ती विचारधारा घेऊन सक्रियपणे कार्यरत आहेत.आपणही तशी समाज व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्यरत राहणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार व वक्ते म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post