प्रेस मीडिया लाईव्ह :
पुण्यातील एका बहुचर्चित मतदार संघात फेर मतमोजणी होणार आहे. हा मतदारसंघ आहे खडकवासला मतदारसंघ.विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या एकूण 11 पराभूत उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केले होते.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आठ उमेदवार आणि काँग्रेसच्या तीन उमेदवारांनी हे अर्ज भरले होते. बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी देखील हा अर्ज भरला होता. मात्र काही दिवसांनी त्यांनी माघार घेतली. त्यापाठोपाठ भोर, पुरंदर व दौंड या तीन मतदारसंघांतील उमेदवारांनीही आपला अर्ज मागे घेतला. त्यानंतर इतर सहा पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम च्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. त्यामुळे केवळ एकाच उमेदवाराने आपला फेर मतमोजणीचा अर्ज कायम ठेवला. उमेदवार आहेत काँग्रेसचे सचिन दोडके.सचिन दोडके यांच्या खडकवासला मतदारसंघात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार प्रतिरूप मतमोजणी जिल्हा निवडणूक शाखा करणार आहे. त्यामुळे या मतमोजणीत नेमकं काय समोर येतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.