- 18 फेब्रुवारी रोजी भोर तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढणार
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
पुणे : भोर तालुक्यातील घोडदरी येथे विक्रम गायकवाड या बौद्ध युवकाची निर्घून हत्या करण्यात आहे. सदर गुन्हा हा ऑनर किलिंग च्या अनुषंगाने घडलेला असल्याने त्या दिशेने तपास व्हावा व यासाठी स्थानिक पोलिसांचे काम समाधानकारक नसल्याने पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक अर्थात एस आय डी ची स्थापना करावी अशी मागणी आज आंबेडकरी चळवळीतील नेत्यांच्या वतीने समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया तसेच पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र दूडी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर शिष्टमंडळामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राज्य संघटन सचिव परशुराम वाडेकर, पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ देंडे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये ऑनर किलिंग ची घटना ही अत्यंत निंदनीय असून अशा प्रकारच्या घटनांना पायबंध करणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात प्रशासनाने स्वतःहून तात्काळ कारवाई करणे आवश्यक असताना ते न करता तपास वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याचा प्रयत्न स्थानिक पोलिसांकडून होत असल्याचा गंभीर आरोप यावेळी शिष्टमंडळाकडून करण्यात आला.
सदर गुन्हा हा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये नोंदवला गेला असल्याने यातील फिर्यादी कुटुंबीयांना देण्यात येणारी सरकारी मदत तात्काळ मिळावी असा आग्रह शिष्टमंडळाने धरला असता समाज कल्याण आयुक्तांनी या संदर्भामध्ये विभागीय आयुक्त तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सदर रक्कम आजच्या आज जमा करण्याचे आदेश त्यांना दिले असल्याचे परशुराम वाडेकर यांनी सांगितले.
दरम्यान, विक्रम गायकवाड यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी भोर तहसील कार्यालयावर पुणे शहर, जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी चळवळीच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आली.