गजा मारणे यांची संपत्ती होणार जप्त, पत्रकार परिषदेत पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी कारवाई संदर्भात दिली माहीत.
प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : चंद्रशेखर पात्रे :
पुणे : भाजपाचे नेते व केंद्रीय नागरी उड्डाण राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांवर गजा मारणे टोळी कडुन हल्ला करण्यात आला कोथरुडमध्ये आय टी इंजिनिअर तरुणाला मारहाण ही साधी घटना नसून त्याकडे संघटित गुन्हेगारीचे कृत्य म्हणून पोलीस पहात आहे. गजा मारणे याच्या टोळीतील २७ जणांची नावे निष्पन्न झाले आहेत. गजा मारणेसह सर्वांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार असून ही टोळी उद्धस्त करणार असल्याची घोषणा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मिनाक्षी गुरव उपस्थित होते.
कोथरुड येथील भेलकेनगर चौकात चौघांनी देवेंद्र जोग यांना मारहाण केली होती. या प्रकरणी पोलिसांनी ओम धर्मजिज्ञासू, किरण पडवळ, अमोल तापकीर यांना अटक केली आहे. गजा मारणे याचा भाचा बाब्या ऊर्फ श्रीकांत संभाजी पवार हा फरार आहे.
"पोलीसांनी अटक केलेल्या तीन आरोपींची रविवारी सायंकाळी कोथरूड परिसरातून धिंड काढली आरोपींना जरब बसावा व गुंडाची दहशत कमी करण्याचा उद्देशाने ही धिंड काढण्यात आली असल्याचे बोलले जात आहे या धिंडाची व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे"
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, ही केवळ मारामारी म्हणून पोलीस त्याकडे पहात नाही. संघटित गुन्हेगारी टोळीचे हे कृत्य म्हणून पोलीस त्याकडे पहात आहे. त्यादृष्टीने टोळी उद्धस्त करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
कोणीही मुख्य प्रवाहात येणार असेल, तर त्याच्याशी दुश्मनी करण्याचे पोलिसांना काही कारण नाही. परंतु, ते येथील कायद्याला हात घालत असतील, कायद्याशी खेळत असतील तर त्यांची गय करणार नाही. कोणाचाही दबाव पोलीस सहन करणार नाही. कोथरुडमधील घटना घडण्यापूर्वी चित्रपट पाहण्यासाठी किती जण गेले होते, त्यापासून त्यांच्यात काय संभाषण झाले, या सर्वांचे सीडीआर पोलिसांनी मागील तीन दिवसांपासून काढले आहेत. गजा मारणे सह त्याच्या टोळीतील २७ जण फरार झाले असून त्यांना पकडण्यासाठी गेल्या तीन दिवसात पुणे व मुळशी येथील ७४ ठिकाणी पोलिसांनी छापे घातले आहे. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.
या टोळीच्या नावावर असलेल्या मालमत्तेची माहिती गोळा करण्यात येत आहे़ त्यासाठी महापालिका, मुद्रांक महानिरीक्षक यांच्याकडून माहिती मागविण्यात येत आहे. टोळीच्या नावावर किती वाहने आहेत, याची माहिती आर टीओकडे मागितली आहे. या सर्व बाजूने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली आहे. या टोळीने कोणाला त्रास दिला असेल, अथवा टोळीविषयी काही माहिती असेल तर गुन्हे शाखेची संपर्क साधावा़ त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.