प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : आंबेगाव पठार परिसरात बांधकाम चालू असलेला एका साईटवर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. हा मृतदेह दोन ते तीन दिवस आधीचा असल्याने तो सडू लागला आणि त्यानंतर याविषयी माहिती पोलिसांना मिळाली.त्यामुळे हा मृतदेह कुणाचा आहे ? हा खून नेमका कोणी केला ? या प्रश्नांची उत्तरं शोधणं पोलिसांसाठी अवघड होतं मात्र अवघ्या दीड दिवसात पोलिसांनी या मृतदेहाचं गूढ उलगडलं असून आरोपीला अटक देखील केलीये. पाहूया हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे.
पुण्यातील आंबेगाव पठार येथील तोरणा मोहर बिल्डिंग जवळ एक बांधकाम साईट चालू आहे. या ठिकाणी 10 फेब्रुवारी रोजी एकाचा डोक्यात लोखंडी रॉडने मारून खून करण्यात आला. मृतदेह तिथंच टाकून आरोपी परराज्यात पसार झाला. दोन दिवसानंतर मृतदेह सडू लागल्याने त्याचा वास येऊ लागला. त्यानंतर साइटवरच्या कामगारांनी पाहणी केली असता हा मृतदेह आढळला. भारती विद्यापीठ पोलिसांनी तात्काळ हा मृतदेह ताब्यात घेऊन तपास चालू केला. मृतदेह कुजत असल्याने त्याचा चेहरा ओळखू येत नव्हता. त्यामुळे प्राथमिक तपासात अनेक अडचणी आल्या. मात्र ज्या ठिकाणी हा मृतदेह टाकलेला होता त्याच्या जवळ असलेल्या खोलीत रक्ताने माखलेला एक मोबाईल होता. या मोबाईल मधून डेटा रिकव्हर केल्यानंतर मयत तरुण आणि आरोपी विषयीची बरीच माहिती पोलिसांना मिळाली. नयन गोरख प्रसाद या मयत इसमाचं वय 45 असून तो बिहारचा रहिवासी होता. तर आरोपीचं नाव बिरण सुबल कर्माकर असून त्याचं वय 30 वर्ष आहे. तो मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. तर हे दोघेही पुण्यात सुतार काम करत होते. हे दोघेही एकाच खोलीत राहायचे. मात्र नयन चा खून झाल्यानंतर बिरण गायब झाल्याने त्यानेच खून केला असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पश्चिम बंगालच्या पोलिसांच्या मदतीने भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याला पश्चिम बंगालच्या हावडा येथून अटक करून पुण्यात आणलं आहे. तर त्याच्याच चौकशीतून हा खून नेमका का केला याचं कारण समोर आलं आहे.