पुणे : महानगरपालिकेच्या जन्ममृत्यू विभागात बनावट मृत्यू दाखला तयार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर

 पुण्यातील दोघांना रायगड जिल्ह्यातील आणि श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाणे पोलिसांकडून अटक

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : प्रतिनिधी :

पुणे : महानगरपालिकेच्या जन्ममृत्यू विभागात बनावट मृत्यू दाखला तयार केल्याचा  खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुण्यातील दोघांना रायगड जिल्ह्यातील आणि श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी महापालिकेच्या कोंढवा क्षेत्रीय कार्यालयात काम करणारे डाटा इंट्री ऑपरेटर स्वप्निल रमेश निगडे व शुभम संजय पासलकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

रामकुमार ब्रह्मदत्त अग्रवाल (रा. कॅम्प, पुणे) यांनी त्यांच्या मालकीची रायगड, तालुका श्रीवर्धन, कार्ले येथील ४० गुंठे जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाल्या प्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाणे श्रीवर्धन येथे मार्च २०२३ मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास करताना पुणे महापालिकेत जन्म मृत्यूचे बनावट दाखले देण्याचे रॅकेट सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाच्या तापसात सहकार्य करण्याबाबतचे पत्र ठाणे पोलिसांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला पाठवले आहे. या प्रकरणामुळे विभागात मोठी खळबळ उडाली आहे. 

या गुन्ह्यात आरोपींनी संगणमत करून सन २०१९ते २०१२ काळात फिर्यादी यांच्या मालकीची श्रीवर्धन येथील जमिनीच्या व्यवहाराबाबत बनावट व्यक्ती रामकुमार ब्रह्मदत्त अग्रवाल यास फिर्यादी यांच्या नावाने उभा करून त्याचे बनावट ओळखपत्र तयार करण्यात आले. हे ओळखपत्र दुय्यम निबंधक कार्यालय श्रीवर्धन येथे सादर करून संबंधित जमिनीचे नोंदणीकृत बनावट खरेदीखत तयार करण्यात आले. या बनावट खरेदीखतावरून जमिनीचा सातबारा उताराची नोंद करुन फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची तपासात बनावट व्यक्ती रामकुमार ब्रह्मदत्त अगरवाल (रा.संतोष नगर,कात्रज पुणे) या मृत्यू झाल्याची माहिती समजली. त्यानंतर त्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्र पुण्याच्या धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातून देण्यात आल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये मृत्यूची तारीख २५ मे २०२१ असून कार्यालयात मृत्यूची नोंद १२ एप्रिल २०२४ रोजी केल्याचे तपासात समजले. तारखेत घोळ आढळून पोलिसांना संशय आला. याप्रमाणाीच सत्यता पडताळण्यासाठी महापालिकेच्या धनकवडी कार्यालयाकडे माहिती मागवली असता, मृत्यू दाखल्याबाबत कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याची माहिती देण्यात आली आहे. 

या गुन्ह्यात मृत्यूची नोंद करणारे तत्कालीन क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी तथा उपनिबंधक जन्म मृत्यु नोंदणी विभाग डॉ.अमित शहा यांच्यासह अधिकारी पूनम घरपाळे, डाटा एन्ट्री ऑपरेटर स्वप्निल रमेश व संजय पासलकर यांनी आर्थिक लाभा पोटी या कटात सहभागी झाल्याचे तपासून समोर आले. या दोन आरोपांना १३ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली असून १५ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.या गुन्ह्याचा तपास करण्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या जन्म- मृत्यू नोंदणी कार्यालयात मृत्यू्च्या नोंदीची सुरवातीपासून अखेरपर्यतची संपुर्ण प्रक्रियेबाबत लेखी माहिती मिळण्यासाठी सहकार्य करावे. तसेच संबंधित व्यक्तीच्या खोट्या मृत्यू दाखल्याची माहितीसाठी कर्मचारी व अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करुन तपासाच्या कामासाठी दिघी पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश द्यावेत. असे दिघी सागरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अर्षद शेख यांनी धनकवडी सहायक आयुक्तांना पत्र दिले आहे. 

दिघी सागरी पोलीस ठाण्याचे पत्र धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाला आले आहे. सदर मृत्यू पत्रसोबत जोडलेली सर्व कागदपत्रे मिळावी, अशी मागणी केलेली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. २५ मे २०२१ रोजी याबाबत मृत्यूपत्राची नोंद आहे. ही नोंद कोणत्या आधारे केली याबाबतची माहिती मागितली आहे. प्रमाणपत्रावर रामकुमार ब्रम्हदत अग्रवाल असे नाव आहे. उपनिबंधक यांच्या डिजिटल सहीने संबंधित अधिकाऱ्याने मृत्युपत्र दिले आहे. या कामासाठी विद्या ऑनलाईन सर्विसेस कंपनीचे कर्मचारी घेतलेले आहेत. कागदपत्रे मिळाली नाहीत तर पोलिसांना कळवत असतो. या प्रकरणातही पोलिसांना कळविले आहे. याप्रकरणी कागदपत्रे न मिळाल्याने संबंधित कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची नोटिस दिली आहे. 


- डॉ. निना बोराडे, प्रमख आरोग्य विभाग, पुणे महापालिका.


Post a Comment

Previous Post Next Post