गोहे, आंबेगाव शासकीय आश्रम शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न
प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी : जीवनात सर्वात मौल्यवान "वेळ" आहे. ज्याला वेळेचे महत्व कळले तो यशस्वी होतो. त्यामुळे सर्वांनी वेळेचे महत्व जाणून योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा व आलेल्या संकटावर मात करीत पुढे गेले पाहिजे. आदिवासी वाडी, वस्तीवर सेवा, सुविधा कमी असताना देखील परिस्थितीशी लढा देऊन आपल्या पायावर ठामपणे उभे राहिलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी तालुक्यात, शहरात व्यवसाय, रोजगार निमित्त स्थायिक झाल्यानंतर पुन्हा मागे वळून गरजवंतांना मदतीचा हात दिला पाहिजे असे मार्गदर्शन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय घोडेगावचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सोनुल कोतवाल यांनी केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय घोडेगाव संचालित शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कला व विज्ञान विद्यालय, गोहे बुद्रुक, तालुका आंबेगाव येथील सन २००३ ते २०२५ च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवारी (दि.२३) गोहे बुद्रुक येथील आश्रम शाळेत आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सुमारे ७० पेक्षा जास्त माजी विद्यार्थी व आजी, माजी शिक्षक, शालेय विद्यार्थी तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या माजी विद्यार्थ्यां मेळाव्यात मुख्याध्यापक सुखदेव अरसुळे, माजी मुख्याध्यापक रमेश कारले, भास्कर लोखंडे, प्राथमिक शाळेचे शिक्षक शोभा जाधव, राणी गाडेकर, प्रा. मीनाक्षी शहाणे, वसतिगृह अधीक्षिका माधुरी सगर, प्रवीण शिंदे, कला व वाणिज्य विद्यालयाचे प्रा. भारती सुशीलकुमार, विलास साबळे, गावचे सरपंच तुकाराम भवारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्या भील, राणी दुर्गावती महादू कातकरी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्यात सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी इशस्तवन व स्वागत गीत सादर करून स्वागत केले. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी वसतीगृहासाठी दूरदर्शन संच व वार्षिक इंटरनेट सुविधा भेट दिली.
माजी मुख्याध्यापक रमेश कारले यांनी मनोगतात शाळेच्या मागील पंचवीस वर्षाचा आढावा घेताना सांगितले की, या शाळेतील अनेक विद्यार्थी शासकीय उच्च पदावर अधिकारी व कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. विज्ञान शाखेची उच्च माध्यमिकची शाखा स्थगित करण्यात आली होती, ती सुरू करण्यास मला यश आले त्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी देखील सहकार्य केले.
विद्यालयाचे प्रा. भारती सुशीलकुमार यांनी शाळेचा नावलौकिक वाढवण्यात माजी विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा आहे. या शाळेचे माजी विद्यार्थी कला, वाणिज्य क्षेत्र बरोबरच स्पर्धा परीक्षेत यश मिळवून शासकीय सेवेत व काही उद्योग, व्यवसायात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून शाळेचे नाव उज्वल करीत आहेत.
प्रा. विलास साबळे यांनी माजी विद्यार्थी संघटनेचे सभासद किरण तळपे, विक्रम वांगधर, संतोष दांगट, विक्रम गवारी, संतोष घोडे या माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून योग्य समन्वय करीत मेळाव्याच्या आयोजनात पुढाकार घेतला. भास्कर जगदाळे, अश्विनी लोहकरे, दत्ता केंगले, मुकुंद कोकणे, दिलीप आंबवणे, संदीप गवारी, सारिका भिंगे, अर्चना सोनवणे, इंद्रसेन बांबळे या माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त केले. आपण शिकलेल्या विभागामध्ये, वर्गात, वसतीगृह येथे जाऊन आपल्या शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेटून विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सर्वांनीच आपल्या आठवणीचा ठेवा कॅमेरात कैद करून ठेवला. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रास्ताविक किरण तळपे, सूत्रसंचालन संतोष घोडे व आभार विक्रम वांगधर यांनी मानले.