मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातुन सासर्‍याने केले जावायाचे अपहरण.

 स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केली अपहरणकर्त्याची सुटका. तिघांना अटक.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर-करवीर तालुक्यातील निगवे येथील विशाल मोहन आडसूळ (वय 26.रा.भुये) यांने मिरज तालुक्यातील कवठेपिरान  येथील श्रीकृष्ण महादेव कोकरे  ( वय 45.रा.वाघमोडेनगर ,कुपवाड) यांच्या मुलीशी प्रेमविवाह केला होता.या रागातुन कोकरे  यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने रविवार (दि.09) रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास भुयेवाडी येथील कमानी जवळून अपहरण केले होते.या घटनेची माहिती विशाल आडसूळ यांच्या नातेवाईकांना समजताच विशाल याचे वडील मोहन आडसुळ यांनी अनोळखी इसमांनी चार चाकी गाडीतुन अपहरण केल्याची तक्रार करवीर पोलिस ठाण्यात दिली.दिलेल्या तक्रारी वरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला अपहरणकर्त्याचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.

सदर पथकातील पोलिसांनी घटना घडलेल्या ठिकाणची पहाणी करून कोल्हापूर,सांगली येथे स्थानिक नागरिकांच्या मदतीने झाडाझुडपात,ऊसाच्या शेतासह निर्जन ठिकाणी शोध घेत असताना या पथकातील पोलिसांना अपहरण झालेला विशाल आडसुळ याचे अपहरण श्रीकृष्ण महादेव कोकरे यांने कुपवाड ,सांगली आणि मिरज येथील  साथीदारांच्या मदतीने केली असून श्रीकृष्ण कोकरे हा सांगली येथे असल्याची माहिती  मिळाली असता पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या पथकाने अंकली पूल परिसरात श्रीकृष्ण कोकरे याला ताब्यात घेऊन अपहरण व्यक्ती बाबत चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली.पोलिसांनी मोठ्या कौशल्याने कोकरे याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या अन्य सहा  जणांच्या मदतीने विशाल याचे अपहरण केल्याची दिली.सदरची अपहरण केलेली व्यक्ती मिरज कोर्टाच्या मागे असलेल्या वेधस अपार्टमेंट येथे कोंडून ठेवल्याची माहिती दिली.पोलिसांनी कोकरे याला बरोबर घेऊन त्या फ्लॅट मध्ये जाऊन पहाणी केली असता त्या फ्लॅटला कुलूप असलेले आढ़ळून आले.पोलिसांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला असता अपहरण झालेल्या व्यक्तीला दोरीने खुर्चीला बांधून ठेवलेल्या स्थितीत आढ़ळून त्याला जबर मारहाण करून जखमी केल्याचे दिसून आले.त्याला तात्काळ सोडवणूक करुन त्याला उपचारासाठी पोलिसासह कोल्हापूर येथे पाठवून दिले.तसेच मिरज येथे इतर आरोपींचा शोध घेतला असता धिरज उर्फ हणमंत नामदेव पाटील (वय 56.रा.कवठेपिरान)आणि राजेंद्र परमेश्वर कट्टीमनी (वय 33.रा.कुपवाड एमआयडीसी,सावळी  ता.मिरज ) हे आढ़ळून आल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता   श्रीकृष्ण कोकरे यांच्या मुलीची आणि भुये येथील विशाल आडसूळ यांची इंस्टाग्रामर ओळख होऊन त्यांनी सात महिन्यापूर्वी आंतरजातिय प्रेमविवाह केला होता.सदरचा प्रेमविवाह कोकरे यांना मान्य नसल्याने विशाल याला  मारण्याच्या उद्देशाने आपल्या साथीदारांच्या मदतीने अपहरण केल्याचे सांगितले.पोलिसांनी आरोपीनी गुन्हयांत वापरलेली कार आणि मोटारसायकल असा एकूण 4 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विशाल मोहन आडसूळ यांच्यावर कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार चालू असून या गुन्हयांतील तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना पुढ़ील तपासासाठी करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.तर उर्वरित चौघांचा  पोलिस शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर,पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे पोलिस अमोल कोळेकर ,रामचंद्र कोळी,संदिप बेंद्रे,सुरेश पाटील,लखन पाटील,राजू येडगे,रुपेश माने,सागर माने,अमित सर्जे,युवराज पाटील,अमित मर्दाने,हंबीर अतिग्रे,महेंद्र कोरवी आणि रुपेश माने यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post