प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर -दुचाकीला भरधाव वेगाने येत असलेल्या मोटारीने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराच्या पाठीमागे बसलेली महिला खाली पडली यावेळी मोटारीचे चाक महिलेच्या डोक्यावरून गेले. हा प्रकार टेंबलाईवाडी येथील बागल हायस्कूलच्या पाठी मागे सोमवारी (दि.03) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला . यात जयश्री भीमराव घाटगे (वय 58. रा. माळी कॉलनी, टाकाळा) यांचा जागीच मृत्यु झाला. तर त्यांचे पती भीमराव बाबुराव घाटगे (वय ६४) हे जखमी झाले. अपघात झाल्यानंतर मोटार न थांबताच भरधाव वेगाने पुढ़े निघून गेली. या अपघाताची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.
माळी कॉलनी, टाकाळा येथील भीमराव बाबूराव घाटगे हे पत्नी जयश्री सोबत दुचाकी वरुन गडमुडशिंगी (ता.करवीर) येथे नातेवाईकांच्या साखरपुडयाला गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते दोघे दुचाकीवरून टाकाळा येथे घरी येत होते. टेंबलाईवाडी येथे आल्यानंतर घाटगे यांच्या दुचाकीला पाठीमागून एका मोटारीने जोराची धडक दिली. या धडकेत पाठीमागे बसलेल्या जयश्री घाटगे या उडून पुढे जाऊन पडल्या. यावेळी मोटारीचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्या जागीच ठार झाल्या,तर पती भिमराव हे एका बाजूला पडल्याने ते गंभीर जखमी झाले. रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांनी अपघाताची माहिती राजारामपुरी पोलीसांना फोन करून दिली. या अपघाताची माहिती पोलिसांना समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पथकही आले.
पोलिसांनी जखमी भीमराव घाटगे यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर महानगरपालिकेची शववाहिका बोलवून जयश्री घाटगे यांचा मृतदेह सीपीआर रुग्णालयात आणला. तेथे मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून सदरचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी अज्ञात मोटार चालकावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघातग्रस्त मोटारीचा शोध घेत आहेत. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण हे पुढ़ील तपास करीत आहेत.