स्वातंत्र्योत्तर कालखंडात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे नाटक म्हणून नटसम्राट नाटकाचा उल्लेख करावा लागेल- प्रा. सौरभ पाटणकर



       फोटो..प्रा.सौरभ पाटणकर यांचे स्वागत करताना                    डॉ.एस.पी.मर्दा सोबत दिलीप शेंडे

प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी ता.२७ कवी कुसुमाग्रज यांची कविता प्रखर जीवनवादी, आशावादी आहे. कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेतून आणि नाटकातून मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना करण्याचा ध्यास घेतला. त्यामुळे त्यांच्या कविता आणि नाटकात नेहमी विशालतेला अनुसरणारा आणि ध्येयाने प्रेरित झालेला नायक दिसतो.

 कुसुमाग्रजांच्या कवितेतून समर्पणभाव वारंवार अभिव्यक्त होताना दिसतो. प्रेम ओरबाडून घेण्यात नाही तर समर्पणात आहे असा त्यांच्या सूर्यफूल, पृथ्वीचे प्रेमगीत, स्वप्नाची समाप्ती या कवितांचा सूर आहे. शिरवाडकर यांनी नाट्यलेखक म्हणून विविध विषयांवर नाटके लिहली पण त्यांची रूपांतरित नाटके अधिक लोकप्रिय ठरली. त्यांच्या साहित्यिक प्रतिभेचे स्मारक म्हणून नटसम्राट या नाटकाचा उल्लेख करावा लागेल. स्वातंत्र्योत्तर कालखंडात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे नाटक म्हणून नटसम्राट नाटकाचा उल्लेख करावा लागेल असे मत प्रा. सौरभ पाटणकर यांनी व्यक्त केले. ते सुवर्ण महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्मृती जागर समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात दुसरे पुष्प गुंफताना 'कुसुमाग्रजांचे साहित्य 'या विषयावर बोलत होते.प्रा.रोहित शिंगे यांनी स्वागत केले.संयोजक दिलीप शेंडे यांनी प्रास्तावित केले. डॉ. एस. पी. मर्दा यांच्या हस्ते प्रा. पाटणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच कुसुमाग्रज ,पु ल देशपांडे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करण्यात आला.

प्रा. सौरभ पाटणकर यांनी कुसुमाग्रजांचे साहित्य, त्यांना लाभलेला भवताल, तत्कालीन कालखंड ,साहित्य विषयक भूमिका, इतिहासाचे सजग भान आणि भविष्य विषयक व्यापकता , निखळ मानवतावादी विशाल दृष्टिकोन  इत्यादी मुद्द्यांच्या आधारे कुसुमाग्रजांचे कार्य व कर्तृत्व उभे केले.'स्वानंदी 'निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात   दीपश्री शेंडे,प्रसाद कुलकर्णी, माधव देवधर,काशिनाथ जगदाळे,वैशाली नायकवडी,प्रा.डॉ.सुभाष जाधव,प्रा.डॉ. एफ.एम.पटेल, सुखदा देशापांडे, अर्चना पाटील,सी.पी. कोरे, अरूण काशीद ,गौतम बागवडे,डॉ.मृदुला कुलकर्णी, कविता काटकर,स्वप्नाली ढोनुक्षे,रेखा पाटील,, श्रीरंग कुलकर्णी, आरती लाटणे ,अभिजीत काटकर,प्रसाद नाईक यांच्यासह अनेक साहित्य रसिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post